|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कवठेमहांकाळ-लांडगेवाडी येथे 100 ब्रास वाळूचे साठे जप्त

कवठेमहांकाळ-लांडगेवाडी येथे 100 ब्रास वाळूचे साठे जप्त 

प्रतिनिधी/ कवठेमहांकाळ

जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांच्या आदेशानुसार कवठेमहांकाळच्या तलसीलदार शिल्पा ठोकडे यांनी वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी जोरदार मोहिम हाती घेतली असून अनंत चतुर्थीच्या दिवशीच ठोकडे यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील सुमारे 100 ब्रास अनाधिकृत वाळूचा साठा जप्त केला. सुमारे 25 ते 30 लाख रूपयांचा दंड होईल, असे स्पष्ट केले.

कडेगाव तालुक्यात जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांनी स्वतः अनाधिकृत वाळू साठयावर मोठी कारवाई केली. विशेष म्हणजे यावेळीही तहसीलदार शिल्पा ठोकडे या तिथे उपस्थित होत्या. काळम पाटील यांनी जिह्यातील वाळू चोरांवर धडक मोहिम राबवा, असे आदेश दिल्यानंतर ठोकडे यांनी प्रथम कवठेमहांकाळ तालुक्यात वाळूच्या साठयावर कारवाई केली व 100 ब्रास वाळू साठे जप्त केले.

मंगळवारी त्यांनी महसूलच्या अधिकाऱयांना वाळू साठयाची माहिती घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंडल अधिकारी बी. एस. नागरगोजे, तलाठी आर. एस. कावरे यांनी लांडगेवाडी येथे छापासत्र सुरू केले. या गावामध्ये नारायण मुडदे यांचा 70 ब्रासचा बेकायदा वाळूचा साठा मिळून आला, लगेचच तहसीलदारांनी या साठयाकडे धाव घेतली व हा साठा जप्त करण्याचे आदेश दिले.

लांडगेवाडी, जाधववाडी येथे ठिकठिकाणी वाळू ठेवली होती. तेथूनही वाळू उचलण्यात आली. त्यानंतर तहसीलदारांनी आपला मोर्चा कवठेमहांकाळकडे वळविला. कवठेमहांकाळ येथे 26 ब्रास वाळूचा साठा मिळून आला. तो साठाही त्यांनी जप्त केला. मात्र या साठयाचा मालक मिळून आला नसल्याचे सांगितले.

मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरून बेकायदा वाळूची वाहतुक करणाऱयांचे कंबरडे याआगोदरच मोडले आहे. आता त्यांनी बेकायदा वाळूचा साठा करण्याऱयांकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे चोरटी वाळूची वाहतूक करून अनाधिकृत साठा करणाऱयांचे धाबे दणाणले आहे.

सध्या कवठेमहांकाळचे नव्या तहसीलदार कार्यालयाचे आवार कवठेमहांकाळच्या पोलिस स्टेशनची मागची बाजू वाळूने भरलेले ट्रक्टर दिसत आहेत. इतकेच काय बैलगाडीतून वाळू वाहतूक करणाऱया बैलगाडी त्यांच्या तीक्ष्ण नजरेतून सुटल्या नाहीत.