|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सुजाण आणि स्मार्ट पालकत्व… एक आव्हान

सुजाण आणि स्मार्ट पालकत्व… एक आव्हान 

माझी सारखी चिडचिड होते, मी म्हणे आत्मकेंद्री बनत चाललो आहे म्हणून आई मला तुझ्याकडे घेऊन आली आहे.  पण मी तरी काय करू? शाळा, अभ्यास, क्लासेस यामधून जराही उसंत नाही…सुट्टीला गावी जायचं म्हटलं तर यांना सुट्टी नाही. मग मी आणि ते व्हेकेशन कॅम्प्स, आई-बाबा दोघेही नोकरीत व्यस्त… त्यांना माझ्याशी गप्पा मारायलाही सवड नाही. ते म्हणतात, आम्ही तुला सर्व मुलांपेक्षा म्हणशील ते आणून देतो ना…. मग तू शहाण्यासारखंच वागलं पाहिजेस. प्रत्येक वेळी टॉपर असलं पाहिजे. पण ताई… मला इतर काहीच नकोय ग, मला माझ्या आई-बाबांचा वेळ हवाय… प्लीज तू समजावून सांगशील का हे सगळं आईला?

अगदी काकुळतीला येत विनवणीच्या स्वरात बोलणाऱया त्या तेरा-चौदा वर्षाच्या चुणचुणीत मुलाचं ते बोलणं खरोखरंच विचार करायला लावणारं होतं. एकंदरच व्यस्त जीवनशैली, जीवघेणी स्पर्धा, मुलांचे शिक्षण-करिअर यांचा पालकांवर येणारा ताण, त्यातून केल्या जाणाऱया अवास्तव अपेक्षा. पर्यायाने मुलांवर येणार ताण, पाल्याला कशाची चणचण भासू नये म्हणून धडपडणारे पालक, रोजच्या धकाधकीच्या जीवनात हरवत चाललेला संवाद, या साऱयामधून सुवर्णमध्य साधत मुलांची प्रगती, शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य निकोप रहावं म्हणून अलीकडच्या काळात घ्यावे लागणारे विशेष परिश्रम, म्हणजे.. थोडक्मयात सुजाण आणि स्मार्ट पालकत्व हे एक आव्हानच आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. खरंतर पालक-पाल्य संबंध त्या अनुषंगाने येणाऱया अनेक समस्या हा विस्तृत लेखाचा विषय आहे.

सुरुवातीच्या उदाहरणातील मुलासारखी अनेक मुलांची स्थिती असते. आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या माणसांसाठीच अनेकदा वेळ काढणं अवघड होऊन बसतं. वडिलांना ऑफिस टुर्स, मिटिंग्ज यामधून फुरसत मिळत नाही. आईही नोकरी करणारी असेल तर नोकरी आणि घरकाम, बाहेरची कामं यातून वेळ काढणं अवघड होतं. मुलांच्या शाळा, अभ्यास, टय़ूशन, एखाद्या खेळाचं वा कलेचं शिक्षण यामधून त्यांनाही मोकळीक नसते… किंबहुना अनेकदा त्यांना व्यस्त ठेवलं जातं. आज बहुतांश शहरांमधून, मोठय़ा गावांमधून सगळय़ांची आयुष्यं अशीच आहेत. अनेकदा या व्यस्त जीवनशैलीला काही पर्यायही नसतो. परंतु अधूनमधून प्रयत्नपूर्वक वेळ काढून कुटुंबीयांसमवेत एकत्र घालवणं हा आयुष्यातला महत्त्वाचा भाग आहे.

‘ए, आई दमून आली आहे हं. तिच्या जास्त मागे मागे करू नको’ किंवा ‘अरे, बाबा तुमच्यासाठीच कष्ट करतात ना. किती खेळणी, कपडे आणतात? मग सुट्टीच्या दिवशी नका त्रास देऊ त्यांना! बसू दे ना जरा स्वस्थपणे..’ असे अनेक संवाद कानावर येतात. परंतु अनेकदा ही गोष्ट लक्षात येत नाही की मुलांसाठी आपण देऊ न शकलेल्या वेळाची किंमत वा आई-वडील जवळ असावेत या मुलांच्या अपेक्षेची भरपाई इतर कशानेच करता येत नाही. जे पालक प्रयत्नपूर्वक आपल्या पाल्यासाठी वेळ काढून नियमित त्याच्यासोबत संवाद साधतात त्यांची मुले मनाने सुदृढ, समंजस आणि एकमेकांप्रती जिव्हाळा जपणारी असल्याचे निदर्शनास येते. ‘बालपणीचा काळ सुखाचा’ हे गणित आता थोडं बदललेलं दिसतं. मुलांनाही या स्पर्धेच्या गतिमान युगामध्ये अनेक ताणतणावांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे त्यांच्या बालपणी त्यांना वेळ देणं, त्यांच्या यशाचं मोकळेपणानं केलेलं कौतुक, मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करायला दिलेली संधी, छोटी छोटी ध्येये निर्माण करून ती गाठण्यासाठी दिलेले प्रोत्साहन, अपयशाच्या प्रसंगी दिलेला आधार, तू आम्हाला आवडतोस/आवडतेस याची करून दिलेली जाणीव यामुळे मुलांची स्वतः बद्दलची आणि जीवनाबद्दलची सकारात्मक प्रतिमा तयार होत असते.

‘जाऊ दे… सोडून दे… तू बावळटच आहेस. हे तुला जमणं कठीणच’ ही वाक्मये मुलांच्या आत्मविश्वासाला सुरुंग लावतात. याउलट ‘चल आपण प्रयत्न करूया हा…’ एवढं एक वाक्मय त्यांना पुरेसं असतं. मुलांच्या भावना समजून घेऊन वागणे आणि त्या व्यक्त करायला शिकवणे हेही कौशल्यच आहे. आपला मुलगा अथवा मुलगी स्पर्धेत कशी टिकेल याची पालकांना चिंता असते. त्याचा ताण पालकांवर आणि पर्यायाने मुलांवर येत असतो. मुलांनी ‘ज्ञानार्थी असावे परीक्षार्थी नसावे’ हे वाक्मय बोलायला किंवा ऐकायला छान वाटले तरी आयुष्यात परीक्षेचा टप्पा हा ओलांडावाच लागतो. म्हणूनच योग्य वयापासून अभ्यासातील कौशल्ये विकसित करणेही महत्त्वाचे असते. त्यासाठी ध्येयनिश्चिती, शाळेत-वर्गात लक्षपूर्वक ऐकणे, नोट्स काढण्याचे तंत्र, एकाग्रता, स्मरणशक्ती, वाचन, लेखन, संभाषण कौशल्य, वेळेचे गणित, परीक्षा तंत्र आणि ताणाशी सामना यासाठी पालकांनी स्वतः वेळ देणं गरजेचं आहे.

खरंतर मुलांची स्मरणशक्ती अफाट असते. परंतु ती वापरली गेली नाही तर ती कमी कमी होऊ लागते. कुणाच्याही स्मरणशक्तीच्या बाबतीत असेच असते. परंतु प्रत्येक मुलाची शिकण्याची एक विशिष्ट पद्धत असते. काही मुले नेहमीच्या ऐका, लिहा, वाचा, पाठ करा याप्रकारे शिकतात. काही चक्क उडय़ा मारत येता-जाता शिकतात. काही प्रत्यक्ष पाहून ते चित्र एकत्रितपणे लक्षात ठेवून शिकतात. आपला मुलगा/मुलगी नेमका कसा किंवा कशी आहे हे नीटपणे स्वतःला कळते तर मग अभ्यास करताना समस्या उद्भवण्याची शक्मयता कमी राहते. आपला मुलगा किंवा मुलगी सर्वांग परिपूर्ण असावा/असावी ही इच्छा आईवडिलांच्या मनात असते परंतु त्या मुलाच्या अंगभूत क्षमता, नैसर्गिक गुणांची जोपासना कशी करता येईल याकडे लक्ष दिलं जाणं अनेकदा जास्त योग्य ठरतं. याबाबत इथे एका कथेचा मी उल्लेख करेन. महाभारतातील एक गोष्ट नेहमी अर्धवटच सांगण्यात येते. याचा पुढचा भाग सांगितलाच जात नाही. ती गोष्ट अशी गुरु द्रोणाचार्यांनी कौरव-पांडवांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. पोपटाच्या एका डोळय़ाचा वेध घेण्याची परीक्षा…! फक्त अर्जुनाने एकाग्रपणे नेम धरला आणि तो वेध घेत सफल झाला… एवढीच गोष्ट सांगून ती एकाग्रता लादू पाहण्याची अनेकांची मानसिकता असते परंतु महर्षि व्यासांची गोष्ट इथेच संपत नाही. ज्यांना पोपटाच्या डाव्या डोळय़ाचा वेध घेता आला नाही, त्यांच्या हातातून द्रोणाचार्यांनी धनुष्यबाण काढून घेतला हे खरं, परंतु त्या प्रत्येकाच्या कुवतीनुसार दुसरी शस्त्रं त्यांच्या हातात देऊन त्या त्या क्षेत्रात त्यांना सर्वश्रे÷ बनवलं. दुर्योधन आणि भीम श्रे÷ गदाधर बनले. युधि÷िर तलवार बहाद्दर बनला, शरीरानं कमकुवत असल्याने कोणतंही शस्त्र न उचलू शकणाऱया नकुलाला त्यांनी अश्वविद्या आणि सहदेवाला शकुन शास्त्राबरोबरच ज्याला आधुनिक भाषेत मॅनेजमेंट म्हणतात ते ‘व्यवस्थापन शास्त्र’ शिकवलं. ही संपूर्ण गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे.

आपल्या मुलांच्या क्षमतेकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा असा व्यापक व उदार असेल, त्यामध्ये सोयीस्कर त्या अर्ध्याच गोष्टीचा संकुचितपणा नसेल तर मुलांच्या जीवनाला सुंदर दिशा देण्यात सफलता मिळू शकते. काल्पनिक डोलारा उभारत मुलांच्या क्षमता, इच्छा जाणून न घेता आपल्या इच्छा त्यांच्यावर लादल्या तर मात्र यशाचा मार्ग दूरच राहतो. आनंददायी पालकत्व, मुलांच्या उपजत गुणांचा शोध घेण्याचा आणि त्यांना पाठिंबा देऊन ते पुढे नेण्याचा प्रयत्न करणं हे सुजाण पालकत्वाच्या दिशेनं टाकलेलं पाऊल ठरेल. अवास्तव लाड करण्यापेक्षा समजून घेऊन त्यांना वेळ देणं महत्त्वाचं. मूल स्मार्ट होण्यासाठी आपल्या मुलातील क्षमता ओळखण्याचा स्मार्टपणा पालकांमध्ये असायला हवा हे मात्र
नक्की.