|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » डिस्कव्हरी चॅनलवर अनुभवली ‘कमांडो’ची झलक

डिस्कव्हरी चॅनलवर अनुभवली ‘कमांडो’ची झलक 

बेळगावातील कमांडो प्रशिक्षण केंद्राची माहिती पोहोचली जगभर

प्रतिनिधी / बेळगाव

खडतर असे ‘कमांडो’ प्रशिक्षण देणाऱया बेळगावातील कमांडो प्रशिक्षण केंद्राची शिक्षण सुविधा शनिवारी डिस्कव्हरी चॅनलच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचली. ‘कमांडो’ प्रशिक्षणाची येथे असणारी व्यवस्था अनेकांसाठी प्रेरक ठरली आहे. बेळगावकरांसाठी ही बाब अभिमानास्पद अशीच ठरली.

डिस्कव्हरी चॅनलने बेळगावातील कमांडो टेनिंग स्कूलच्या विविध विभागांचे दर्शन घडविले. मराठा लाईट इन्फंट्रीच्या प्रशिक्षण केंद्रासह कमांडो प्रशिक्षण केंद्र (जे. एल. विंग) या केंद्रानेही आपला ठसा उमटविला आहे. देश रक्षणासाठी अत्यंत कुशल आणि कणखर असे प्रशिक्षित मनुष्यबळ सज्ज करण्याची व्यवस्था केंद्राने केली आहे.

पहाटेच्या सुमारास जागे होऊन कठोर शारीरिक कसरती करण्यापासून या कमांडोंचा दिवस सुरू होतो. दगड-धोंडय़ांमधून धावत जाणे असो किंवा डोंगर कपारींमधून उंच चढाई करण्याची कामगिरी असो, या कमांडोंना प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देण्याचे बाळकडूच येथे दिले जाते.

जंगल आणि डोंगरांनी व्यापलेल्या भागामध्ये युद्धजन्य परिस्थितीत अनेक संकटांचा सामना करण्यासाठी येथे कमांडो घडविले जातात. सध्या उद्भवलेल्या दहशतवाद्यांच्या कारवायांवर अंकुश ठेवून त्यांचा बिमोड करण्यासाठी कमांडोंना प्रशिक्षण देण्यात येते. उंचावरून नदीमध्ये उडय़ा टाकून पोहून जाणे असो किंवा जंगलामध्ये साप आणि अन्य हिंस्र श्वापदांचा मुकाबला करण्याचेही शिक्षण येथे मिळते. हातात शस्त्रs नसताना लढण्याची तयारी हे कमांडो करतात. त्याचप्रमाणे आधुनिक शस्त्रs चालविण्याची कामगिरीही करतात.

कमांडोंच्या या प्रशिक्षण सुविधेची झलक यापूर्वी ‘प्रहार’सारख्या चित्रपटाच्या माध्यमातून घडली होती. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात कौतुक आणि आदराचा विषय ठरलेल्या या प्रशिक्षण केंद्राची माहिती डिस्कव्हरी चॅनलच्या माध्यमातून जगभर पोहोचली आहे.