|Friday, February 28, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मंथूनि नवनीता

मंथूनि नवनीता 

सार आणि असार यातील भेद ओळखणं हे बुद्धीचं काम आहे. जे आज आहे असं भासतं आणि उद्या नाही असं वाटतं ते असार!  म्हणजे जे मृत्यूच्या अधीन आहे असं वाटतं ते असार!  तर जे कायम स्वरुपी अस्तित्वात आहे, जे कधीही नाश पावत नाही, जे मृत्यूच्या अधीन नाही ते सार!

ज्ञानेश्वर माउली सुंदर वर्णन करतात

आतां अर्जुना कांहीं एक । सांगेन मी आ‌ईक ।।

जे विचारपर लोक । वोळखिती ।।

या उपाधिमाजीं गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।

तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ।।

सलिलीं पय जैसें । एक हो‌ऊनि मीनलें असे ।

परी निवडूनि राजहंसें । वेगळें कीजे ।।

भगवान सांगतात-अर्जुना! तुला आता एक महत्त्वाची गोष्ट मी सांगणार आहे. ती तू मनापासून चित्त देऊन ऐक. मी जी गोष्ट तुला सांगणार आहे ती साधी नाही. तर विचारवंत लोकांनी, विवेकी लोकांनी जे ओळखलं आहे, ज्याचा अनुभव घेतला आहे तेच मी तुला सांगणार आहे. दुधात पाणी घातलं तर ते दुधाशी एकरूप होतं. असं एकरूप झाल्यानंतर आपल्याला दूध आणि पाणी वेगळं करता येत नाही, पण राजहंस आपल्या चोचीनं दूध तेवढं पितो आणि पाणी टाकून देतो. असार पाण्याचा त्याग करून राजहंस दूध तेवढंच ग्रहण करतो. तसं तत्त्वज्ञ संत हे ह्या देहादी
प्रपंचामध्ये सर्वगत, म्हणजे सर्वत्र व्यापून असलेलं, अगोचर, गुप्तपणानं नांदणारं असं जे चैतन्य आहे त्याचाच स्वीकार करतात. सृष्टीरूप प्रपंच हा असार आहे, अशाश्वत आहे, विनाशी आहे. आत्मा हा शाश्वत असून त्यावरच हे दृश्य जग, ही सर्व साकार व सगुण सृष्टी दिसते आहे, भासते आहे. ते अविनाशी चैतन्य ही सर्व सृष्टी व्यापून राहिलं आहे. या सबंध सृष्टीमध्ये जे गुप्तरूपानं भरलेलं आहे ते ओळखणं, ते अनुभवणं हीच मानवतेची इतिकर्तव्यता आहे.

कीं अग्निमुखें किडाळ । तोडोनियां चोखाळ ।।

निवडिती केवळ । बुद्धिमंत ।।

ना तरी जाणिवेच्या आयणी ।

करितां दधिकडसणी ।

मग नवनीत निर्वाणीं । दिसे जैसें ।।

ज्ञानेश्वर माउली विषयाच्या प्रतिपादनासाठी  एकापेक्षा एक सरस दृष्टांत देतात- हिणकस सोनं अग्नीत टाकून बुद्धिमान माणूस जसं सोनं संग्रही ठेवतो, चतुर स्त्रिया दही घुसळून त्यातील लोणी तेवढंच काढून घेतात त्याप्रमाणे हे तत्त्वज्ञ संत दिसणाऱया या विश्वाचं मंथन करून हा सर्वगत आणि गुप्तपणानं वावरणारा श्रीहरी हृदयात साठवून ठेवतात. माउलींनीच आपल्या सुप्रसिद्ध हरिपाठात म्हटलं आहे –

मंथूनि नवनीता तैसे घे अनंता ।

आपल्याला आपल्या ह्या डोळय़ांना दिसणाऱया सर्व प्रपंचाचं मंथन करून श्रीहरीला शोधायचं आहे व त्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. हे मंथन करायचे आपल्या मनातील साधन आहे बुद्धी बुद्धीच्या रवीने हे जगतातील सार असाराचे मंथन करायचे आहे.

Related posts: