|Saturday, January 25, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पुढारी कसे ओळखावेत

पुढारी कसे ओळखावेत 

लहानपणी पुढारी सहज ओळखता येत. वर्तमानपत्रात किंवा मासिकात वगैरे व्यंगचित्रे असायची त्यात पुढारी म्हणजे पांढरा लेंगा-झब्बा-गांधी टोपी घातलेला आणि पोट सुटलेला असा दाखवलेला असे. ही ओळख अनेक दशके टिकली. नंतर केव्हातरी पुढारी बदलले. इतके बदलले की व्यंगचित्रात किंवा वर्णनात मावेनात. शिवाय ते सारखे बदलत राहिले. रोगजंतूंची प्रत्येक नवी पिढी पूर्वसुरींपेक्षा नवी असते आणि तिच्यासाठी सतत नवी प्रतिजैविके बनवावी लागतात तसाच हा प्रकार झाला.

सांप्रती आपल्या आसपास वावरणाऱया पुढाऱयांचे थोडक्मयात वर्णन सादर करीत आहे. मात्र हा लेख छापून येईतो त्यात वर्णिलेले पुढारी अस्तंगत होऊन त्यांची जागा नवे पुढारी घेणारच नाहीत अशी खात्री देता येत नाही.

पुढारी दोन प्रकारचे. स्थानिक आणि हायकमांड. स्थानिक पुढारी आपल्या भोवती असतात. ते केव्हाही कोणत्याही राजकीय पक्षात असू शकतात. काळसर वर्ण, पाच ते पावणेसहा फूट उंची, भव्य केसाळ छाती, तिच्याखाली सुटलेले पोट, अंगावर कडक इस्त्रीचे कपडे, अंगावर सोन्याचे मुबलक दागिने, हातात महागडा मोबाईल अशी आकृती. लेटेस्ट बाईकवर किंवा कारमध्ये ते फिरतात. गल्लीतल्या प्रत्येक फ्लेक्सवर विकट हसताना दिसतात. ते इच्छुक किंवा प्रत्यक्ष लोकप्रतिनिधी असू शकतात. पण किंग किंवा प्रिन्स असले तरी ते किंगमेकर नसतात.

हायकमांड पुढारी किंगमेकर असतात. हे बॉडीबिल्डर असतातच असे नाही. नेहमी आपल्याला दिसतातच असे नाही. फ्लेक्सवर यांची छबी स्थानिक नेत्यांच्या छबीच्या वर आणि थोडी मोठी असते. तिकीट देणे-कापणे; कोणालाही लफडय़ात गुंतवणे-त्यातून सोडवणे यांच्या हातात असते. ते सर्वांशी सौजन्यपूर्वक हसतात आणि बोलतात. जे करायचे ते न बोलता करतात. हायकमांड पुढाऱयांचे आपापसातले संबंध सौहार्दपूर्ण असतात. हाणामाऱया फक्त स्थानिक पुढारी करतात. 

पुढाऱयांची लेटेस्ट लक्षणे अशी

नोटाबंदी झाली तेव्हा नोटा बदलण्यासाठी ते रांगेत उभे असलेले दिसले नव्हते. ते गॅस सिलेंडरची सबसिडी सोडत नाहीत. कोणत्याही बुवाच्या पाया पडतात. बलात्काराच्या आरोपावरून अटक झालेल्या बुवाचा निषेध करीत नाहीत. त्यांच्या घरासमोर किंवा बंगल्यात ढोलपथके दोन-दोन महिने सराव करीत नाहीत किंवा डीजे-डॉल्बीचे आविष्कार दाखवीत नाहीत. त्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरत नाही. त्यांची वीज जात नाही. त्यांचे नेट अविरत चालू असते.

Related posts: