|Sunday, January 26, 2020
You are here: Home » उद्योग » यांत्रिकीकरणामुळे 7.5 लाख रोजगारावर घाला

यांत्रिकीकरणामुळे 7.5 लाख रोजगारावर घाला 

अल्प कौशल्य असणाऱया भारताचा रोजगार संकटात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी उद्योग क्षेत्रात आता यांत्रिकीकरणाचा मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीसह भारतासारख्या विकसनशील देशातील रोजगारावर त्याचा परिणाम दिसून येईल. यांत्रिकीकरणामुळे पुढील पाच वर्षात देशातील अल्प कौशल्य असणारा 7.5 लाख रोजगार संपुष्टात येईल असे एचएफएस रिसर्चने म्हटले आहे.

माहिती तंत्रज्ञान आणि बीपीओ क्षेत्रात यांत्रिकीकरण, कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याने अल्प कौशल्य असणाऱया कामगाराच्या रोजगारावर संकट येईल. मध्यम आणि उच्च कौशल्य असणाऱया कर्मचारी, जे अधिक धोकादायक असणारे काम करतात, त्यांना अधिक अनुभवाची आवश्यकता, उच्च व स्वतंत्र विचारसरणी, मशिन लर्निंग यासारख्या कौशल्यांवर वर्चस्व असणे आवश्यक आहे. मध्यम आणि उच्च कौशल्य असणारा 3 लाख रोजगार 2022 पर्यंत तयार होईल असे अहवालात म्हणण्यात आले.

मध्यम कौशल्य असणाऱयांसाठी मागणी वाढत आहेत. खास करून ग्राहक, कर्मचारी यांच्या माहितीचे नियंत्रण राखण्यासाठी अधिक मागणी वाढेल. सध्या मानवाचा रोजगार यांत्रिकीकरणामुळे कमी होत आहे. एखाद्या क्षेत्रात अधिक सुलभ अथवा योग्यता येण्यासाठी मशिन लर्निंगचा वापर वाढत आहे. याचा परिणाम उच्च कौशल्य असणाऱया रोजगार निर्मितीत वाढ होण्यास मदत होईल. भारत आणि अमेरिकेतील सेवा क्षेत्रात 2022 पर्यंत 10 टक्के रोजगार घटेल असे म्हणण्यात आले. जागतिक बँकेच्या 2016 च्या ‘डिजिटल डिव्हिडन्ड्स’ नावाच्या अहवालात यांत्रिकीकरणामुळे भारतातील 69 टक्के रोजगारावर संकट असल्याचे म्हणण्यात आले होते. भारत सरकारने ऑगस्ट महिन्यात यांत्रिकीकरणामुळे देशातील रोजगाराला धोका नसून अर्थव्यवस्थेत नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे म्हटले होते.

Related posts: