|Monday, September 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 70 हजारांहून अधिक मुलांची सुटका : राजनाथ

70 हजारांहून अधिक मुलांची सुटका : राजनाथ 

गृह मंत्रालयाला मोठे यश : बेपत्ता मुलांच्या शोधार्थ राबविण्यात आले ‘ऑपरेशन स्माईल’

वृत्तसंस्था /  नवी दिल्ली

 बेपत्ता असलेल्या 70 हजारांहून अधिक मुलांना देशाच्या विविध भागातून शोधून काढत कुटुंबीयांकडे सोपविण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी मंगळवारी दिली. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मोहिमेंतर्गत बेपत्ता मुलांच्या शोधासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.

बालमजूर विषयक चर्चासत्राला संबोधित करताना राजनाथ यांनी 2022 पर्यंत देशातून बालमजुरीचे उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य केले. गृहमंत्रालयाद्वारे ‘ऑपरेशन स्माईल’ राबवून बेपत्ता मुलांचा शोध घेण्यात आला. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत 70 हजारांपेक्षा अधिक मुलांची सुटका करण्यात आल्याचे ते म्हणाले.

जानेवारी 2015 मध्ये गृहमंत्रालयाने ऑपरेशन स्माईलचा शुभारंभ केला होता. या मोहिमेद्वारे बेपत्ता मुलांचा शोध आणि त्यांचे पुनर्वसन करण्याची योजना आखण्यात आली. राज्य सरकारांकडून या मोहिमेला सक्रीय मदत मिळाल्याने मोठे यश मिळाले.

बालपण हे देवाने दिलेली सुंदर भेट असते, परंतु अनेक मुलांना बालमजुरीच्या विळख्यात ओढून त्यांचे हे सुख हिरावून घेतले जाते. बालमजुरीमुक्त भारत निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पुढील 5 वर्षांमध्ये बालमजुरीच्या उच्चाटनासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करू. 2022 पर्यंत बालमजुरीमुक्त भारत निर्माण करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रतिज्ञा घेऊया असे ते यावेळी म्हणाले.

या चर्चासत्रात ‘पेन्सिल’ नावाच्या पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला. या पोर्टलच्या माध्यमातून संबंधित सर्व घटकांना बालमजुरी रोखण्यासाठी एक व्यासपीठ मिळेल. राष्ट्रीय बालमजुरी प्रतिबंधक प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीस हे पोर्टल मदत करेल. पेन्सिल (प्लॅटफॉर्म फॉर इफेक्टिव्ह इन्फोर्समेंट फॉर नो चाइल्ड लेबर) हे एक ई-प्लॅटफॉर्म असून ते केंद्रीय कामगार मंत्रालयाने विकसित केले
आहे.

 केंद्राला राज्य सरकार, जिल्हा आणि इतर प्रकल्प संस्थांशी जोडण्यास हे पोर्टल उपयुक्त ठरेल आणि यातून प्रभावी अंमलबजावणी होऊ शकेल. या पोर्टलवर चाइल्ड टॅकिंग सिस्टीम, तक्रार विभाग, राज्य सरकार, राष्ट्रीय बालमजुरी विरोधी प्रकल्प आणि एककेंद्राभिमुखता हे पाच घटक अंतर्भूत आहेत.