|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » विकासकांनी सोडलेल्या जागांचा विकास!

विकासकांनी सोडलेल्या जागांचा विकास! 

वेंगुर्ले न. प. बैठकीत ठराव : व्याजाचा उपयोग विकासकामांसाठी व्हावा!

वार्ताहर / वेंगुर्ले :

वेंगुर्ले नगरपरिषद विविध योजनातील निधीचे व्याज 1 कोटी 30 लाख रुपये एवढे झालेले आहे. त्याचा वापर अन्य ठिकाणी करता येत नाही. सदरची रक्कम विकासकामांना वापरण्यासाठी विकासकामांचे प्रस्ताव करून शासनाकडे सदर रक्कम खर्चासाठी परवानगी घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. तसेच वेंगुर्ले शहरात विकासकांनी सोडलेल्या जागा नगरपालिकेने ताब्यात घेऊन विकास करावा, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

वेंगुर्ले नगर परिषद कौन्सिलची सर्वसाधारण सभा नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक प्रशांत आपटे, तुषार सापळे, विनायक गवंडळकर, संदेश निगम, आत्माराम सोकटे, महेश डिचोलकर, विधाता सावंत, कृपा गिरप-मोंडकर, कृतिका कुबल, शीतल आंगचेकर, साक्षी पेडणेकर, सुमन निकम, श्रेया मयेकर, स्नेहल खोबरेकर, मुख्याधिकारी रामदास कोकरे, प्रमुख लिपीक श्री. परब उपस्थित होते.

या सभेत गणेशोत्सव काळात नगर परिषदेने केलेल्या बॅनर न लावण्याच्या आवाहनानुसार नागरिक, राजकीय पक्षांनी बॅनर न लावता केलेल्या सहकार्याबद्दल अभिनंदनाचा ठराव विधाता सावंत यांनी मांडला. तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

हागणदारीमुक्त महाराष्ट्रसाठी

1 ते 30 सप्टेंबर जनजागृती मोहीम

2 ऑक्टोबर या महात्मा गांधी जयंती दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हागणदारीमुक्त महाराष्ट्राची घोषणा करणार आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व नगर परिषदा व नगर पालिकांना शौचालयांची पूर्तता करून नागरिकांना सुविधा देण्याचे सूचित केले गेले आहे. शहरात सार्वजनिक शौचालयांची ज्या भागात गरज आहे तेथे जागेसह नगरसेवकांनी प्रस्ताव न. प. कडे द्यावेत. त्यासाठी निधीची उपलब्धता आहे. 1 ते 30 सप्टेंबर या काळात हागणदारीमुक्तसाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी केले.

शौचालयाच्या तक्रारीवर

तात्काळ कार्यवाही होणार!

शहरातील कुठल्याही भागात शौचालयाबाबत समस्या वा तक्रार आल्यास त्याची त्वरित दखल घेऊन कार्यवाही केली जाणार असल्याचे कोकरे यांनी स्पष्ट केले. शहरात मनोरुग्णांकडून सार्वजनिक ठिकाणी संडास वा घाण केली जाते. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नगरसेवकांनी केली.

उत्पन्नाच्या झाडांच्या

लिलावात बदल

यापूर्वी आंबा व नारळ ही झाडे कराराने दिली जात होती. त्या करारासाठी अटी व शर्थीची पूर्तता होत नसल्याने झाडांना उत्पन्न कमी होत गेले आहे. कंपोस्ट बागेत, डॉन्टस कॉलनी येथील मोठी आंबा कलमे व शिवाजी प्रागतिक शाळेच्या आवारातील 25 नारळ झाडे यांना नगरपरिषदेने स्वत:कडील खतपाणी देऊन व निगा राखावी. आंबा झाडास मोहोर आल्यावर फळांसाठी ती लिलाव स्वरुपात द्यावी. तसेच नारळ काढणीनंतर नारळाचा लिलाव लावावा, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

मशिनरीचे प्रात्यक्षिक

सभागृहात व्हावे!

रस्ते, गटारे साफसफाईसाठी सफाई कर्मचाऱयांचा वापर केला जातो. त्याला जास्त कालावधी लागतो. नेमून दिलेली कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. त्यावर उपाययोजनेसाठी आधुनिक मशिनरी खरेदी करण्याच्या विषयावर संबंधित पुरवठा करणाऱया एजन्सीमार्फत सभागृहात त्या मशिनरीचा ‘डेमो’ सादर करण्यास सांगावे. मशिनरीची क्षमता व तत्सम गोष्टीची माहिती सभागृहास दिली जावी. त्यानंतरच सभागृह आधुनिक मशिनरीस परवानगी देईल, असे ठरविण्यात आले.

आर्किटेक्ट अमित कामतना
कामे देण्याचा निर्णय

नगरपरिषदेने आर्किटेक्ट श्रीकांत पाटील यांना फेब्रुवारी महिन्यात दिलेल्या 33 कामांचे प्रस्ताव वेळेत न. प. कडे दिलेले नाहीत. त्यामुळे विकासकामांवर परिणाम होतो. अद्यापही 33 पैकी अनेक कामांचे प्रस्ताव पेंडिंग आहेत. त्यामुळे आर्किटेक्ट अमित कामत यांना विकासकामे बनविण्याचे प्रस्ताव देण्याची सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. तसेच स्वच्छ भारत पर्यटन स्थळ अंतर्गत कंपोस्ट यार्ड या ठिकाणी इलेक्ट्रीशियनकम फिटर व मुकादम ही दोन पदे निर्माण करून ती भरण्यास मंजुरी देण्यात आली.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत

सात कामांना मंजुरी

वेंगुर्ले न. प. ला स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत हागणदारी व स्वच्छ होणाऱया नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन अनुदान प्राप्त झालेले आहे. त्यातून मैला प्रक्रिया उभारणे, सांडपाणी सुविधा उभारणे, हागणदारी मुक्त परिसर विकसित करणे, घनकचरा व्यवस्थापन सर्व बाबी, जलसंवर्धन सुशोभिकरण, मलनिस्सारण व्यवस्था अद्ययावत, हरितपट्टे निर्मिती करून तारांचे कुंपण घालणे आदी कामास मंजुरी देण्यात आली. शहरास हरितपट्टा असलेल्या भागास त्वरित तारांचे कुंपण घालून तो भाग वृक्ष लागवडीसाठी विकासास मंजुरी देण्यात आली. तसेच त्रिकोणी गार्डन कॅम्प या गार्डनच्या विकासास मंजुरी देण्यात आली.

न. प. ची दफनभूमी

उभारण्याचा निर्णय

धावडेश्वर सार्वजनिक स्मशानभूमी विकसित करण्याबरोबरच बेवारस मृतदेह व पाळीव जनावरे दफनासाठी या जागेच्या बाजूस खास दफनभूमी विकसित करण्याचा निर्णय सर्वानुमते कौन्सिल सभेने सर्वानुमते घेतला. त्यामुळे बेवारस मृतदेहांवर, पाळीव जनावरांना दफन करून त्याची विल्हेवाट लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गणेश मूर्तीकारांचा सत्कार करणार!

शहरातील स्वच्छतेबरोबरच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारणाऱया गणेश मूर्तीकारांचा नगरपालिकेतर्फे शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार, खासदार, यांच्याकडून मिळणाऱया विकास निधीमधील कामांसाठी कामे सूचविणे, अल्पसंख्यांक विकास निधीसाठी कामे सूचविणे, पर्यटन विकास दृष्टय़ा कामे सूचविणे या विषयावर नगरसेवकांनी लेखी स्वरुपात विकासकामे सूचविण्याचे स्पष्ट करण्यात आले.