|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » बसस्थानकातील केलेला वाढदिवस आला युवकांच्या अंगलट

बसस्थानकातील केलेला वाढदिवस आला युवकांच्या अंगलट 

प्रतिनिधी/ सातारा

सध्याचा महाविद्यालयीन युवक बेभान होवू लागला आहे. त्याची चित्रे सातारा बसस्थानकात आणि स्थानकालगत नव्याने झालेल्या सेव्हनस्टार इमारतीच्या कठडय़ावर स्पष्टच दिसतात. सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास विविध महाविद्यालयातील युवकांच्या एका टोळक्याने आपल्या एका सहकाऱयाचा वाढदिवस चक्क दुचाकीवर केक कापून तोंडाला केक फासून साजरा करत होते. सर्व प्रवाशीवर्ग या टोळक्याकडे बघत होते. मात्र, सातारा बसस्थानकातील पोलीस चौकीतील प्रवीण पवार यांना ही माहिती समजताच त्यांनी या युवकांना ताब्यात घेतले अन् चांगलीच समज देवून सोडून दिले.

हल्लीचा जमाना बदलला आहे, अशी वाक्य ज्याच्या त्याच्या तोंडी असतात. ते महाविद्यालयाबरोबरच बसस्थानकाचा परिसर पाहिल्यानंतर स्पष्टच होते. सातारा बसस्थानकात तर बेशिस्तीचे दर्शन नेहमीच दिसते. टवाळखोर युवकांचा नेहमीच गराडा असतो. महाविद्यालयांचा अंगावर पोशाख असला तरीही उलटा भांग, आणि कपाळावर चाँद, कानात बाली अन् दुचाकीची मुठ पिळत हे युवक घिरटय़ा घालत असतात. यामुळे वादावादीचे प्रकार सातत्याने घडतात. मुलींच्या छेडछाडीच्या घटनाही घडतात. त्यातच सातारा बसस्थानकालगत झालेल्या सेव्हनस्टार इमारतीमध्ये अनेक हॉटेल्स आहेत. त्याच समोर चांगला कट्टाही या टवाळखोर युवकांचा अड्डा बनला आहे. विशेष म्हणजे या कट्टय़ावर कोणाला बदडायचे कोणाला प्रपोज मारायचा याच्याच्या गप्पांच्या मैफिली रंगलेल्या असतात. सोमवारी बहुतांशी सर्व महाविद्यालयांना सुट्टी होती. तरीही एसटीचा पास आहे ना?, साताऱयाला येवू मजा करुन असा होरा असलेल्या युवकांनी साताऱयात येवून चकाटय़ा पिटल्या. त्यातील एका टोळक्याने आपल्या मित्राचा वाढदिवस चक्क बसस्थानकात साजरा करण्याचा बेत आखला. महाविद्यालयीन युवतीं आणि इतर प्रवासी शहर बसस्थानक विभागात ताटकळत थांबले असताना या टोळक्यातील एका मित्राच्या दुचाकीवर केक ठेवून कापला अन् चांगलेच हे टोळके रंगात आले होते. याची माहिती स्टॅण्ड चौकीतील प्रवीण पवार यांना मिळाली. पवार लगेच धावत गेले अन् ज्याचा वाढदिवस होता त्याचीच बकोटी पकडली. त्याच्या सर्व मित्रांना लगेच त्यांनी चौकी दाखवली. नाव, गाव, पत्ता, बाप काय करतो? आदी प्रश्नांची सरबत्ती करत त्या युवकांना आपल्या वडिलांनी कष्ट करुन यासाठीच महाविद्यालयात घातले का?, विनापरवाना वाढदिवस साजरा करणाऱयांना काय शिक्षा होते, माहिती नाही काय?, अशा शब्दात फैलावर घेतले. त्यांना पुन्हा असे करु नका, असे सांगून सोडून दिले.