|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » गुजरातमध्ये गरीबांचे सरकार आणू !

गुजरातमध्ये गरीबांचे सरकार आणू ! 

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचे वक्तव्य : द्वारकाधीशाची केली पूजा,  3 दिवसीय दौऱयात सौराष्ट्राला प्राधान्य

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

 काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सोमवारी 3 दिवसांच्या दौऱयानुसार गुजरातच्या द्वारकामध्ये पोहोचले. येथे त्यांनी द्वारकाधीश मंदिरात पूजा केली. भाजप निवडक उद्योजकांनाच वीज-भूखंड उपलब्ध करत आहे. गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार आले तर ते गरीब-शेतकरी आणि तरुणाईचे असेल असे प्रतिपादन राहुल यांनी केले. तर दुसरीकडे पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी ट्विट करत राहुल यांचे गुजरातमध्ये स्वागत केले. या ट्विटचे अनेक अर्थ काढले जात आहेत. चालू वर्षाअखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.

पूर्ण देशासाठी एक कर आणावा अशी सूचना आम्ही सरकारला केली. नवा कर  कालबद्ध पद्धतीने आणला जावा. सरकारने जीएसटी आणण्यात घिसाडघाई केली. सध्या दर महिन्याला व्यापाऱयांना 3 अर्ज भरावे लागतात. मोठे व्यापारी हे सहजपणे करू शकतात, छोटय़ा व्यापाऱयांना याचा त्रास होतो. सरकारकडे गरीबांसाठी काहीच नाही. गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार आले तर गरीबांच्या कल्याणावर भर दिला जाईल असे राहुल म्हणाले.

सुरक्षा देण्यास नकार

पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव द्वारकाहून जामनगरपर्यंत 135 किलोमीटरच्या अंतरात राहुल यांना खुल्या वाहनातून प्रवास करण्याची अनुमती नाकारली. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या विशेष बसमधून प्रवास करावा लागल्याचे समजते. द्वारकापासून 25 किलोमीटर अंतरावरील हंजरापार गावाला बैलगाडीतून भेट देण्याची योजना राहुल यांची होती.

राहुल हे सोमवारी रात्री जामनगरमध्येच थांबणार होते. मंगळवारी ते राजकोटला जातील. राजकोट हे शहर मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा गृहजिल्हा आहे. राजकोटला सौराष्ट्राचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. राहुल हे पाटीदार समुदायाच्या खोडलधाम मंदिराला भेट देतील. बुधवारी सुरेंद्रनगरला जात तेथील चोटिला मंदिरात ते जाऊ शकतात. अहमदाबादच्या विरमगाममध्ये राहुल यांचा दौरा संपेल. विरमगाम हे हार्दिक पटेल यांचे गाव आहे.

Related posts: