|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » विहिरीत पडलेला बिबटय़ा शिडीवरून पसार

विहिरीत पडलेला बिबटय़ा शिडीवरून पसार 

तालुक्यातील गणेशगुळे येथील घटना

वनविभागाचे पकडण्याचे प्रयत्न ठरले व्यर्थ

ग्रामस्थांमध्ये पसरलीय मोठी घबराट

 

प्रतिनिधी /रत्नागिरी

तालुक्यातील कुर्धे गावात बुधवारी रात्री पडक्या विहिरीत पडलेल्या बिबटय़ामुळे गावात खळबळ माजली होती. विहिरीत पडलेल्या मात्र जिवंत असलेल्या बिबटय़ाला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाने या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत आटोकाट प्रयत्न केले. मात्र बिबटय़ाने विहिरीत सोडलेल्या शिडीवरून शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बाहेर पळ काढल्याने वनविभागाचीही फसगत झाली. बिबटय़ाच्या पलायनाने ग्रामस्थ पुरते घाबरले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून गणेशगुळे परिसरात बिबटय़ाचा मुक्त संचार सुरू आहे. महिनाभरापूर्वी गणेशगुळे येथील वजरेकरवाडीतील एका महिलेवर बिबटय़ाने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर जनावरांची पाठ धरल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. मंगळवारी रात्री कुर्धे येथील एका पाडय़ावर हल्ला केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. गणेशगुळे व कुर्धे परिसरात बिबटय़ाचा मुक्त संचार सुरू आहे. त्यानंतर वनविभागाने परिसरात पिंजरा बसवला. परंतु अद्यापही या पिंजऱयाचा उपयोग झाला नव्हता. पिंजरा चुकीच्या ठिकाणी बसवलेला आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

मंगळवारी रात्री कुर्धे येथील तुषार नागवेकर यांच्या घराजवळ असलेल्या दुचाकीची सीट फाडण्याचा प्रकार घडला होता. भुकेपोटी गोठय़ातील पाडय़ावर हल्ला करून त्याला बिबटय़ाने ठार मारल्याचे ग्रामस्थांमधून सांगण्यात येत आहे. गुरूवारी सकाळी संतोष चव्हाण यांच्या घराशेजारील जुन्या पडीक विहिरीत बिबटय़ाच्या गुरगुरण्याचा आवाज आला. चव्हाण यांनी जाऊन पाहिले असता बिबटय़ा पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या बाबतची खबर पोलीस पाटलांकडे दिली. पोलीस पाटीलांनी बिबटय़ाला पकडण्यासाठी वनविभागाला कळविले. काही वेळातच वनविभागाचे अधिकारीही त्या ठिकाणी धावले.

विहिरीत पडलेल्या बिबटय़ाला बाहेर काढण्यासाठी पिंजराही लावण्यात आला. मात्र अरुंद विहिरीमुळे त्यात अडचणी येत होत्या. गुरूवारी सायंकाळी उशिरापर्यंत त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले. मात्र वनखात्याने लाकडी शिडी तयार करून विहिरीमध्ये सोडली. खूप मेहनत घेऊनही बिबटय़ा विहिरीतून काही बाहेर येत नव्हता. त्या ठिकाणाहून ग्रामस्थ व वनखात्याचे पोलीस अधिकारी निघून गेले. विहिरीमध्ये पडलेल्या त्या बिबटय़ाने शिडीचा आधार घेऊन यादिवशी रात्री पलायन केले. सकाळी जाऊन पाहिले असता विहिरीत बिबटय़ा नसल्याचे दिसून येताच सारेच अचंबित झाले. मात्र बिबटय़ाच्या पलायनाने ग्रामस्थांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related posts: