|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » रोहिंग्या बेकायदा स्थलांतरीच, शरणार्थी नाहीत

रोहिंग्या बेकायदा स्थलांतरीच, शरणार्थी नाहीत 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

म्यानमारमधून भारतात घुसखोरी केलेल्या रोहिंग्य मुस्लिम शरणार्थी नाहीत. त्यांनी बेकायदा स्थलांतरणच केले आहे, अशी स्पष्ट व परखड भूमिका केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मांडली. त्यांचा मुद्दा मानवाधिकाराचा मुद्दा होऊच शकत नाही. म्यानमार त्यांना परत घेत असेल तर त्याला विरोध करण्याचे कारणच काय ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राष्ट्रीय मानवाधिकार कार्यक्रमात त्यांनी हा मुद्दा ठोसपणे मांडला. संयुक्त राष्ट्र संघाच्या अंदाजानुसार सुमारे 4 लाख 20 हजार रोहिंग्यांनी म्यानमारमधून पलायन केले आहे. भारतात सुमारे 40 हजार रोहिंग्या असून प्रामुख्याने हैदराबाद, जम्मू काश्मीर, आसाम, पश्चिम बंगाल या भागात त्यांचा अधिवास आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून रोहिंग्यांचा दहशतवादी संघटनांशी संपर्क आल्याने त्यांच्यापासून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याचे प्रतिज्ञापत्रही सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने सादर केले आहे. याबाबतचे पुरावेही देण्यात आले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर रोहिंग्यांच्या मदतीने कुख्यात गुंड दाऊद स्वतंत्र सैन्य उभे करत असल्याचाही अहवाल प्राप्त झाले आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना राजनाथसिंह म्हणाले, शरणार्थी म्हणून स्वीकारताना कोणत्याही राष्ट्राला कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते. तथापि रोहिंग्यांबाबत तसे झालेले नाही. त्यांनी अवैधरित्या भारतात घुसखोरी केलेली आहे. म्हणूनच केंद्र सरकारने त्यांना भारताबाहेर काढण्याची भूमिका घेतली असल्याचेही राजनाथसिंह म्हणाले.

रोहिंग्यांना म्यानमार परत घेण्यास तयार आहे. आणि भारताने या प्रश्नामध्ये कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायदा अथवा नियम, मान्यतांचे उल्लंघन केले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय निर्वासितांबाबतच्या आंतरराष्ट्रीय करार भारताने स्वीकारलेला नाही. मानवाधिकाराचा मुद्दा पुढे करुन घुसखोरांना शरणार्थी म्हणण्याची चूक करणे योग्य ठरणार नाही, असेही राजनाथसिंह यांनी सांगितले.

दरम्यान, संयुक्त राष्ट्र संघासह आंतरराष्ट्रीय स्तरावरुन म्यानमारच्या अध्यक्षा आंग सू की यांच्यावर रोहिंग्यांना परत बोलवण्याबाबत व त्यांच्यावरील अत्याचार थांबवण्याबाबत दबाव वाढत आहे. तथापि त्यांनी असा दबाव धुडकावून लावणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रश्नाचा गुंता वाढत आहे.