|Friday, November 15, 2019
You are here: Home » leadingnews » पेट्रोलवरील सेस कायम राहणार : रावसाहेब दानवे

पेट्रोलवरील सेस कायम राहणार : रावसाहेब दानवे 

पुणे / प्रतिनिधी :

पेट्रोलचे दर हे आंतराष्ट्रीय बाजारपेठेतील दरावर अवलंबून असतात. त्यात चढउतार असले, तरी वाहतुकीचा खर्च वाढतोच आहे. त्याचबरोबर दुष्काळही कधी सांगून येत नाही. त्यामुळे सध्या दुष्काळ असो किंवा नसो. पेट्रोलवरील सेस कायम राहीलच, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले. ज्येष्ठ नेते नारायण राणेंच्या दिल्ली भेटीदरम्यान राजकीय चर्चाही झाल्या. त्या चर्चेला मूर्त स्वरूप मिळाले, की पक्ष काय ते सांगेल, असेही त्यांनी सांगितले.

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडच्या दौऱयावर असताना दानवेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते.

पेट्रोलच्या दरातील वाढीबाबत विचारले असता दानवे म्हणाले, पेट्रोलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारानुसार ठरवले जात असतात. हे दर कमी झाले असले, तरी वाहतुकीवरील खर्च वाढतोच आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलवर अधिभार लावण्यात आला होता. प्रत्येक राज्य सरकार असा कर लावत असते. राज्यात आता दुष्काळ नसला तरीदेखील दुष्काळ हा सांगून येत नाही. तो कधीही येऊ शकतो. त्यामुळे पेट्रोलवर आकारण्यात येणारा अधिभार कायम राहील.

दानवे म्हणाले, राणे हे दिल्लीमध्ये आले होते. मी स्वतः, चंद्रकांतदादा पाटील, मुख्यमंत्री व राणे यांची माझ्या दिल्लीतील घरी बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री कोरियाच्या दौऱयावर गेले. त्यामुळे आम्ही तिघेच शहांना भेटलो. भेटीत राणे यांनी रुग्णालयाच्या उद्घाटनाचे निमंत्रण शहा यांना दिले. मात्र, या भेटीत राजकीय चर्चा झाल्या. परंतु, या सगळय़ाला जेव्हा मूर्त स्वरूप येईल, तेव्हाच आपण काय ते त्याबाबत सांगू, असे सांगत त्यांनी राणे यांच्या पक्षप्रवेशाच्या आशा जिवंत ठेवल्या.

Related posts: