|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » गेल्यावर्षी फौजदार, यंदा हवालदार!

गेल्यावर्षी फौजदार, यंदा हवालदार! 

सावंतवाडी :  फरारी आरोपींना शोधण्यासाठी मी सावंतवाडीत आलो आहे. माझी 17 वर्षे भटकंती सुरू आहे. आरोपींच्या सगळय़ा नोंदी माझ्याकडे आहेत… गेल्यावर्षी फौजदार, यंदा हवालदार बनून आलो आहे…

  हे बोल आहेत एका बहुरुप्याचे. पोटापाण्यासाठी दारोदारी भटकावे लागत असतांना त्यांना आपला रुबाब राखण्यासाठी वेगळी वेशभूषा करावी लागते. तसेच भाषाही खास वापरावी लागते. त्यातून त्यांना काही पैसे मिळतात. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो.

 सध्या गणेशोत्सवात सावंतवाडी तालुक्यातील गावा-गावांमध्ये बहुरुप्यांचे दर्शन होत आहे. उस्मानाबाद (धाराशीव) येथील अर्जुन शिंदे हे उदरनिर्वाहासाठी हवालदाराचा वेश परिधान करून मनोरंजन करत आहेत. ते पोलीस हवालदाराची हुबेहुब नक्कल करून लोक जे देतील त्यात समाधान मानत आहेत. लोकांकडून पूर्वीसारखा मानसन्मान मिळत नाही, अशी खंतही ते व्यक्त करतात.

  अर्जुन हा धाराशीव जिल्हय़ातील समुद्रवाणी गावचा रहिवासी आहे. आई-वडिलांनी मोलमजुरी करून बारावीपर्यंत शिक्षण दिले. पोलीस होण्याची इच्छा होती. मात्र , किल्लारी येथील भूकंपात घर उद्ध्वस्त झाल्याने ती इच्छा अपूर्ण राहिली.
प्रारब्धाने साथ न दिल्याने पोलीस बहुरुपी बनून जनतेचे मनोरंजन करण्यात मी समाधान मानतो. पूर्वीच्या काळात बहुरुप्याला राजाश्रय होता. या कलेकडे आदराने व सन्मानाने पाहिले जात होते. मात्र, सध्याच्या काळात बहुरुप्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. लोकांकडून सन्मान मिळत नाही. राम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांची वेशभूषा करून लोकांचे मनोरंजन करतो, असे तो सांगतो.