|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » इब्रामपूर’ आदर्श ग्राम बनविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे

इब्रामपूर’ आदर्श ग्राम बनविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे 

प्रतिनिधी/ पेडणे

इब्रामपूर गाव आदर्श बनविण्यासाठी, सर्व सोयी सुविधांयुक्त होण्यासाठी विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱयांवर अवलंबून न राहाता नागरिकांनी ही कामे आपल्या घरातील समजून लक्ष घातले पाहिजे. सध्या इब्रामपूर गावातील 80 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक केले आहे.

मंत्री श्रीपाद नाईक यांनी आदर्श ग्रामसाठी इब्रामपूरची निवड केली असून गावातील कामाचा आढावा घेण्यासाठी शुक्रवार दि. 6 रोजी आढावा बैठकीचे आयोजन पेडणे मामलेदार कार्यालय संकूल सभागृहात केले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी सुधीर केरकर, पेडणे गटविकास अधिकारी अमित परब, इब्रामपूर सरपंच सोनाली पवार, स्वप्नील नाईक उपसरपंच झिलू हळर्णकर, पंचसदस्य आत्माराम नाईक, कृष्णा नाईक, राजन खडपकर, सोनाली इब्रामपूरकर, दिलीप गावस तसेच विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

श्रीपाद नाईक पुढे म्हणाले की, गावचा विकास करताना विविध अडचणी येत असतात. सरकारी अधिकारी वेळेत काम करत नसतील तर उपजिल्हाधिकाऱयांकडे तक्रार करावी. नागरिकांनी सरकारी अधिकाऱयांवर अवलंबून न राहात प्रत्येकाने वैयक्तिकरित्या लक्ष घालून ‘इब्रामपूर’ आदर्श बनविण्याचे आवाहन त्यांनी केले.

बैठीकत उपस्थित विविध खात्याच्या अधिकाऱयांकडून श्रीपाद नाईक यांनी कामाचा आढावा घेऊन समस्यांवर चर्चा केली. नागरिक महादेव च्यारी यांनी सरकारकडून राबविण्यात येणाऱया विकासकामात दिरंगाई होत असल्याचे यावेळी निदर्शनास आणून दिले. गावात प्रवासी वाहतूक करणाऱया बसेस येत नसल्याचे सांगून शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचे सांगितले. मंत्री नाईक यांनी उपजिल्हाधिकारी सुधीर केरकर यांना यासंबंधी विशेष लक्ष घालून ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्याचे सांगितले.

सरपंच सोनाली पवार यांनी, विकासकामे करताना अनेक अडचणी येत असून विकासकामांसाठी जमिनदार ना हरकत दाखले देत नसल्याचे सांगितले. जमिनींमुळे अनेक विकासकामे अडून राहिल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच गावात पाणी, वीज समस्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

पंचसदस्यांनी पेडणे तालुक्यात आधार कार्ड केंद्र सुरु करण्याची मागणी केली. संबंधित खात्याशी संपर्क साधून आधार कार्ड केंद्र लवकरच पेडणेत सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री नाईक यांनी सांगितले. उपजिल्हाधिकारी केरकर यांनी इब्रामपूर गावात लवकरच ग्रंथालय सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पेडणे उपजिल्हाधिकारी सुधीर केरकर यांनी केले. आभार पेडणे गटविकास अधिकारी अमित परब यांनी मानले.

 

Related posts: