|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » क्रिडा » डेव्हिस चषकासाठी त्सोंगा, पॉलीकडे नेतृत्व

डेव्हिस चषकासाठी त्सोंगा, पॉलीकडे नेतृत्व 

वृत्तसंस्था/ पॅरिस

सर्बियाविरुद्ध डेव्हिस चषक उपांत्य लढतीसाठी फ्रान्सने 12 वा मानांकित जो विल्प्रेड त्सोंगा व 20 वा मानांकित ल्युकास पॉली यांच्यावर एकेरीची भिस्त ठेवली आहे. ही उपांत्य लढत दि. 15 ते 17 सप्टेंबर या कालावधीत खेळवली जाईल. 22 व्या मानांकित गोएल मॉन्फिल्सला मात्र त्यांनी राखीव खेळाडूत ठेवले आहे.

डेव्हिस चषक एकेरीच्या कारकिर्दीत त्सोंगाने 18 विजय व 7 पराभव तर पॉलीने 3 विजय व 1 पराभव अशी कामगिरी केली आहे. याशिवाय, पिएरे-हय़ुजेस हर्बर्ट व निकोलस महूत दुहेरीत फ्रान्सचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. 2010 फायनलनंतर दोन्ही संघात एकही डेव्हिस लढत झालेली नाही. 2010 मध्ये त्यावेळी सर्बियाने 3-2 अशी बाजी मारली होती. अर्थात, यंदा सर्बियाचा संघ नोव्हॅक ज्योकोव्हिकशिवाय मैदानात उतरत आहे.

ज्योकोव्हिक सध्या उजव्या ढोपराला झालेल्या दुखापतीमुळे खेळू शकत नाही. फ्रान्सने यापूर्वी 2014 मध्ये डेव्हिस चषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. पण, त्यावेळी त्यांना स्वित्झर्लंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. यंदा फ्रान्स-सर्बिया यांच्यातील विजेता संघ डेव्हिस चषक जेतेपदासाठी बेल्जियम-ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजेत्याविरुद्ध लढेल.