|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » प्लास्टिक अंडय़ांचा ‘आभासी’ फंडा!

प्लास्टिक अंडय़ांचा ‘आभासी’ फंडा! 

सावंतवाडी : ‘आमच्याकडे महाराष्ट्रातून अनेक विवाद्य खाद्यवस्तू अन्न व भेसळ प्रतिबंधक खाती व इतर माध्यमातून तपासणीसाठी येत असतात. ‘प्लास्टिक अंडी’ या नावाखाली खुद्द पुण्यातून व इतर ठिकाणाहूनही अंडी तपासणीसाठी आमच्याकडे आली होती. सावंतवाडी शहरातूनही अशा तक्रारीची अंडी आमच्याकडे आली होती. पण पूर्ण तपासांती आम्ही सांगत आहोत की, ही सर्व अंडी नैसर्गिकच अंडी होती. प्लास्टिकची अंडी असलेला एकही प्रकार आमच्या प्रयोगशाळेतून निष्पन्न झालेला नाही. तक्रार असलेली अंडी ही कथित प्लास्टिकची अंडी असल्याचे महाराष्ट्रात एकही उदाहरण आम्हाला आढळलेले नाही’, असा निर्वाळा पुणे येथील पब्लिक हेल्थ लॅबोरेटरीचे (राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे) उपसंचालक डॉ. एस. एम. बाक्रे यांनी ‘तरुण भारत’शी बोलतांना दिला.

‘फेसबुक, व्हॉट्सऍप ही लोकप्रिय समाजमाध्यमे आहेत. त्याचे काही चांगले उपयोग आहेत. तसे काही वाईटही आहेत. खऱया खोटय़ा गोष्टींची सारासार विवेकबुद्धीने खात्री करून घेणारा संपादक या माध्यमांना नसतो, ही या माध्यमांची मर्यादा आहे. त्यामुळे ‘प्लास्टिकची अंडी’सारख्या आभासी अफवा पसरतात. त्यात तथ्य नाही’, असे डॉ. बाक्रे म्हणाले.

एका प्रश्नावर डॉ. बाक्रे यांनी पुढे सांगितले की, ‘संडे हो या मंडे, रोज खावो अंडे’ हे कँपेन चालविणाऱया नॅशनल एग्ज सोसायटीनेही मध्यंतरी पुण्यात मिटिंग घेऊन या अफवांचे खंडण केलं होतं. ‘प्लास्टिक अंडी’ हा अशक्य अवघड प्रकार असल्याचे नमूद केले होते, पण या अशा अफवा आजही पसरतात, हे चुकीचे आहे.’

‘मुळात ‘प्लास्टिक अंडी’ बनवणं हा अवघड व बराचसा अशक्य प्रकार आहे आणि समजा तो बनविलाच तरी त्याचा उत्पादन खर्च नैसर्गिक अंडय़ांपेक्षा जास्त येईल आणि धरून चला की कुणीतरी ते बनविलेच तर त्याचे पुढे काय करायचे? ते खाता येईल का? त्यात अंडय़ाची चव व गुणधर्म असेल काय? त्यात पोषणमूल्य असेल काय? ते पाहिल्याक्षणी अंडे नाही, हे सहज ओळखता येणार नाही काय? त्यामुळे बेमालूम नैसर्गिक अंडय़ासारखे प्लास्टिकचे अंडे तयार करून ते फसवून नैसर्गिक अंडे म्हणून विकणे व फसवून नैसर्गिक अंडे असल्याचे भासवून खाण्यात आणले जाणे हा प्रकार असंभव आहे’, असे डॉ. बाक्रे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ‘सर्वप्रथम नैसर्गिक अंडय़ांचे जे कवच असते ते सच्छिद्र असते. ही सच्छिद्रता प्लास्टिकच्या कवचात शक्य नाही. नैसर्गिक अंडय़ांच्या कवचात कॅल्शियम असते. प्लास्टिक कवचात कॅल्शियम कसे आणणार? सच्छिद्र, कॅल्शियम असलेले नैसर्गिक अंडय़ाचे कवच कुणी बनवूच शकत नाही आणि बनवले तरी त्याचा बनावटपणा हा लगेच लक्षात येणारा असेल. त्यामुळे ‘नैसर्गिक अंडय़ा’त मोठय़ा प्रमाणावर ‘प्लास्टिकची अंडी’ मिसळवून विकले जात आहे, हा प्रचार आणि समज चुकीचा आहे. तुम्ही नैसर्गिक अंडं फोडलं, त्यातला पिवळा बलक बाहेर काढला तर कवचाच्या आतल्या बाजूने पातळ पापुद्रय़ासारखा जो भाग असतो, तो नैसर्गिकच असतो. बऱयाचदा उलट सुलट अफवा आधीच कानावर आल्याने लोक नैसर्गिक अंडय़ाच्या कवचाच्या आतील त्या पातळ पापुद्रय़ाचा संशय घेत ते अंडे बहुचर्चित प्लास्टिकचे असल्याचा समज करून घेतात, जो चुकीचा आहे’, असं डॉ. बाक्रे यांनी स्पष्ट केलं.

आमच्याकडे तपासणीसाठी अंडय़ाखेरीज तांदूळ प्लास्टिकचे आहेत, अशाही पाच सात तक्रारी राज्यातून आल्या होत्या. आम्ही त्या तांदूळ नमुन्यांची तपासणी केली. ते सर्व तांदूळ नमुने नैसर्गिक तांदळाचेच होते, असे स्पष्ट झाले, अशी माहिती डॉ. बाक्रे यांनी एका प्रश्नावर दिली.

‘आर्टिफिशियली’ बनवणे शक्य असेलही पण…

‘आता तर प्लास्टिकचे तांदूळही मार्केटमध्ये खऱया तांदळात मिक्स करून विकले जात असल्याच्या चर्चा आहेत. पण प्लास्टिकचे अंडे काय किंवा प्लास्टिकचे तांदूळ काय, या संकल्पना आधी समजून घ्यायला हव्यात, असे सांगून डॉ. एस. एम. बाक्रे म्हणाले, ‘आर्टिफिशियली’ कुणी अंडय़ासारखे प्लास्टिकचे अंडे बनवेलही. पण त्याच्या निर्मितीचा खर्च नैसर्गिक अंडय़ात त्याची भेसळ करून ते विकणे परवडणारे असणार नाही. दुसरे समजा जरी विकले गेले तरी खाण्याचे काय? चवीचे काय? पोषणमूल्याचे काय? समजा प्लास्टिकचे तांदूळ भेसळ करून आले. नैसर्गिकरित्या तांदूळ पिकवण्यापेक्षा कृत्रिमरित्या तयार करणे महागडे ठरणार नाही काय? मग प्लास्टिकचे तांदूळ परवडतील काय? प्लास्टिक हलके असते, ते पाण्यावर तरंगणार. उकळले, तापवले तर प्लास्टिक वितळणारच. त्याला वास वेगळा येणार. परत प्रश्न, खाण्याचे काय? चवीचे काय? पोषण मूल्याचे काय? अहो, जेवणात मीठ कमी जास्त झाले तरी आपल्याला लगेच लक्षात येते. त्यामुळे एवढी मोठी बनवेगिरी असेल तर ती लपून राहणारच नाही. ‘आर्टिफिशियली’ प्लास्टिकचे अंडे वा तांदूळ बनविणे हा वेगळा भाग आहे. पण मोठय़ा प्रमाणात खऱया अंडय़ात वा तांदळात भेसळ करून विकले जातात आणि ते खातात, या दाव्यात तथ्य वाटत नाही’, असेही डॉ. बाक्रे म्हणतात.