|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ऐन गणेशोत्सवात ‘प्रभूं’वर अवकृपा!

ऐन गणेशोत्सवात ‘प्रभूं’वर अवकृपा! 

सुरेश प्रभूंच्या खाते बदलाने कोकणवासीयांच्या अपेक्षा फोल पियुश गोयल यांच्या कामगिरीकडे लक्ष

मार्गताम्हाने

 देशात सलग दोनवेळा झालेल्या रेल्वेच्या अपघाताने दिलेला रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा, मात्र तो पंतप्रधानांनी न स्वीकारता रविवारी अचानक रेल्वे खाते काढून घेऊन त्यामध्ये बदल केल्याने कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू यांच्या खाते बदलाने कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या म्हणजेच चाकरमान्यांच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. कोकणातील आवडता व लाडका सण गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतानाच कोकणावर झालेली ही प्रभू अवकृपा आणि परतीच्या प्रवासाला लागलेल्या चाकरमान्यांचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून झालेले हाल अशा लागोपाठ घडलेल्या घटना सर्वसामान्य कोकणी माणसाला नक्कीच चटका लावणाऱया ठरल्या आहेत.

   केंद्रात रेल्वे मंत्री झाल्यावर कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू यांच्याकडून कोकण रेल्वे मंडळ व चाकरमानी प्रवाशांच्या मोठय़ा अपेक्षा होत्या. कोकण रेल्वेला सुगीचे दिवस येतील तसा विश्वास बळावलाही होता. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, विद्युतीकरण, चिपळूण-कराड नवा रेल्वे मार्ग, मालवाहतूक व व्यापारीकरणाच्यादृष्टीने रेल्वेमार्ग कोकणातील प्रमुख बंदरांना जोडणे, कोकणासाठी स्वतंत्र गाडय़ा सोडणे अशा नवनवीन योजना आखून त्या अंमलात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरुही केले होते. त्यामुळे कोकण रेल्वेच्या रुपाने कोकणचा विकास होईल, अशी आशा समस्त कोकणवासियांना होती. मात्र देशात आठ दिवसांपूर्वी लागोपाठ झालेल्या रेल्वे अपघातांची जबाबदारी स्वीकारुन प्रभुंनी रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा पंतप्रधानांनी न स्वीकारल्यामुळे प्रभूंकडील रेल्वे खाते अबाधित राहील असे कोकणवासियांना वाटले होते. मात्र रविवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तार व खाते बदलांमध्ये प्रभूंचे रेल्वे खाते काढून ते पियुष गोयल यांच्याकडे देण्यात आले आणि प्रभूंकडे वाणिज्य खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे प्रभूंवर पर्यायाने समस्त कोकणावर ही अवकृपाच झाली असे मत व्यक्त होत आहे.

   प्रभूंच्या या खाते बदलाच्या या नाटय़मय घडामोडीपूर्वीच म्हणजे दोन दिवसांपूर्वी गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासाला लागलेल्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. विशेषतः रत्नागिरी, चिपळूण, खेड येथील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. तळकोकणातून तुडूंब भरून आलेल्या रेल्वेगाडय़ांचे दरवाजे रत्नागिरी, चिपळूण, खेड येथे उघडलेच गेले नाहीत. आतील प्रवाशांनीच हे दरवाजे बंद करुन ठेवले होते. ऐन उत्सवात किंवा हंगामात कोकण रेल्वे प्रशासन भरमसाठ गाडय़ांची घोषणा करते. चाकरमानी बुकिंगही करतात. मात्र गाडय़ा उशिराने धावणे, बसायला न मिळणे, जनरल डब्यातून प्रवास करणारे प्रवासी जागा न मिळाल्याने आरक्षित डब्यात घुसणे त्यामुळे आरक्षण केलेल्या प्रवाशांना होणारा त्रास पाहता हा प्रवास कोकणी जनतेसाठी जीवघेणा ठरला आहे.

  कोकण रेल्वे कोकणातील सर्वसामान्य जनतेसाठी वरदान ठरली आहे. स्वस्त प्रवास व मुंबई, पुणे यासारखी महानगरे जवळ असल्याने प्रवाशांना कोकण रेल्वेचा मोठा आधार वाटतो. एकेरी मार्ग असताना बाहेर प्रांतात जाणाऱया गाडय़ा सोडणे त्यामुळे कोकणात ये-जा करणाऱया गाडय़ांच्या वेळापत्रकावर परिणाम होणे हे आता नित्याचेच झाले आहे. कोकणच्या नावाने रेल्वे महामंडळ झाले खरे, मात्र फायदा परराज्यात जाणाऱया लोकांनाच अधिक होते ही ओरड नेहमीचीच आहे. यासाठी कोकणातील राजकीय लोकप्रतिनिधींची अनास्थाही तितकीच कारणीभूत आहे. कोकणचा सुपूत्र देशाचा रेल्वेमंत्री झाल्याने आता आपला प्रवास सुखकर होईल, अशी मोठी आशा कोकणातील चाकरमानी, प्रवाशांना असतानाच प्रभूंच्या रेल्वे खाते बदलाने कोकणच्या रेल्वे विस्तारात पर्यायाने संपूर्ण विकासात एकप्रकारे विघ्नच आल्याची भावना व्यक्त होत आहे. याचवेळी घोषणा झाल्या, कौतुक झाले पण निधी येण्याआधीच प्रभूंवर अवकृपा झाल्याचेही म्हटले जात आहे.

Related posts: