|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘स्मार्ट सिटी’तील कचरा मेरशी हायवेवर

‘स्मार्ट सिटी’तील कचरा मेरशी हायवेवर 

प्रतिनिधी/ पणजी

‘स्मार्ट सिटी’ पणजीतील कचरा चक्क राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 अ च्या (मेरशी जंक्शन – ओल्ड गोवा) मेरशी येथे दुतर्फा मोठय़ा प्रमाणात टाकण्यात आलेला असून यामुळे ‘स्वच्छ गोवा, स्वच्छ भारत’ योजनेची प्रुर थट्टा सुरु झाली आहे. वाहनचालकांना प्रचंड प्रमाणात दुर्गंधीच्या साम्राज्याला तेंड देत जावे लागत आहे. त्याचबरोबर या कचऱयाच्या ढिगाऱयांजवळ भटकी गुरे जमू लागल्याने त्यांचाही वाहनचालकांना त्रास होत आहे.

पणजीतील कचरा टाकायचा कुठे? ही गंभीर समस्या पणजी मनपासमोर निर्माण झालेली आहे. हतबल झालेल्या पणजी महापालिकेला मेरशी हायवेवर कचऱयाचे ढिग टाकण्यात कोण्या राजकीय नेत्याने परवानगी दिली कोणास ठाऊक, परंतु गेल्या 5 दिवसात पणजीतील गेला महिना दोन महिन्यात कुजत पडलेला कचरा टाकण्यासाठी जागा मिळाली. पणजीतील हा सारा कचरा रात्रीच्यावेळी राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा टाकण्यात आलेला आहे. या कचऱयात नेमके काय आहे समजत नाही. वरवर सुका कचरा वाटत असला तरी गेले दोन महिने हा कचरा पणजी पालिका हद्दीत विविध ठिकाणी कुजत पडलेला कचरा होता. तो उचलून मेरशी हायवेवर टाकण्यात आला आहे.

कचऱयाच्या दर्शनाने स्मार्ट सिटीत आगमन

स्मार्ट सिटीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कचऱयाचे दर्शन आणि दुर्गंधी पाहून नंतर शहरात जायचे! शेजारील राज्यातून येणाऱया मंडळींना गोव्याचे हे एक वेगळे दर्शन त्यातून दिसू लागलेय. साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात ओला कचरा स्वीकारला जातोय. सुक्या कचऱयाचे करायचे काय? गणेशचतुर्थीच्यानिमित्त पणजीत सुक्या कचऱयाचे ढीगही वाढले आणि मनपासमोर यक्षप्रश्न निर्माण झालेला आहे. ‘स्वच्छ पणजी’चा काही भाग हा गलिच्छ पणजी आहे. तिथे मनपाची मंडळी पोहोचत नाही.

सांत इनेज नाला परिसरातही दुर्गधाr

ऐन पावसाळय़ातही पणजीचा सांत इनेज नाला ही एक गटारगंगा बनलेली आहे. या नाल्यातून हिरव्या व काळय़ा रंगाचे दुर्गंधीयुक्त पाणी पावसाळय़ात देखील वाहते, याचा अर्थ या नाल्यात सांडपाणी आणि थेट शौचालयाच्या वाहिन्या सोडण्यात आलेल्या आहेत. सांतइनेज नाल्याची साफसफाई होत नाही. दयानंद बांदोडकर मार्गावर बेती फेरीबोट धक्क्यापासून थेट कला अकादमीपर्यंतच्या भागात सायंकाळी तसेच रात्रीच्यावेळी असह्य़ दुर्गंधी सुटत असते.

कचरा टाकला कोणी, कारवाई करणार कोण

कचऱयाचा यक्षप्रश्न पणजी महापालिकेसमोर उभा आहे. त्यामुळे महापालिका मेटाकुटीला आलेली आहे. महापालिकेला दुसरा कोणताही पर्याय नाही. कचरा टाकण्यासाठी एकमेव स्थान म्हणजे राष्ट्रीय महामार्ग ठरले आहे. गोवा सरकारने गेल्यावर्षी विधानसभेत कायदा संमत केलेला होता. महामार्गाच्या बाजूला कचरा टाकणाऱयांविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार सरकारला आहे. आता राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 – अ वर प्रचंड प्रमाणात कचरा टाकला कोणी? कारवाई करणार कोणावर? कोणी हा कचरा टाकला कळत नाही.

Related posts: