|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करावे !

पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करावे ! 

अमेरिकेच्या माजी संरक्षण अधिकाऱयाने केली मागणी

वृत्तसंस्था /  वॉशिंग्टन

 दहशतवादाचे आश्रयस्थान ठरलेल्या पाकिस्तानच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक आवाज उठत आहेत. आता अमेरिकेत पेंटागॉनच्या एका माजी अधिकाऱयाने पाकला दहशतवादाला पुरस्कृत करणारा देश घोषित करण्याची वेळ आली असल्याचे म्हटले. याचबरोबर या अधिकाऱयाने कतार आणि तुर्कस्तानला देखील या शेणीत सामील करण्याची मागणी केली.

दहशतवादाच्या मुद्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला अगोदरच झोडपले असून यावरून दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये कटुता आली आहे. एका स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकीय पानावर अमेरिकेन एंटरप्राइज इन्स्टिटय़ूटचे (एईआय) तज्ञ मायकल रबिन यांनी लेख लिहिला असून यात पाकविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली.

पाकला दहशतवादासाठी जबाबदार ठरविण्याची वेळ आली आहे. जर पाकला निर्बंध नको असतील तर त्याने दहशतवाद्यांना तुरुंगात टाकावे. दहशतवादाचे वित्तपोषण आणि इतर प्रकारची मदत बंद करावी असे मायकल यांनी लेखात नमूद केले.

1979 पासून अमेरिकेचा विदेश विभाग दहशतवादाला पुरस्कृत करणाऱया देशांची यादी निर्माण करतो. लीबिया, इराक, दक्षिण येमेन, सीरिया, क्यूबा, इराण, सुदान आणि उत्तर कोरियाद्वारे सातत्याने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घटनांना समर्थन देण्यात आल्याने त्यांना अमेरिकेने या यादीत टाकले होते. बदलत्या समीकरणांनुसार अनेक देशांना या यादीतून वगळण्यात आले. आता या यादीत इराण, सीरिया आणि सुदान यांचाच समावेश आहे.

जग दहशतवादी कारवायांनी पीडित असताना अमेरिकेने खऱया उद्देशासाठी दहशतवादाला पुरस्कृत करणाऱया देशांची यादी जाहीर करण्याची गरज आहे. एखादा देश अमेरिकेचा सहकारी आहे किंवा नाही यावरून त्याचे स्थान ठरू नये. दहशतवादी राष्ट्रांमध्ये तुर्कस्तान, कतार आणि पाकचा समावेश व्हावा असे रबीन यांनी लेखात नमूद केले.