|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पेन्शन मिळण्यासाठी दौलतवाडीतील लाभार्थ्यांचे तहसिलदारांना निवेदन

पेन्शन मिळण्यासाठी दौलतवाडीतील लाभार्थ्यांचे तहसिलदारांना निवेदन 

प्रतिनिधी/ कागल

दौलतवाडी ता. कागल येथील संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी योजनेंतर्गत असणाऱया लाभार्थ्यांनी कागल तहसिलदारांना निवेदन दिले. गेली सहा महिने पेन्शन न मिळाल्याने निवेदन दिले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, संजय गांधी, श्रावणबाळ व इंदिरा गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना शासनामार्फत बायोमेट्रीक पध्दतीने अनुदान दिले जाते. या लाभार्थ्यांमध्ये विधवा, अंध, अपंग, परितक्त्या, वृध्द स्त्री-पुरूष यांचा समावेश आहे. कांही लाभार्थ्यांचा या पेन्शनवरच उदरनिर्वाह व औषधोपचाराचे साधन हेच अनुदान आहे. परंतु गेल्या सहा महिन्यापासून आयसीआयसीआय बँकेमार्फत बायोमेट्रीक पध्दतीने दिली जाणारी पेन्शन जमा नाही, अंगठय़ाचे ठसे जुळत नाहीत अशा अनेक कारणास्तव वेळेत मिळत नाही. तसेच फिनो कंपनीद्वारे वाटप करणाऱया कर्मचाऱयांना याबाबत विचारणा केली असता, तुमचे अनुदान तुम्ही उचल केली आहे, अशीही उत्तरे मिळत आहेत. याबाबतही चौकशी व्हावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

तसेच पेन्शन बायोमेट्रीक पध्दतीने मिळते, ती पध्दत बंद करून आमचे बँक खात्यावर जमा करावी. ते पण वेळेत जमा करावे. जेणेकरून लाभार्थ्यांची हेळसांड होणार नाही. तसेच बऱयाच लाभार्थ्यांचे कोणतीही सुचना न देता पेन्शन बंद केली आहे. अशा लाभार्थ्यांची पेन्शन पुर्ववत सुरू करावी. आम्हाला न्याय द्यावा अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर दौलतवाडीतील लाभार्थ्यांनी सहय़ा केल्या आहेत.