|Monday, July 22, 2019
You are here: Home » मनोरंजन » शिल्पा तुळसकर आगळय़ावेगळय़ा भूमिकेत

शिल्पा तुळसकर आगळय़ावेगळय़ा भूमिकेत 

मराठी तसेच हिंदी चित्रपटसफष्टीत आपल्या अभिनयाचे ठसे उमटवत कधी सुजाता तर कधी देवकीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारं हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणजे अभिनेत्री शिल्पा तुळसकर. 22 सप्टेंबर 2017 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱया अनान चित्रपटातून त्यांचं एक नवीन रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे.

 

देवकी, डोंबिवली फास्ट, कालचक्र आणि आता बॉईज यांसारखे चित्रपट असो, लेडीज स्पेशल, दिल मिल गए, देवों के देव-महादेव यांसारख्या मालिका असो वा जावई माझा भला, लहानपण देगा देवा यांसारखी नाटके असोत सिनेमा, मालिका आणि नाटक या तीनही क्षेत्रात आपल्या उत्तोमोत्तम अभिनयाने नेहमीच स्वत:ला सिद्ध करत, आपल्या भूमिकेला योग्य तो न्याय मिळवून देण्याचं काम शिल्पा तुळसकर यांनी वेळोवेळी केले आहे. आता अनान या आगामी मराठी चित्रपटातून 64 कलांचं महत्त्व जगाला पटवून देणाऱया या भारत देशातील संगीताची संस्कृती पिढय़ान्पिढय़ा पुढे सुरू ठेवणाऱया पंडित वसुंधरा या भूमिकेत त्या आढळून येणार आहेत.

 

इस्लामी संस्कृतीकडून भारतीय संगीतास मिळालेल्या सुगम संगीताची देणगी म्हणजेच गझल… आपलं संपूर्ण आयुष्य कलेला वाहून देणाऱया गझल गायिकेची भूमिका शिल्पा तुळसकर या चित्रपटात साकारत आहेत. त्यांच्या अभिनयाच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत प्रथमच त्या अशा भूमिकेत दिसणार आहेत. अस्खलित उर्दू भाषेचा वापर, घरंदाज गायिकेची शैली आणि तिच्यात लपलेली एक प्रेमळ आई आणि अबोल प्रेमिका यांचं मिश्रण असलेली ही वसुंधरा पाहण्यास एक वेगळीच उत्कंठता निर्माण झालेली आहे.

 

ओंकार शिंदे आणि प्रार्थना बेहरे यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. रोहन थिएटर्सच्या रौनक भाटिया आणि हेमंत भाटिया यांनी अनान या चित्रपटाची निर्मिती केलेली असून कथा आणि क्रिएटीव्ह डायरेक्शन हेमंत भाटिया यांचं आहे. दिग्दर्शन राजेश कुष्टे यांनी केलं आहे तर पटकथा-संवाद राजेश कुष्टे आणि मुकेश जाधव यांनी लिहिले आहेत. चित्रपटाचं संकलन सेजल पेंटर यांनी केलं असून छायाचित्रण राज कडूर यांनी केलं आहे. येत्या 22 सप्टेंबरला अनान हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. अनान चित्रपटाच्या निमित्ताने  एका नवीन विषयाने मराठीत प्रवेश केलेला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने  मराठी सिनेसफष्टीला लाभलेल्या सौरभ-दुर्गेश या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेल्या गंधी सुगंधी, एक सूर्य तू, काहे तू प्रित जगायी यांसारख्या एकापेक्षा एक सरस आणि विविध रागांनी रंगलेल्या गाण्यांना जेव्हा सोनू निगम, आनंदी जोशी, रवींद्र साठे व सौरभ शेटय़े यांसारख्या स्वराधीपतींच्या मधुर स्वरांनी साद घातलेली गाणी ऐकू येणार आहेत.