|Saturday, December 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » महिलांवरील अत्याचारावर आता विशेष पथकाची नजर

महिलांवरील अत्याचारावर आता विशेष पथकाची नजर 

उज्ज्वलकुमार माने /सोलापूर :

समाजात महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता, पिडीतांना लवकर न्याय मिळावा व महिलांवर होणाऱया गुन्हय़ावर नियंत्रण व्हावे, यासाठी राज्य सरकारने राज्यात सर्वत्र स्वतंत्र तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा स्तरावर हे पथक स्थापन होणार असून विनयभंग, बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार, अपहरण, अनैतिक व्यापार इत्यादी गुन्ह्य़ाबाबत हे तपास पथक कार्यरत राहणार आहे.

समाजातील महिलांवर प्रामुख्याने छेडछाड, विनयभंग, बलात्कार, अपहरण, कार्यालयीन आणि घरगुती लैंगिक अत्याचार होत असतात. या अत्याचारावर प्रतिबंध करण्यासाठी दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाचे अनेक कायदे अस्तित्वात आहेत. महिला अत्याचार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या स्तरावर समित्या आहेत. महिलांवर अत्याचार करणाऱयाला कडक शासन होते. अशा स्वरूपाचे कायद्याविषयी प्रबोधन करण्यात येते. तरी देखील वरचेवर महिलांवर होणाऱया अत्याचारात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महिलांवरील होणाऱया गुन्ह्य़ाबाबत तपास पथके स्थापन करण्याचा आदेश केंद सरकारने राज्यांना दिला असून, या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने तपास पथक गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

महिलांवरील होणारे अत्याचार, त्यामध्ये विनयभंग, बलात्कार, अपहरण, कौटुंबिक हिंसाचार इत्यादी प्रकारच्या घटनांचा सखोल व परिपूर्ण आणि तातडीने तपास करून आरोपीविरूद्ध तात्काळ खटले दाखल करण्यासाठी हे पथक कार्यरत राहणार आहे. याशिवाय महिला व बालकांवरील गुन्ह्य़ाचा सद्यस्थितीचा आढावा घेणे, वेळेवर दोषारोपपत्र पाठविण्याविषयी पाठपुरावा करणे आरोप सिद्ध होण्याचे
प्रमाण वाढावे, केंद्र व राज्य सरकारने महिलांवरील अत्याचारासंदर्भात केलेल्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, महिला अत्याचार प्रतिबंधात्मक असलेल्या कायद्याविषयी प्रबोधन करणे, महिलांच्या संरक्षणासंदर्भात उपाययोजना सुचविणे, महिलांच्या संरक्षणासंदर्भात कार्यशाळा, चर्चासत्र आयोजित करणे, स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधून सहकार्य व मार्गदर्शन करणे, महिलांविषयी गंभीर गुन्हय़ाचा तपास करणे ही कामे या तपास पथकाला करावा लागणार आहे. या पथकासाठी एक पोलिस उपाधिक्षक (आर्थिक गुन्हे), चार पोलीस निरीक्षक, दोन पोलीस हवालदार, दोन पोलीस नाईक आणि आठ पोलीस शिपाई असे मनुष्यबळ देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे.

Related posts: