|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पालिकेतील वादाची तक्रार प्रदेश भाजपाकडे

पालिकेतील वादाची तक्रार प्रदेश भाजपाकडे 

सोलापूर  / प्रतिनिधी

एकहाती सत्ता असतानाही पक्षांतर्गत गटबाजी व भांडणामुळे महापालिका सर्वसाधारण सभेत भाजपाचा झालेला पराभव आणि महिला महापौरांबद्दल स्थायी सभपतींनी काढलेल्या अपशब्दामुळे भाजपाची गेलेली अब्रू या सर्व प्रकारामुळे शिस्तीचा अशी ओळख असलेल्या भाजपाची ‘छी-थू’ होत आहे. तर भाजपामध्ये महिलांचा मानसन्मान राखला जात नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कारभाराला कंटाळून अच्छे दिनच्या अपेक्षेने आणि
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून सोलापूरकरांनी बहुमतांनी महापािलकेची एकहाती सत्ता भाजपाच्या हाती दिली. परंतु वर्षेनुवर्षे विरोधकांमध्ये रहावयाची सवय लागलेल्या भाजपावाल्यांना सत्ता चालविता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर कधी नव्हे ते महापालिकेची सत्ता हाती आल्याने पालिकेतील भाजपाचे पदाधिकारी सर्व सोडून उघडपणे भांडणे करीत आहेत. त्यामुळे सोलापूर शहरच नव्हे तर जिह्यातही भाजपची ‘छी-थू’ होत आहे. शनिवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पक्षांतर्गत गटबाजी व वादामुळे सत्ताधारी भाजपाचा पक्षातील नगरसेवकांमुळेच पराभव झाला. फक्त पराभवाने हे प्रकरण न थांबता बेशिस्तीचा कहर म्हणजे भाजपाच्याच स्थायी सभातपींनी भाजपाच्या महिला महापौरांबद्दल भर सभेत अपशब्द वापरल्यामुळे भाजपमध्ये महिलांचा मान-सन्मान राखला जात नसल्याचेच सिध्द झाले.

या सर्व प्रकारामुळे एरव्ही राजकारण आणि राजकारण्यांकडे कायम दुर्लक्ष करणाऱया सामान्य नागरिकांमध्येही सत्तेमुळे भाजपमध्ये आलेल्या उध्दटपणाची चर्चा होवू लागली आहे. महापालिका पदाधिकाऱयांमधील भांडणे तर सोडाच पण सोलापूरचे दोन मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात जबाबदार मंत्री असतानाही त्यांच्यातील भांडणे आता खालच्या स्तरावर पोहचल्याचे जाणवू लागले आहे.

महिलांचा नाही सन्मान

महापालिकेत भाजपची बहुमताने सत्ता असून विद्यमान महापौर या भाजपच्या पहिल्या महिला महापौर आहेत. केंद्र व राज्याच्या सत्तेत असलेल्या मोठय़ा शिस्तीच्या पक्षात महिलांचा सन्मान नसल्याचे महापालिकेतील वादावरुन स्पष्ट झाले आहे. सोलापुरातील महिला वर्गातून भाजपमधील या प्रवृत्तीचा निषेध व्यक्त होत आहे. तर महापालिकेत 50 टक्क्यांहून अधिक असलेल्या महिला नगरसेविकांकडूनही महापौरांबद्दल भरसभेत अपशब्द बोलल्याचा निषेध व्यक्त होत नसल्यामुळेही आश्चर्य व्यक्त होत आहे.

वादाचा अहवाल प्रदेशकडे : शहराध्यक्ष निंबर्गी

महापालिकेत भाजपची सत्ता असतानाही पक्षांतर्गत वाद सुरु असून हा वाद आता विकोपाला गेला आहे. महापालिकेत शनिवारी सर्वसाधारण सभेत झालेल्या सर्व प्रकाराची गंभीर दखल पक्षाने घेतली असून सविस्तर अहवाल प्रदेश भाजपाकडे पाठविला असल्याचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी सांगितले.

संघाकडूनही वादाची दखल

भाजपचे मंत्री आणि महापालिकेतील पदाधिकाऱयांमधील वादामुळे सामान्य नागरिकांमध्ये ‘छी-थू’ होत आहे. पक्षातील जबाबदारांपासून कोणालाच शिस्त व पक्षाच्या प्रतिष्ठेची काळजी नसल्याची गंभीर दखल शहर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतल्याचे दिसते, कारण रविवारी दुपारी शहराध्यक्षांना बोलवून संघाच्या लोकांनी शनिवारी पालिकेत झालेल्या वादाची माहिती घेतली आहे.

Related posts: