|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सावंतवाडीच्या पुष्करची हिमालयावर स्वारी

सावंतवाडीच्या पुष्करची हिमालयावर स्वारी 

सावंतवाडी महाविद्यालयाचा विद्यार्थी : जीवघेण्या अडथळय़ांचा सामना करीत पूर्ण केली सायकल परिक्रमा : पुढची स्वारी ‘अरुणाचल’वर

 

शेखर सामंत / सिंधुदुर्ग :

     पुष्कर! सावंतवाडीच्या एस. पी. के. महाविद्यालयात शिकणारा हा मुलगा. हिमालय त्याने कधी पाहिला नव्हता. बस्स! त्याला एवढच माहीत होतं की कोणत्याही परिस्थितीत ऍडव्हेचर सायकलिस्ट असलेल्या आपल्या डॉक्टर बाबांची सायकलवरून हिमालयावर स्वारी करायची इच्छा पूर्ण करायची. या मुलाने आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन हिमाचल गाठले. अगदी पहिल्याच प्रयत्नात 12 हजार फूटांपासून ते 18 हजार फूटांपर्यंतच्या अत्यंत धोकादायक अशा दऱयाखोऱया, पर्वत मार्गावरून सायकलने मार्ग काढत थेट हिमालयालाही झुकायला भाग पाडले. ‘झांजकर-हिमालया सायकलिंग एक्स्पीडेशन’ ही जगातील अतिशय खडतर परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण करीत तो सुखरुप सावंतवाडीत पोहोचला.

     पुष्कर हा सावंतवाडीतील सुबोधन आणि सौ. माधवी कशाळीकर या डॉक्टर दाम्पत्याचा मुलगा. संपूर्ण कुटुंबच ऍडव्हेंचर प्रेमी. डॉ. सुबोधन हे ऍडव्हेंचर सायकलिस्ट. आईला तसेच शाळेत जाणारी छोटी बहीण आर्या ही देखील ऍडव्हेंचरमध्ये रमणारी. थोडक्यात पुष्करला ऍडव्हेंचरचे बाळकडू मिळाले होते. सिंधुदुर्गातील घाट रस्ते, सागरी मार्गावरून तो नेहमी सायकलिंग करायचा. बाबांची अपूर्ण राहिलेली हिमालय परिक्रमा कधीतरी यशस्वीपणे पूर्ण करायची, असा दृढ निर्धार त्याने मनोमन केला होता. स्वीकारणारे आव्हान हे हिमालयाएवढे असावे, असे त्याचे बाबा नेहमी म्हणत. पुष्करने थेट हिमालयालाच आव्हान म्हणून निवडले. ज्या ठिकाणी कुठलेही वाहन जात नाही, ज्या पायवाटांवरून मार्ग काढताना ट्रेकर्सना देखील घाम फुटतो, अशा मार्गावरून सायकलने प्रवास करीत दऱया-खोऱया, पर्वत पालथे घालायचे असे त्याने ठरवले. यासाठी त्याने ठाणे येथील जेष्ठ ऍडव्हेंचर सायकलिस्ट रमाकांत महाडिक (65), पनवेल येथील ऍडव्हेंचरप्रेमी निखिल पाटील, मूळचा केरळचा, पण मुंबई-डोंबिवली येथील सेंट्रल रेल्वेचा चालक जयकुमार या सर्व ऍडव्हेंचर प्रेमींशी संपर्क साधून ‘हिमालयीन सायकलिंग एक्स्पीडेशन’ टूरचे आयोजन केले.

जाणीवपूर्वक निवडला खडतर मार्ग

 ज्या मार्गाने फक्त ट्रेकर्सना पायी जाता येतं, अशा खडतर मार्गाने सायकलने प्रवास करायचा आणि ही टूर पूर्ण करायचा निर्धार या चौघांनी केला. या साठी या चौघांनी जाणीवपूर्वक या पूर्वी कुणीही सहसा सायकलने प्रवास केला नसलेल्या मनाली, त्यानंतर 13 हजार फूट उंचावर असलेला रोहतांगपास, तिथून 16 हजार फूट उंचावर असलेला शिकुला पास, थोडं खाली उतरून 14 हजार फूट उंचीवरील पेंजीला पास, तेथून पुढे 12 हजार 900 फुटावरील नमकीलापास, तेथून वर चढत 13 हजार फूटावरील पोटुला पास व सर्वात शेवटी जगातील सर्वाधिक उंचीवरील रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱया 18 हजार 300 फूट उंचीवरील ‘खारदुंगला पास’ असा मार्ग निवडला.

त्यासाठी पुष्करने सिंधुदुर्गातील आंबोली घाटात जोरदार सराव केला. आपल्या मनाची तयारीही केली. घरातील आई-बाबांचे आशीर्वाद घेऊन तो सहा ऑगस्ट रोजी निघाला. टेन व बसचा वापर करीत ही चारजणांची टीम मनालीला पोहोचली. तेथून त्यांनी आपली ही थरारक सायकल परिक्रमा सुरू केली.

23 दिवसांची खडतर परिक्रमा

   तब्बल 23 दिवस ही परिक्रमा चालली. या दरम्यान पुष्कर व त्याच्या टीमने अनेक थरारक अनुभवांचा सामना केला. दिवसभरात नऊ ते दहा तास ते सायकलिंग करायचे. या दरम्यान क्वचितच काहिसे चांगले रस्ते भेटायचे. त्यांना बहुतांशी प्रवास हा खोल व निमुळत्या होत गेलेल्या दऱयांच्या कडय़ांवरून, ग्रामस्थांनी बनवलेल्या झुलत्या पुलांवरून, नद्यांमधून, बर्फातून व दगडधेंडय़ांतून करावा लागला. प्रचंड दमछाक करणारे कित्येक किलोमीटरचे चढ, तेवढेच भोवळ आणणारे थरारक उतार, रक्त गोठवणारी थंडी, वेगवान वारे या सर्व अत्यंत प्रतिकुल अशा परिस्थितीवर मात करीत पुष्कर व त्याच्या टीमने जगातील ही अतिशय खडतर अशी परिक्रमा पूर्ण केली.

लामांची मिळाली मदत

   या परिक्रमेदरम्यान त्यांनी लामांसोबत राहणे पसंत केले. अनेक खडतर ठिकाणी सायकल खांद्यावर घेऊन, तर काही ठिकाणी घोडय़ांचेही त्यांना सहकार्य घ्यावे लागले. छोटय़ा-मोठय़ा अपघातांचा सामनाही त्यांना करावा लागला. या दरम्यान याक या प्राण्याचे दूध व दही आणि ऑम्लेट यावर या सर्व साहसवीरांनी आपली भूक भागवली. स्थानिक बौद्ध लामांनी त्यांना खूप सहकार्य केले. लामांची संस्कृती त्यांना जाणून घेता आली. अशा प्रकारे हे हिमालयीन सायकल एक्स्पीडेशन आपल्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वी करीत आपल्या वडिलांचे स्वप्न साकार करून पुष्कर नुकताच सावंतवाडीत परतला. घरी परतल्यानंतर तरुण भारतशी बोलताना आपणास पेरणा देणाऱया डॉ. रावराणे व ऍडव्हेंचर लव्हर्स असलेल्या जिल्हय़ातील सर्वच डॉक्टरांचा व आपणास सहकार्य करणाऱया सर्वांचाच आपण मनापासून आभारी असल्याचे तो म्हणाला. भविष्यात अरुणाचल प्रदेशात सायकल परिक्रमा काढण्याच्या विचारही त्याने बोलून दाखविला.

Related posts: