|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गौरी लंकेश हत्येमागे मुंबईतील शार्पशूटर ?

गौरी लंकेश हत्येमागे मुंबईतील शार्पशूटर ? 

बोलविता धनी वेगळाच : हल्लेखोरांच्या तपासासाठी पोलिसांचे जाळे

प्रतिनिधी/ बेंगळूर

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमागे महाराष्ट्रातील उजव्या विचारसरणीच्या टोळीचा हात असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. याची गंभीरपणे दखल घेतलेल्या विशेष चौकशी पथकाच्या (एसआयटी) अधिकाऱयांनी या दिशेने तपास गतीमान केला आहे. मुंबई येथील गँगच्या शार्पशूटरकडून ही हत्या झाली असून या हल्लेखोरांच्या तपासासाठी पोलिसांनी जाळे पसरविले आहे.

मुंबईहून बेंगळूरला आलेल्या या सुपारी किलरने योजनाबद्धरित्या गौरी लंकेश यांचा गोळ्या झाडून खून केला आहे. तसेच फरारी होण्यातही तो यशस्वी झाला आहे, अशी शंका एसआयटीच्या पथकाने व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी एसआयटीच्या पथकाने आपली शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे. याआधी नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येप्रमाणेच गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील गँगचा यामध्ये हात असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, हल्लेखोरांचा शोध लावण्यास अद्यापही यश मिळाले नाही.

हल्लेखोरांकडून पूर्णपणे खबरदारी

मुंबई येथून आलेल्या  सुपारी किलर्सने गेल्या महिन्याभरापासून मोबाईलचा वापर केलेला नसून बेंगळूरात त्याने वास्तव्यही केले नाही. तसेच सीसीटीव्ही लावण्यात आलेल्या मार्गावरून त्यांनी ये-जा केली नाही. बहुतेक काळ्या रंगाचे कपडे आणि हेल्मेट घालून कोणत्याही परिस्थितीत आपला चेहरा सहजासहजी दिसू नये याची पूर्णपणे खबरदारी हल्लेखोरांनी घेतली असल्याचे दिसून आले आहे.

गेल्या मंगळवारच्या रात्री पाऊस सुरू होता. तसेच गौरी लंकेश यांच्या घराच्या परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. याचाच फायदा घेत काही मिनिटातच ही हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी वापरलेल्या वाहनाचा क्रमांक, रंग याची छबी सीसीटीव्ही कॅमेऱयात स्पष्टपणे उमटली नाही. तसेच हल्लेखोरांचा चेहराही स्पष्ट दिसला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे या हत्येच्या मागे नेमकी कोणती शक्ती आहे. याचा उलगडा करणे सध्या तरी कठीण बनले आहे.