|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अंदाधुंद गोळीबारात 50 ठार

अंदाधुंद गोळीबारात 50 ठार 

अमेरिकेतील लास वेगासमध्ये हाहाकार : संगीत समारंभ लक्ष्य : 400 हून अधिक जखमी, एका हल्लेखोराचा खात्मा

लास वेगास / वृत्तसंस्था

अमेरिकेतील लास वेगास शहरात हल्लेखोरांनी एका कॅसिनोत सुरू असलेल्या संगीत समारंभात अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये तब्बल 50 जण ठार झाले असून 400 हून अधिक लोक जखमी झाले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ही गोळीबाराची घटना लास वेगास सनसेट स्ट्रिप परिसरातील मँडले बे कॅसिनोजवळ घडली. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुरक्षा यंत्रणा सतर्क केली. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि हल्लेखोरांमध्ये चकमक सुरू झाली. काही वेळानंतर पोलिसांनी एका हल्लेखोराचा खात्मा केला आहे. अन्य हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. या हल्ल्याची जबाबदारी आयएस या संघटनेने स्वीकारली आहे. या हल्ल्यामुळे मॅकरेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारी विमाने वळविण्यात आली होती.

स्थानिक वेळेनुसार रात्री 10:30 वाजता गोळीबाराला सुरुवात झाली. या कॅसिनोमध्ये कंट्री म्युझिक फेस्टिव्हल सुरु होता. यावेळी गायक जेसोन एल्डिनचा परफॉर्मन्स सुरु असताना गोळीबार झाला. हल्लेखोरांनी मशीनगनमधून गोळीबार सुरू करताच परिसरात जमलेल्या लोकांची धावपळ सुरू झाली. यावेळी गर्दीमध्ये बरीच चेंगराचेंगरीही झाली. गोळीबार सुरू होताच हल्लेखोराला टिपण्यासाठी पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. एका शूटरला कंठस्नान घातल्याची माहिती लास वेगास पोलिसांनी ट्विटरवर दिली आहे. बंदुकधाऱयांना शोधण्यासाठी तातडीने घटनास्थळी विशेष स्वॉट पथक मागविण्यात आले. या पथकाद्वारे शोधमोहीम सुरू झाली. मात्र, हल्लेखोरांची संख्या नेमकी किती आहे हे न समजल्यामुळे परिसरात व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारला गेलेला हल्लेखोर हा स्थानिक रहिवासी होता. पोलिसांनी नागरिकांना या भागात जाण्यास मज्जाव केला आहे. विद्यापीठाच्या वैद्यकीय विभागाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 14 जणांची प्रकृती गंभीर आहे. 408 जणांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

दोन ते तीन हल्लेखोर कॅसिनोत घुसले आणि त्यांनी 32 व्या मजल्यावरून गोळीबार करण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येते. अचानक सुरू झालेल्या गोळीबारामुळे एकदम पळापळ सुरू झाली. सोशल मीडियावर कार्यक्रमस्थळी गोळीबारानंतर झालेल्या पळापळीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत गोळीबाराचा आवाजही ऐकू येतो. घटनेनंतर पोलिसांनी लगेच परिसराचा ताबा घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मँडले बे रिसॉर्ट आणि कॅसिनो येथे एका हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. आम्ही मँडले बे कॅसिनोच्या परिसरात सक्रिय असलेल्या हल्लेखोराचा शोध घेत आहोत. नागरिकांनी या परिसरापासून दूर राहावे, असे ट्विट लास वेगास मेट्रोपोलिटन पोलिसांनी केले आहे.