|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पंजाबी युवकाच्या आत्महत्येने खळबळ

पंजाबी युवकाच्या आत्महत्येने खळबळ 

वार्ताहर/ आंबोली

आंबोली येथील एका लॉजवर पंजाबमधील एका युवकाने आत्महत्या केल्याचे बुधवारी उघड झाले. जझिंदर बलदेवसिंग विर्क (25) असे या युवकाचे नाव आहे. त्याने पगडीच्या सहाय्याने लॉजच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. या युवकाने अमृतसर-पंजाब येथील एका प्राध्यापक युवतीचे अपहरण करून पलायन केल्याची माहिती समोर येत आहे. जझिंदरने पंजाबमधून आणलेली कार पब्लिक स्कूलसमोर संशयास्पदरित्या सापडली आहे. या युवकाच्या शोधात पंजाब पोलीसही होते. हे पोलीस विमानाने गोवा येथे या युवकाचा शोध घेत आले होते. त्यांनी सायंकाळी आंबोलीत धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांना विर्क याचे रक्ताळलेले कपडे आढळले.

दरम्यान, घटनास्थळाची उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस, निरीक्षक सुनील धनावडे, तहसीलदार सतीश कदम यांनी पाहणी केली. घटनास्थळी
ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. पंजाबचे पोलीस या युवकाबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करीत होते. मात्र, युवकाची आत्महत्या आणि पंजाब पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी सावंतवाडीत दाखल झाल्यामुळे या प्रकरणी मोठे गूढ निर्माण झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पंजाब पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले आहेत.

जझिंदरच्या खिशात आढळलेल्या पॅनकार्डच्या आधारे त्याची ओळख पटली. दरम्यान, जझिंदरची कार आंबोली पब्लिक स्कूलसमोर बंद पडली होती. त्यामुळे ती त्याने तेथेच टाकली. ही कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यात कोयता, सुरी, सिरींज तसेच चिठ्ठी सापडली आहे. कोयता व सुरीला तसेच गाडीतही रक्ताचे डाग पोलिसांना आढळले. त्यामुळे पोलीस या संदर्भात सखोल चौकशी करत आहेत.

जझिंदरसंदर्भात अपहृत प्राध्यापक युवतीच्या नातेवाईक असलेल्या एका युवतीने पोस्ट टाकली असून त्यात जझिंदरने एका युवतीचे अपहरण केल्याचा उल्लेख आहे. तसेच तिने सदर युवती तसेच जझिंदर आणि त्याच्या कारचा फोटोही टाकला आहे. तसेच या संदर्भात पंजाब पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. या माहितीनुसार या युवतीचे अपहरण 11 सप्टेंबरला करण्यात आले असून फेसबुकवर ज्या नंबरच्या कारचा फोटो टाकण्यात आला त्याच नंबरची कार आंबोलीत सापडली आहे.

आंबोली येथील एका लॉजमध्ये जझिंदर विर्क हा मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास आला होता. त्यावेळी हॉटेल मालकाने चेकआऊट असल्यामुळे थोडावेळ थांबण्यास सांगितले. दुपारी दीडच्या सुमारास हा युवक आला. त्याने आपली गाडी पब्लिक स्कूलसमोर बंद पडली असून आपली माणसे गोव्याहून येणार आहेत. तोपर्यंत मला रुम भाडय़ाने द्या, असे सांगितले. हॉटेल मालकाने त्याच्याकडे आयडी प्रुफ मागितला. त्यावर जझिंदर याने पॅनकार्ड दिले. पॅनकार्डची नोंदही मालकाने यांनी रजिस्टरमध्ये केली.

मंगळवारी दुपारी शेजारच्या हॉटेलमधून वेटरने जझिंदरला जेवण आणून दिले होते. बुधवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास शेजारच्या वेटरने ‘विडी’ आणून दिली. सकाळपासूनच हॉटेल मालकाने रुम कधी सोडणार, असे दोनवेळा त्याला विचारले. त्यावर त्याने गोव्याहून माणसे आली की रुम खाली करतो, असे सांगितले. मात्र, बराचवेळ झाल्याने मालक विचारण्यासाठी खोलीकडे गेले. दरवाजाही ठोठावला. परंतु आतून आवाज आला नाही. त्यामुळे त्यांनी खिडकी उघडून पाहिले असता युवकाने छताला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. खोलीत बेडवर विडीची थोटके, पार्ले बिस्कीटचा कागद, चहाचे ग्लास, एक छोटी बॉटल दिसून आली. तसेच भिंतीवर नंबर आणि नाव लिहिलेले दिसले. या संदर्भात आंबोली दूरक्षेत्राचे हवालदार विश्वास सावंत, गजानन देसाई यांना कळविण्यात आले. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामाही करण्यात आला. त्यावेळी रक्ताळलेले कपडे आढळून आले. हा युवक लॉजमध्ये येताना ब्लँकेट परिधान करून आला होता. त्यामुळे रक्ताळलेले कपडे आपल्याला दिसले नसल्याचे हॉटेल मालकाने सांगितले.

                          होंडा सिटी कार आढळली

आंबोली पब्लिक स्कूलसमोर सकाळी चंदिगड पासिंगची होंडा सिटी कार (सीएच-03-के-0012) नागरिकांना दिसली. त्यांनी यासंदर्भात पोलिसांना कल्पना दिली. पोलिसांनी या कारची पाहणी केली असता मागील बाजू चेपलेली आढळली. तसेच रक्ताचे डागही आढळले. कारमध्ये कोयता, सुरी, सिरींज आणि चिठ्ठीही आढळली. कोयता व सुरीवर रक्ताचे डाग होते. ही कार या युवकाचीच असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

दरम्यान, घटनास्थळी युवकाच्या दोन्ही हाताच्या सांध्यावर जखमा आढळून आल्या. घटनास्थळी पोलिसांनी श्वानपथकही मागविले. परंतु यासंदर्भात सिंधुदुर्ग पोलीस कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ करीत होते. पंजाब पोलिसांनी आंबोलीतून सायंकाळी गोव्याला जाणे पसंद केले.

                            युवतीचा पत्ता नाही

पॅनकार्डच्या आधारे ओळख पटलेला युवक तोच आहे, यासंदर्भात स्पष्टता होत नव्हती. फेसबुकवर ज्या नंबरच्या कारचा फोटो टाकण्यात आला होता, त्या नंबरच्या कारवर फेसबुकवर लाल दिवा होता. त्यामुळे हा युवक नेमका कोण असा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांनी गुप्तता पाळल्यामुळे याबाबत गूढ निर्माण झाले आहे. या युवकाने युवतीचे जर अपहरण केले असेल तर ही युवती कोठे आहे, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

पंजाबच्या पोलिसांची आंबोलीत धाव

जझिंदरच्या शोधात पंजाबचे पोलीस होते. हा युवक गोव्यात असल्याची माहिती पंजाब पोलिसांना मिळाली. त्यानुसार पंजाबचे वरिष्ठ पोलीस अधिकारी गोव्यात आले होते. मात्र, तेथे हा युवक आढळला नाही. त्यामुळे पंजाब पोलिसांनी सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याशी संपर्क साधला. या दरम्यान आंबोलीत एका युवकाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पॅनकार्डच्या आधारे हा युवक पंजाबचा असल्याचे सिंधुदुर्ग पोलिसांना कळले. त्यामुळे त्यांनी पंजाबच्या या वरिष्ठ अधिकाऱयांना माहिती दिली. पंजाबचे अधिकारी आंबोलीत दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. मात्र, त्यांनी या युवकाबाबत तसेच घटनेबाबत माहिती देण्याचे टाळले.

Related posts: