|Monday, August 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 10 वर्षात भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था !

10 वर्षात भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ! 

एचएसबीसीच्या अहवालाचा निष्कर्ष

वृत्तसंस्था/ मुंबई

जपान आणि जर्मनीला मागे टाकत भारत आगामी 10 वर्षांमध्ये जगाची तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरू शकतो. एचएसबीसीनुसार याकरता भारतात सातत्याने सुधारणांवर काम करत रहावे लागेल आणि सामाजिक क्षेत्रावर अधिक लक्ष द्यावे लागेल. अहवालानुसार भारताला ईज ऑफ डूइंग बिझनेस आणि कंत्राट अंमलबजावणीच्या दिशेने अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. याचबरोबर भारताला आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी लागेल.

भारत आगामी 10 वर्षांमध्ये जपान आणि जर्मनीच्या पुढे जाईल. अहवालात भारताच्या लोकसंख्येत तरुणाईचे अत्याधिक प्रमाण आणि स्थिरतेचा याप्रकरणी लाभ होईल असे नमूद करण्यात आले. 2028 पर्यंत भारत 7 लाख कोटी डॉलर्सची (7 ट्रिलियन डॉलर्स) अर्थव्यवस्था होईल, तर त्यावेळी जर्मनी 6 ट्रिलियन डॉलर्स आणि जपान 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था असतील. सद्यस्थितीत भारताची अर्थव्यवस्था 2.3 ट्रिलियन डॉलर्सची असून याचा क्रमांक 5 वा आहे.

ई-कॉमर्स क्षेत्रात रोजगार

रोजगाररहित विकासाच्या चिंतेदरम्यान ई-कॉमर्स कंपन्या 1.2 कोटी लोकांना रोजगार देतील. हे प्रमाण एकूण आवश्यक रोजगाराच्या जवळपास निम्मे असेल. याशिवाय सर्वाधिक रोजगार आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात उपलब्ध होतील.

सेवा क्षेत्राचा असेल जोर

भारत सेवाप्रधान अर्थव्यवस्था म्हणून कायम राहील, परंतु आता भारताला आपले लक्ष निर्मिती क्षेत्रावर केंद्रीत करावे लागेल. याशिवाय भारताला कृषी क्षेत्रावर भर द्यावा लागेल असे अहवालात म्हटले गेले.

चीनपेक्षा भारत वेगळा

भारताच स्थिती चीनपेक्षा खूपच वेगळी आहे. चीन एक निर्यातआधारित अर्थव्यवस्था आहे. यानुसार भारत 55 कोटी ग्राहकांचा बाजार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.

विकास दर 7.1 टक्के

अहवालानुसार जीएसटीमुळे भारताची अर्थव्यवस्था चालू वर्षात 7.1 टक्क्यांनी वाढेल, हा दर नंतरच्या कालावधीत आणखीन वाढू शकतो. भारत जलद सुधाराच्या मार्गावर असून यापासून दूर जाणे त्याच्यासाठी नुकसानीची ठरू शकते असे म्हटले गेले.