|Thursday, August 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » निरागस जिवांचा होणारा ‘गेम’

निरागस जिवांचा होणारा ‘गेम’ 

निष्पाप जिवांचा बळी जाणं म्हणजे काय, याचा अनुभव आपण अलीकडे वारंवार घेत आहोत. गुरगावच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील सात वषीय प्रद्युम्न ठाकुर या बालकावरील लैंगिक अत्याचार व हत्येने पुन्हा एकदा लहान मुलांची असुरक्षितता आणि असहायता अधोरेखित केली आहे. ही घटना घडली त्याच्याच आसपास दिल्लीतील रघुवरपुरा येथील गांधी नगरजवळच्या शाळेत एका पाच वर्षांच्या मुलीवर शाळेच्याच शिपायाने बलात्कार केला. त्यानंतर या मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिल्ली सरकारने दिले आहेत. अशा घटना देशात एकसारख्या घडत असून, लहान मुलांचं जीवन किती असुरक्षित बनलं आहे, या जाणिवेने देशभरातील पालकांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे.

गुरगावच्या शाळेतील तो निंदनीय प्रकार करणारा अशोक कुमार हा मनुष्य (?) दुसऱया शाळेच्या बसचाच कंडक्टर आहे. त्याला त्या शाळेने आठ महिन्यांपूर्वी तो अशाच तऱहेने मुलांशी असभ्य वागत असल्याची तक्रार आल्याने काढून टाकलं होतं. तो शाळेत मागच्या बाजूला असलेल्या कुंपणाच्या भिंतीलगतच्या जागेतून वाट काढून शिरला आणि मैदान पार करून शाळेच्या इमारतीत घुसला. शाळेचा परिसर मोठा आहे आणि त्याला कुंपणालगत संपूर्ण भिंत घालण्याचं काम पूर्ण झालं नव्हतं. काही ठिकाणी साध्या काठय़ा व झुडपांचा वापर केला होता. त्यामुळे या माणसाला आत शिरायला सोपं झालं. तिथे त्याला शाळेतल्या तीन मुलांनी पाहिलं होतं. त्यानंतर हा सात वर्षांचा मुलगा तिथे आला व त्याच्या तावडीत सापडला.

आता शाळेच्या प्रिन्सिपलला निलंबित करण्यात आलं आहे. पण तेवढय़ाने काय होणार? मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेने नीट पार पाडलेली नाही. शाळेचा बंदोबस्तही धड केलेला नाही. इतकंच नव्हे, तर शाळेतील मुलांना ओळखपत्रं देण्यासाठी पैसे आकारले आणि तरीही सहा महिने होऊनही अनेकांना ओळखपत्रं दिलेली नाहीत, अशा तक्रारी आहेत. शाळेत जर मुलांचे पालक आले, तर स्वागतकक्षाच्या पलीकडे जाऊन त्यांना मुलांना भेटता येत नाही. पण एक आगंतुक मात्र मागच्या बाजूने शाळेत प्रवेश मिळवून हीन कृत्य करू शकतो. शाळेतील मुलांचे पालक यामुळे संतापले व त्यांनी निदर्शनं केली. या शाळेने नियम पायदळी तुडवले असा आरोप होत असून, त्याची छाननी झाली पाहिजे. शाळेत एखादा कर्मचारी नेमायचा झाला, तर त्याची पूर्वपीठिका तपासली गेली पाहिजे, असे निर्देश असूनही अशोककुमारची कोणतीही चौकशी न करताच त्याला कामावर ठेवण्यात आलं होतं. बालकांच्या सुरक्षेबाबतही शाळेने हेळसांड केली, असा आरोप पालक करत आहेत. आतबाहेर जाण्यासाठी शाळेला एकच दरवाजा असावा, शाळेतील काही भागातील प्रवेश निर्बंधित असावा. कोणत्या भागात जाताना ओळखपत्र बाळगणं गरजेचं आहे, यासंबंधी शाळेने  नियम करावेत आणि विशेषतः बसचालक व कंडक्टर यांचा वावर शाळेत असण्याची गरजच नाही. एका सीमेनंतर त्यांना आत येऊच देता कामा नये. गरज पडल्यास त्यांच्यासाठी वेगळी स्वच्छतागृहं असावीत. या नियमांचा भंग करणाऱया कर्मचाऱयांना त्याबद्दल जबाबदार कर्मचाऱयांवर कारवाई व्हायला हवी, ही पालकांची मागणी अगदी योग्य आहे. बसच्या कर्मचाऱयाकडे सुरीसारखी वस्तू असणं, हे सुद्धा धोकादायक आहे. अत्याचार करून झाल्यावर संबंधित मुलाला ठार मारण्याचाच हेतू त्याच्या मनात आधीपासूनच असला पाहिजे. ही सुरीदेखील नवीन करकरीत होती, म्हणजे मारण्याच्या विशिष्ट हेतूने ती त्याने खरेदी केली असणार, हे स्पष्ट दिसून येतं. या प्रकरणी कसून चौकशी करून, संबंधित लोकांवर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. या गुन्हेगाराला पॉस्को (प्रोटेक्शन ऑफ चिल्डेन फ्रॉम सेक्श्युअल ऑफेन्स ऍक्ट) खाली अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी हत्या झालेल्या मुलाच्या वडिलांनी केली आहे. तसंच शाळेसंबंधी जी मार्गदर्शक तत्त्वं व नियम असतील, त्यांचं पालन केलं जात आहे किंवा नाही, याची तपासणी सातत्याने सरकारने वा महापालिकांनी केली पाहिजे. तो त्यांच्या कामाचाच भाग समजला पाहिजे व तो तसा आहेही. केवळ अशा घटना घडल्यानंतर तात्पुरती कारवाई करण्याने काहीही परिणाम होणार नाही.

लहान मुलांशी संबंधित काम करणाऱयांनी अतिशय जबाबदारी व काळजी घेणंही जरूरीचं आहे. गेल्याच आठवडय़ात दिल्लीत गाझियाबादजवळील सिल्वर शाइन स्कूल या शाळेच्या बसमधून खाली उतरलेली पाच वर्षांची मुलगी, बस चालकाने त्याचवेळी बस चालू करून वळण घेतल्याने त्याच बसखाली सापडून मृत्युमुखी पडली. हा बस चालक नेहमीच बेपर्वाईने बस चालवत होता. या मुलीच्या आईनेही यापूर्वी दोनदा तक्रार केली होती. तरीही तो नेहमीच घाईघाईने बस दामटत असे.

लहान व किशोरवयीन मुलं अलीकडे बहुतांशी मोबाइलवर खेळत असतात. त्यांच्या हातात मोबाइल किती वेळ द्यायचा, व तो ते कसा वापरतात, त्यावर मुलं काय खेळतात हे बघण्याची जबाबदारी पालकांची आहे. मुलांवर अत्यंत कडक बंधनं घालू नयेत; पण त्यांचा कल कुठे आहे, ती नेमकं काय करत आहेत याबद्दल पालकांनी जागरूक असणं गरजेचं आहे. ब्लू व्हेल या मोबाइल गेममध्ये भारतातही अनेक मुलं सापडली असल्याचं दिसूनच आलं आहे. या आत्मघातकी खेळाने काहींचा जीवही घेतला आहे. अतिशय लहान वयात मुलं मोबाइलवर खेळतात, तेव्हा त्यांचं कौतुक केलं जातं. पण त्याचे दुष्परिणाम बघितले जात नाहीत. केवळ ब्लू व्हेल किंवा तत्सम खेळांचाच धोका त्यात नाही. तर मोबाइलच्या अतिवापराने मुलांच्या आकलनावर, ऊर्जेवर, स्मरणशक्तीवर आणि मेंदूच्या अनेक क्रियांवर प्रतिकूल परिणाम घडत असतो, हे विज्ञानाने दाखवून दिलं आहे. समाजातील दुष्ट शक्ती मुलांच्या असहायतेचा फायदा घेत असतातच; पण मुलांच्या हिताशी त्यांचे पालकही एकप्रकारे खेळत असतात, असं दुर्दैवाने म्हणावं लागतं…