|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वेंगुर्ल्यात साकारणार सुसज्ज रुग्णालय

वेंगुर्ल्यात साकारणार सुसज्ज रुग्णालय 

वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे नं. 29 हिस्सा 12 व सर्व्हे नं. 25/1 या वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालयाच्या नावे असलेल्या जागेत अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह सेवा सुविधा दणारे 50 खाटांच्या हॉस्पिटल बांधण्यासाठी सुमारे सात कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दोन मजले असणारी ही इमारत येत्या दोन वर्षात साकारणार आहे. या बांधकामाची निविदा रत्नागिरी येथील ठेकेदारास मंजूर झालेली असून गणेशचुतर्थीनंतर या रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन आरोग्यमंत्री दीपक सावंत व राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

वेंगुर्ले शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य विषयक समस्या लक्षात घेऊन दीपक केसरकर व तालुका दक्षता समितीचे अध्यक्ष सचिन वालावलकर यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या जागेतच अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह सर्व प्रकारच्या सोयी व सुविधा देण्यासाठी ‘जी2’ अशा दोन मजली इमारतीचे हॉस्पिटल होण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे त्यांनी प्रशासकीय मान्यता व अर्थसंकल्पात वित्तीय तरतूदही करण्यात आली. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या रुग्णालय इमारतीचे 1448.49 स्क्वेअर मीटर एवढे बांधकाम होणार असून रुग्णालयासाठी पाण्यासाठी बोअरवेल खोदण्यात येणार आहे.

रुग्णालयाच्या तळमजल्याचे बांधकाम 512.75 स्वेअर मीटरचे असेल. तळमजल्याच्या भागात नर्सरुम, डॉक्टर्स रुम, वॉडबॉयरुम, लॅब रुम, औषधसाठा रुम, उपचार रुम, ऑपरेशन तयारी रुम, पेन्ट्री रुम व 24 बेडचा जनरल हॉल, अशी रचना आहे. पहिला मजला 512.75 स्वेअर मीटरच्या बांधकामाचा असून त्यामध्ये तळमजल्याप्रमाणेच सर्व रचना आहे. दुसरा मजला 422.99 स्वेअर मीटर बांधकामाचा असून त्यात वॉर्ड बॉईज रुम, प्लास्टर रुम, सेफ्टीक रुम, औषधसाठा रुम, नर्सरुम, डॉक्टर रुम, दोन ऑपरेशन थिएटर, ऑपरेशननंतर पेशंटसाठी रिकव्हरी रुम, ऑपरेशन पूर्वतयारी रुम, हवाबंद औषधांसाठी रुम अशी रचना आहे.

नवीन होणाऱया रुग्णालयात क्ष-किरण विभागासह कॉटरी मशिन, पेशंट मॉनिटर दोन, मल्टीपॅरा मॉनिटर यांचीही सोय करण्यात येणार आहे. विजेच्या अखंडतेसाठी रेग्युलर विजेसोबत जनरेटर व सोलर सिस्टीम करण्यात येणार आहे. रुग्णालयाच्या परिसरात अंतर्गत रस्त्यांची निर्मिती केली जाणार असून वाहनतळ, रेन हार्वेस्टिंग केले जाणार आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या संपूर्ण आवारात वॉल कंपाऊंड घालण्यात येऊन दोन बाजूने आत येण्याजाण्यासाठी रस्त्याचे नियोजन रुग्णालय विकास आराखडय़ात केले आहे. प्रथमच लिफ्टच्या वापरातील तालुक्यातील पहिले रुग्णालय होण्याचा मान वेंगुर्लेच्या ग्रामीण रुग्णालय होणार आहे.

डॉक्टर्स, कर्मचारी
निवासस्थानांचा समावेश नाही

वेंगुर्ले शहर व परिसरातील गावांसाठी आरोग्य सुविधेच्यादृष्टीने शासनाने मंजुरी दिलेल्या 50 खाटांच्या वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, नर्सेस व अन्य कर्मचाऱयांसाठी निवासासाठी डॉक्टर्स निवास व कर्मचारी वसाहत रुग्णालय परिसरात निर्माण केलेली नाही. त्यामुळे रुग्णांना त्वरित उपचार मिळणार नाही.  रुग्णालयाचे बांधकाम सुरू होण्यापूर्वी डॉक्टर्स, नर्सेससाठी निवास व्यवस्थेच्यादृष्टीने बांधकाम केले जाण्याची गरज आहे. पालकमंत्री केसरकर व आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी आराखडय़ात वेळीच निवासी व्यवस्थेचा समावेस  करून घ्यावा, असी मागणी जनतेतून होत आहे.

स्त्रिरोग तज्ञ नसल्याने
प्रसुती पेशंटांची गैरसोय

वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाच्या संरचनेप्रमाणे एमएस वा एमडी दर्जाचा वैद्यकीय अधिकारी गेली 10 वर्षे उपलब्ध नाही. तसेच एमबीबीएस दर्जाचे डॉक्टर्स नाहीत. या रुग्णालयात पूर्वी प्रसुतीचे पेशंट मोठय़ा प्रमाणात यायचे. गेल्या काही वर्षात स्त्रिरोग तज्ञच नसल्याने प्रसुतीचे पेशंट सावंतवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे नवीन हॉस्पिटलबरोबरच डिलिव्हरी व मेडिसीन स्पेशालिस्ट डॉक्टरांसह एमबीबीएस डॉक्टर्स मिळावेत, अशी मागणी होत आहे.