|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » शिकारीसाठी फिरणारे सातजण पोलिसांच्या जाळय़ात

शिकारीसाठी फिरणारे सातजण पोलिसांच्या जाळय़ात 

ग्रामीण पोलिसांची हातखंबा येथे कारवाई

दोन बंदुका, काडतुसे, सुमोसह सर्वजण अटकेत

प्रतिनिधी /रत्नागिरी

रत्नागिरीनजीकच्या हातखंबा परिसरात शिकारीसाठी गेलेल्या 7 शिकाऱयांचा बेत गस्तीवरील ग्रामीण पोलिसांनी उधळला. शिकारीसाठी जंगल भागात सुमो लावून फिरणाऱया त्या शिकाऱयांना 2 बंदुकांसह अटक करण्यात आली असल्याचे ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले.

पोलिसांनी अटक केलेल्या शिकाऱयांमध्ये संतोष गंगाराम बारगोडे (47), पांडुरंग जानु कांबळे (45), शांताराम लक्ष्मण कळंबटे (44), संजय जानु कांबळे (42), संतोष जोयशी (35), संभाजी गणपत सावंत (61), जानु जोयशी (65, सर्व रा. कारवांचीवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते आपल्या पोलीस सहकाऱयांसह बुधवारी पहाटे गस्तीवर होते.

हातखंबा येथील जंगल परिसरात एक सुमो संशयास्पदरित्या पोलिसांना दिसून आली. त्यावेळी पोलिसांनी या सुमोतील लोकांची चौकशी केली. पोलीस असल्याचे पाहून सुमोतील सातही जण पुरते गोंधळले. असमाधानकारक उत्तरे मिळाल्याने गाडीची पोलिसांनी झडती घेतली. त्यावेळी गाडीत शिकारीसाठी असलेल्या दोन बंदुका, काडतुसे आदी साहित्यही दिसून आले.

या प्रकरणी सातहीजणांना तत्काळ ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडील 25 हजार रुपये किंमतीची सिंगल बॅरल बंदुक, आणखी एक 30 हजार रुपये किंमतीची काडतुस बंदुक, 8 जीवंत काडतुसे, दोन बॅटऱया, दोरखंड तसेच 80 हजार रुपयांची सुमो गाडी पोलिसांनी जप्त केल्याची माहिती देण्यात आली. जिल्हा दंडाधिकाऱयांचा मनाई आदेश असताना शस्त्र बाळगून शिकारीच्या उद्देशाने फिरत असल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल विभुते हे करत आहेत.