|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शिक्षक व शिक्षण विभागाच्या तक्रारी वाढत्या!

शिक्षक व शिक्षण विभागाच्या तक्रारी वाढत्या! 

कुडाळ पं. स. बैठकीत बीडिओंची कबुली

प्रतिनिधी / कुडाळ :

शिक्षकांच्या तसेच शिक्षण विभागाच्या तक्रारी वाढत आहेत हे खरं आहे, अशी स्पष्ट कबुली बुधवारी येथे झालेल्या कुडाळ पंचायत समितीच्या बैठकीत गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी देऊन या विभागाच्या संबंधित सर्व अधिकाऱयांची बैठक घेऊन त्यांना यापुढे शिक्षण विभागाच्या तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता घ्या, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, असेही सांगितले.

ही बैठक आज छत्रपती धर्मवीर संभाजीराजे सभागृहात पं. स. सभापती राजन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसभापती श्रेया परब, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी एम. बी. भोई यांच्यासह पं. स. सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते.

बदलीने ज्या शाळेवर शिक्षकाला नियुक्त करण्यात आले होते. त्या शाळेत शिक्षक हजर होत नाहीत. हा विषय गेल्या दोन बैठकांमधून चर्चेत आहे. हुमरस शाळेत ते शिक्षक हजर झाले आणि रजेवर गेले. याबाबत स्वप्ना वारंग यांनी प्रश्न विचारून सभागृहाला माहिती द्यावी, अशी मागणी केली. हाच धागा पकडून अरविंद परब यांनी शिक्षकांबाबत अनेक तक्रारी येतात. त्याचबरोबर शिक्षण विभागही सक्षमपणे काम करीत नाही, अशाही तक्रारी आहेत. सदस्यांनी या विभागावर गेल्या दोन बैठकांमधून चर्चा घडवून आणली आहे. यापूर्वीच्या बैठकीत झालेल्या ठरावाची पूर्तता काय झाली, याची माहिती सभागृहाला देण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर चर्चा सुरू असताना चव्हाण यांनी वरील माहिती देताना मागील बैठकीत झालेल्या ठरावाबाबत त्यांनी सांगितले. मुख्याध्यापकांनी त्या शिक्षकांना कार्यमुक्त केले होते. ते शिक्षक रजेवर गेले होते. त्यामुळे मुख्याध्यापक व त्या शिक्षकांवर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही, असे सांगताना सभागृहात खोटी माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल करणाऱया संबंधित त्या अधिकाऱयावर काय कारवाई होणार किंवा नाही हे सांगण्याचे टाळले.

आजच्या बैठकीत रस्त्यांवरील खड्डे, घरकुल योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांचे पैसे काही लाभार्थींना मिळाले नाहीत, यासह अनेक विषयांवर डॉ. सुबोध माधव, शीतल कल्याणकर, शरयू घाडी, सुप्रिया वालावलकर यांनी चर्चेत सहभाग घेतला. ग्रा. पं. निवडणूक आचारसंहिता असल्याने आजच्या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेण्यात आले नाहीत.

Related posts: