|Saturday, February 29, 2020
You are here: Home » क्रिडा » गुजरातकडून मुम्बाचा धुव्वा

गुजरातकडून मुम्बाचा धुव्वा 

वृत्तसंस्था/ रांची

प्रो कबड्डी लीगमधील बुधवारी झालेल्या लढतीत गुजरात फॉर्च्युनने आपली विजयी घोडदौड कायम ठेवताना यू मुम्बाचा 45-23 असा धुव्वा उडवला. चंद्रन रणजीत (11) व सचिन (10) गुणाची कमाई करताना गुजरातच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली. या विजयासह गुणतालिकेत अ गटात गुजरात 56 गुणासह अग्रस्थानी असून मुम्बा संघ 39 गुणासह चौथ्या स्थानी आहे. अन्य एका सामन्यात पटना संघाने तमिळ थैलवाजवर 41-39 असा निसटता विजय मिळवला.

सामन्याच्या प्रारंभी, चंद्रन रणजीत व सचिन यांनी गुजरातला 7-5 अशी आघाडी मिळवून दिली होती. मुम्बाच्या अनुप कुमारने याला प्रत्युत्तर देताना 8-8 अशी बरोबरी साधली होती. पण, गुजरातच्या आक्रमक खेळासमोर मुम्बाच्या बचावफळी निष्प्रभ ठरली. या कामगिरीच्या जोरावर गुजरातने पहिल्या सत्रात 31-18 अशी भक्कम आघाडी मिळवली होती. विशेष म्हणजे, गुजरातच्या बचावपटूंनी आपल्या चढाईपटूंना चांगली साथ दिली.

दुसऱया सत्रातही गुजरातने आपले आक्रमण कायम ठेवताना मुम्बाला ऑलआऊट केले. सामन्यात मुम्बा संघ एकदाही पुनरागमन करण्याच्या स्थितीत दिसला नाही. अखेरीस गुजरातने हा सामना 45-23 असा जिंकताना उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल केली आहे. काशिलिंग अडके, श्रीकांत जाधव या बहरात असलेल्या या खेळाडूंना सामन्यात छाप सोडता आली नाही. तसेच बचावफळीची निराशाजनक कामगिरी देखील मुम्बाच्या पराभवाला कारणीभूत ठरली. यू मुम्बातर्फे अनुप कुमारने सर्वाधिक 7 गुण मिळवले. श्रीकांत जाधवने 5 तर काशिलिंग अडकेने 3 गुणाची कमाई केली.

स्पर्धेतील अन्य एका लढतीत पटना पायरेट्सने नवख्या तमिळ थैलवाजवर 41-39 असा निसटता विजय संपादन केला. ब गटात पटना संघ 59 गुणासह पहिल्या स्थानी असून तमिळ संघ 22 गुणासह शेवटच्या स्थानी आहे. पटना संघातर्फे मोनु गयातने सर्वाधिक 12 गुणाची कमाई केली.

Related posts: