|Monday, February 24, 2020
You are here: Home » विशेष वृत्त » ‘साधू माणूस…’

‘साधू माणूस…’ 

प्रशांत चव्हाण / पुणे :

लेखन हा पत्रकारिता आणि साहित्यातील समान दुवा. मात्र, तरीही हे दोन्ही घटक परस्परविरोधी मानले जातात. पत्रकारिता आणि साहित्यातील भाषेतील भिन्नत्व हे या मागचे कारण. असे असूनही ज्या अतिशय मोजक्या पत्रकारांनी पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रांत मुक्तपणे मुशाफिरी केली, त्यात अरुण साधू यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. विविध दैनिकांत व साप्ताहिकात कार्यरत असताना निर्भिडपणे आपली लेखणी चालविणाऱया साधू यांनी पत्रकाराच्या नजरेतून येथील राजकारणाचा पट आपल्या कादंबऱयांतून मांडलाच. किंबहुना, चीन, रशियासारख्या कम्युनिस्ट देशांच्या समाजव्यवस्थेचेही रसिकांना सखोल दर्शन घडवले. मराठी कथा-कादंबरी एका विशिष्ट चौकटीत अडकलेली असताना त्यांनी तिला वास्तवाची जोड देत नवा आयाम दिला. त्या अर्थी ही अरुण साधू यांचीही क्रांतीच म्हटली पाहिजे.

नित्य नवा दिस जागृतीचा, हा पत्रकारितेतील स्थायीभाव. एकीकडे विविध घटनांच्या मालिका, रोजचा वेगळा अनुभव नि दुसरीकडे त्यापोटी होणारी धावपळ या सगळय़ा धबडग्यात स्वतंत्र लिखाणासाठी विलक्षण प्रतिभा आणि तितकेच विलक्षण सातत्य अशा दोन्ही गोष्टींचा मिलाफ साधावा लागतो. साधूंनी या पलिकडे जाऊन लेखन केले. त्यामुळेच ते यशस्वी पत्रकार आणि तितकेच यशस्वी साहित्यिक होऊ शकले. हे लक्षात घ्यायला हवे.

माणूसमधून पायाभरणी

तब्बल 30 वर्षे पत्रकारिता करणाऱया साधू यांनी केसरी, माणूस, इंडियन एक्स्प्रेस, फ्री प्रेस जर्नल अशा दैनिकांत व साप्ताहिकात काम केले. मात्र, आजच्या सनसनाटी पत्रकारितेपेक्षा त्यांची बातमीदारी वेगळी होती. त्यातही त्यांनी आपले साधूत्व जपले. राजकारणावर अगदी बारकाईने लिहिणारे साधू राजकारण्यांपासून मात्र काही अंतर दूरच राहिले, हा त्यांचा विशेष म्हणावा लागेल. किंबहुना, पत्रकार म्हणून काम करीत असतानाही त्यांच्यातील संवेदनशील लेखक सतत जागा असे. ‘माणूस’मधून त्यांच्यातील लेखक खऱया अर्थाने लोकांपर्यंत पोहोचला, असे म्हणता येईल. साधू व माजगावकरांची भेट 1965 ची. चीनची सांस्कृतिक क्रांती, माओ त्से तुंग, डेंग पिंग, व्हिऐतनामचा ओजस्वी लढा, क्युबा, फिडेल, चे अशा विविध विषयांबद्दल ममत्व असणाऱया साधूंचे श्रीगमांशी कसे सूर जुळले नि एक्स्प्रेसमधून साधू ‘माणूस’मध्ये कसे स्थिरावले, हे सगळेच झपाटून टाकणारे ठरावे. या साप्ताहिकाच्या लेखमालेतूनच डॅगन जागा झाला, फिडेल, चे आणि क्रांती यांसारख्या पुस्तकांची बीजे रोवली गेली, असे म्हणता येईल.

फिडेल, चे अन्

क्युबा हा जगाच्या नकाशावरील मोहरीएवढा देश. म्हणजे तसा नगण्यच. मात्र, या देशातील क्रांती, त्यामधील फिडेल कॅस्ट्रो व चे गव्हेरा यांची भूमिका हा सगळा इतिहास साधू यांनी अत्यंत वेधकपणे या पुस्तकात मांडला आहे. अतिशय सहजसोप्या शैलीतील या लेखनामुळेच मराठी वाचक क्युबासह फिडेल आणि चेशी जोडले गेले, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. जेव्हा ड्रगन जागा होतो वा ड्रगन झागा झाल्यावर या पुस्तकांबाबतही तसेच म्हणता येईल. चीनमधील समाजव्यवस्थेबरोबरच तेथील सांस्कृतिक क्रांती, माओचे पोलादी नेतृत्व, डेंग पिंग यांच्या नेतृत्वाखालील आर्थिक सुधारणावाद व बदलता चीन याचे त्यांनी घडवलेले दर्शन अचाटच म्हटले पाहिजे. चीन समजून घेण्यासाठी आजही त्यांच्या या लिखाणाशिवाय दुसरा पर्याय नाही. तिसरी क्रांतीतून त्यांनी लेनिन, स्टॅलिन ते गोर्बचेव्हपर्यंतच्या सत्ताधिश, त्यांच्या धोरणांचा धांडोळा घेतानाच रशियन समाजजीवन, अन् या महाकाय देशातील विविध पैलूंवरबाबतही ऊहापोह केला आहे. डावीकडे झुकूनही डावेपणापासून अलिप्त असलेल्या साधू यांचा एकूणच आवाका स्तिमित करणारा ठरतो. पत्रकारिता, साहित्यिक म्हणून ख्यातकीर्त असलेल्या साधू यांनी पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र व संज्ञापन विभागाचे प्रमुखपदही समर्थपणे सांभाळले. पत्रकारितेच्या चंचुप्रवेश करणाऱया तरुणाईशी त्यांचा संवाद असे. पत्रकारितेतील बदलते संदर्भ, नवनवीन आव्हाने याची जाण असणाऱया साधू यांनी पत्रकारिता व साहित्य अशा दोहोंमध्ये एक संवादसेतू उभा केला, असे नक्कीच म्हणता येईल.

  राजकीय कादंबरीचे भाष्यकार

मराठी कादंबरी सशक्त असली, तरी जिला तद्दन राजकीय कादंबरी म्हणावी अशा कलाकृतीचे मराठीत उणे होते. राजकारणाची आवड असणाऱया साधू यांनी हे शिवधनुष्य पेलले. मुंबई दिनांक व सिंहासन या कादंबऱयांच्या माध्यमातून त्यांनी राजकीय जग रसिकांसमोर आणले. त्यांच्या त्रिशंकू, मुखवटा, तडजोड यांसारख्या कादंबऱयाही राजकीय वळणानेच जाणाऱया. अर्थात मुंबई दिनांक व सिंहासनच्या पार्श्वभूमीवर ‘सिंहासन’ हा चित्रपट आल्याने या कादंबऱया अधिक चर्चिल्या गेल्या. मात्र, त्यांच्या अन्य कादंबऱयांतील राजकीय आशयही समजून घेण्यासारखा आहे. मुंबई दिनांकमधून त्यांनी एकूणच महानगरीच्या वेगवान जगण्याचा वेध घेतानाच आपल्या राजकीय व्यवस्थेतील दोष, अपारदर्शकता, बरबटलेपणावरही झगझगीत प्रकाश टाकला आहे. तर सिंहासनसारखी कादंबरीही सत्ताकारण, डावपेच, नैतिकता यावर भाष्य करते. ग्नमराठीतील राजकीय कादंबरीबद्दल जेव्हा चर्चा होते, तेव्हा प्रामुख्याने या दोन कादंबऱयांचा उल्लेख होतो. रंगनाथ पठारे यांची ताम्रपट, सुरेश द्वादशीवार यांची वर्तमान यांसह काही कादंबऱयाही निश्चितपणे राजकारणाचा पट उलगडतात. तरीही मराठीत प्रगल्भ राजकीय कादंबरीपर लेखन तुलनेत अत्यंत कमीच झाले आहे, हे मान्य करावे लागते. त्यामुळे मराठी साहित्यात भविष्यात अधिकाधिक सकस, प्रगल्भ राजकीय कादंबरीलेखन व्हायला हवे. साहित्य, पत्रकारितेतील ‘साधू’ माणसाला हीच खरी श्रद्धांजली ठरेल.                           

                                    

Related posts: