|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » देशाच्या उत्पन्नातील अडीच टक्के खर्च आरोग्यासाठी करणार

देशाच्या उत्पन्नातील अडीच टक्के खर्च आरोग्यासाठी करणार 

प्रतिनिधी/ सोलापूर

जागतिक आरोग्य संघटनानुसार देशाच्या एकूण राष्ट्रीय स्थुल उत्पन्नाच्या (जीडीपी) किमान पाच टक्के रक्कम सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनेवर खर्च होणे अपेक्षित आहे. आपण इतका खर्च करू शकत नाही. पण सरकारतर्फे हा आरोग्याचा खर्च अडीच टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज शनिवारी दिली आहे.

डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय महाविद्यालयाच्या विकृतीशास्त्र विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटना दरम्यान डॉ. भामरे बोलत होते. यावेळी वैशंपायन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे, विकृतीशास्त्र संघटनेचे डॉ. ए. टी. देशमुख, डॉ. शारदा राणे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे आणि डॉ. जी. ए. पंडीत उपस्थित होते.

विकृतीशास्त्र हा मेडिकल विभागाचा कणा आहे. समाजातून याला जास्त मागणी आहे. पण अलीकडच्या काळात वैद्यकीय सेवा खूप महाग झाली आहे. मी एक मंत्री म्हणून नाही तर डॉक्टर म्हणून बोलत आहे. आपला देश अजूनही विकसनशील देश आहे. आपल्या देशातील गरीब लोक खूप आहेत. त्यांना महागडी वैद्यकीय सेवा घेत येत नाहीत. त्यामुळे ते नवनवीन उपचाराला मुकतात. त्यामुळे सरकार नवीन आरोग्य धोरण आणत आहे. त्यात समाजातील सर्वांना उपचार घेता येतील, अशी सुविधा असणार आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र सुधारण्यावर भर

देशातील सामान्य जनतेला चांगली व ताबडतोब आरोग्य सेवा मिळाली पाहिजे यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मजबूत करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक जिह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची योजना आखली जात आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर जागा वाढविण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना संधी मिळेल आणि आरोग्य सेवा सुधारेल.

क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट

अनेकवेळा काही आजारावरील उपचार हे गुंतागुंतीचे असतात. पण याची जाणीव रूग्णाच्या नातेवाईकांना नसते. त्यामुळे काही बरेवाईट झाल्याने नातेवाईक चिडून डॉक्टरांना मारहाण करतात. असा प्रकार घडू नये यासाठी सरकार क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट आणणार आहे. यामुळे डॉक्टरांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. हा कायदा सर्वांना समान असणार आहे. डॉक्टरांनी देखील नातेवाईकांशी योग्य संवाद साधल्यास मारहाणीचा प्रकार टाळता येऊ शकतात.

Related posts: