|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेल्या चार पैकी तीन आरोपींना अटक

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेल्या चार पैकी तीन आरोपींना अटक 

वार्ताहर/ कुर्डुवाडी

सोलापुर ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाने कुर्डुवाडी पोलिसठाण्याच्या अंतर्गत घडलेल्या गुह्यासंदर्भात जेरबंद केलेल्या चार आरोपींना कुर्डुवाडी पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली होती.त्या चार आरोपींना माढा येथील सबजेल मध्ये घेऊन जात असताना रात्री नऊ च्या सुमारास कुर्डुवाडी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चारही आरोपींनी हातातील बेडींसह चालत्या गाडीतून पलायन केले होते त्यापैकी तीन आरोपींना 24 तासाच्या आत पोलिसांनी त्यांच्या मुस्क्या आवळल्या.

याबाबत माहिती अशी की कुर्डुवाडी परंडा  रोडवरील लव्हे येथे मोटारसायकलवरुन  निघालेल्या दिगंबर वाघमोडे व त्यांच्या पत्नीस रस्त्यात मोटारसायकल आडव्या लाऊन लुटणारी टोळी सोलापुर ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी पकडून बुधवारी कुर्डुवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले होते.या गुह्यातील बिरुदेव सरवदे वय 27, धनाजी सरवदे वय 21, विशाल सरवदे वय 20, तिघे रा.महिंसगाव व लक्ष्मण सोनटक्के वय 22 या चारही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी दिल्यानंतर त्या चारही आरोपींना काल गुह्याच्या तपासा संदर्भात कुर्डुवाडी येथे आणले होते.कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात कस्टडीची सोय नसल्याकारणाने आरोपींना पुन्हा माढा सबजेल मध्ये सोडावे लागते.त्यामुळे काल दिवसभराच्या तपासानंतर या चारही आरोपींना माढा सबजेल मध्ये सोडण्यासाठी रात्री 8.30 च्या सुमारास सरकारी वाहनातून चालकासह तिघेजण पो.काँ. अविनाश पाटील व पो.काँ. धनाजी झगडे हे निघाले. आरोपींना घेऊन जाणारी गाडी माढा येथील माढेश्वरी मंदिर मनकर्णा नदीच्या पुलावरजवळ येताच पुलावरील पाणी पाहून चालकाने गाडी सावकाश करताच पाठीमागील हौद्यात बसलेले चारही आरोपींनी बरोबर असलेल्या पोलिसांना कसलीही चाहूल लागू न देता अचानक दार उघडून रात्री नऊच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत पोलिसांच्या हातावर तुरी देऊन धुम ठोकली. काही कळायच्या आत चारही आरोपींनी पोलिसांना गुंगारा दिला. या घटनेस पोलिसांचा बेजबाबदारपणा भोवला. हे चारही आरोपी मोठय़ा दरोडय़ासारख्या घटनेतील नसल्याने पोलिसांनीही त्यांना फारस गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसते.घटना घडताच परिसरातील सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली होती. घटनेची माहिती कळताच अतिरिक्त पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते व  वरिष्ठ उप विभागीय पोलिस अधिकारी करमाळा प्रशांत स्वामी  यांनी घटनास्थळाला रात्री 1.30 च्या सुमारास भेट देऊन जागेची पाहणी केली. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरु लागली. पोलिसांनी यासाठी चार पथके तयार करुन या पथकाद्वारे या आरोपींचे शोध कार्य सुरु झाले.त्यानुसार एक पथक आरोपींनी पलायन केल्याच्या दिशेने त्यांच्या माग काढत माढेश्वरी मंदिराच्या मागुन चिखलातून पाऊल खुणाचा माग घेत तांदुळवाडी मार्गे महिंसगाव येथील एक हॉटेलच्या पाठीमागे उसाच्या शेतात लपून बसलेला विशाल सरवदे पोलिसांच्या जाळ्यात सापडला. तर काही वेळातच दुसरे दोन आरोपी बिरुदेव सरवदे हा अंजनगाव उमाटे येथे उसाच्या शेतात तर तिसरा आरोपी लक्ष्मण सोनटक्के हा परंडा रोडवरील आवार पिंपरीला येथे उसाच्या शेतात लपून बसलेला आढळला या तीन्ही आरॉपींच्या मुस्क्या 24 तासाच्या आत पोलिसांनी आवळल्या व अद्यापही धनाजी सरवदे हा हातातील बेडीसह फरार आहे.त्याला पकडण्यात अजून तरी पोलिसांना यश आले नाही. त्याचे शोध कार्य चालू आहे. या तपास कामात गुन्हे अन्वेषण विभाग, कुर्डुवाडी पोलीसांमधील पोलिस निरीक्षक विजय कुंभार, पो.नि. ईश्वर ओमासे, पो.उप.नि. बाबूराव म्हेत्रे, नारायण गोलेकर, पो.काँ.सचिन मागाडे, सागर शिंदे, पो.ना. दिलीप राऊत, पांडुरंग मुंढे, चालक गुंडप्पा सुरवसे, नितीन गोरे,सतीश कोठावळे,रियाज शेख,रमेश मांदे, कृष्णा पखाले,सर्जेराव करचे, सागर गवळी यांचा सहभाग होता. या तपासात वडशिंगे, महिंसगाव, अंजनगाव येथील जनतेने सहकार्य केले.या गुह्याचा तपास पोलिस उप निरीक्षक ज्ञानेश्वर बेदरे हे करत आहे.

Related posts: