|Sunday, January 26, 2020
You are here: Home » क्रिडा » ऍशेस मालिकेसाठी इंग्लिश संघ जाहीर

ऍशेस मालिकेसाठी इंग्लिश संघ जाहीर 

वादग्रस्त अष्टपैलू बेन स्टोक्सची संघात वर्णी, मालिकेला 23 नोव्हेंबरपासून प्रारंभ

वृत्तसंस्था/ लंडन

नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍशेस मालिकेसाठी 16 सदस्यीय इंग्लिश संघ बुधवारी जाहीर करण्यात आला. विंडीजविरुद्ध मालिकेदरम्यान वादग्रस्त ठरलेल्या 26 वर्षीय अष्टपैलू बेन स्टोक्सची संघात वर्णी लागली आहे. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठित ऍशेस मालिकेला 23 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार असल्याचे ईसीबीने यावेळी स्पष्ट केले.

सध्या विंडीजविरुद्ध सुरु असलेल्या वनडे मालिकेतील तिसऱया वनडेनंतर बेन स्टोक्सने हाणामारी केली होती. यानंतर, पोलिसांनी त्याला अटक करुन सोडून दिले हेते. यामुळे विंडीजविरुद्ध चौथ्या व पाचव्या वनडेसाठी त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍशेस मालिकेसाठी अष्टपैलू स्टोक्सची संघात गरज असल्याचे ईसीबी निवड समितीचे अध्यक्ष जेम्स व्हाईटटेकर यांनी यावेळी सांगितले. तसेच या मालिकेसाठी 23 वर्षीय युवा गोलंदाज क्रेग एव्हर्टन व फिरकीपटू मेसन क्रेनला संघात स्थान देण्यात आले. शिवाय, मध्यफळीतील फलंदाजीच्या जबाबदारीसाठी गॅरी बॅलन्स, जेम्स व्हिन्स यांनाही संघात स्थान मिळाले आहे.

अपेक्षेप्रमाणे, निवड समितीने ज्यो रुटकडे कर्णधारपदाची धूरा कायम ठेवली असून बेन स्टोक्सकडे उपकर्णधारपद सोपवले आहे. अनुभवी ऍलेस्टर कूक, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, बेन स्टोक्स, कर्णधार रुट यांच्याकडे फलंदाजीची जबाबदारी असेल. जिमी अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स यांच्याकडे वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व असेल. 2015 मध्ये मायदेशी ऍलेस्टर कूकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने मालिका जिंकली होती. यंदाही ऑस्ट्रेलियात इंग्लिश संघ चमकदार कामगिरी करेल, असा विश्वासही व्हाईटटेकर यांनी व्यक्त केला. उभय संघातील पहिली कसोटी 23 ते 27 नोव्हेंबरदरम्यान, ब्रिस्बेन येथे खेळवली जाईल.

इंग्लिश संघ – ज्यो रुट (कर्णधार), ऍलेस्टर कूक, मार्क स्टोनमन, जेम्स व्हिन्स, डेव्हिड मालन, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, ख्रिस वोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलन्स, जॅक बॉल, क्रेग एव्हर्टन, मसून क्रेन.

 

ऍशेस मालिकेतील वेळापत्रक –

   कसोटी          तारीख          ठिकाण

  1. पहिली कसोटी 23-27 नोव्हेंबर ब्रिस्बेन
  2. दुसरी कसोटी (दिवस-रात्र) 2-6 डिसेंबर ऍडलेड
  3. तिसरी कसोटी 14-18 डिसेंबर पर्थ
  4. चौथी कसोटी 26-30 डिसेंबर मेलबोर्न

5. पाचवी कसोटी  4-8 जानेवारी सिडनी.

Related posts: