|Saturday, December 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शिक्षक बदलीला मे 2018 पर्यंत स्थगिती

शिक्षक बदलीला मे 2018 पर्यंत स्थगिती 

प्रतिनिधी / सांगली

शिक्षक बदल्यासंदर्भातील 12 सप्टेंबरच्या शुद्धीपत्रकाला आव्हान देण्यासाठी आणि बदल्यांना स्थगिती देण्यासाठी शिक्षक भारती संघटनेच्या सांगली शाखेसह इतरांनी दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात निकाल झाला. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती एस. के. शिंदे यांनी शुद्धीपत्रकाप्रमाणे बदल्या करता येणार नाहीत असे ठणकावून सांगून स्थगिती दिली. जीआरप्रमाणे मे 2018 मध्ये बदल्या करा असे आदेश दिले. सांगलीच्या याचिकेवरील निर्णय पूर्ण राज्यासाठी लागू राहणार आहे. सांगलीच्या शिक्षकांची याचिका राज्याला भारी पडली आहे.

शिक्षक बदल्यांसाठी यंदा 27 फेब्रुवारी 2017 रोजी जीआर प्रसिद्ध केला. बदल्यांसाठी शिक्षकांचे चार संवर्ग पाडून त्यांच्यात एक प्रकारे फुट पाडण्याचाच प्रयत्न केला गेला. संवर्ग 1,2 आणि 3 मधील शिक्षकांनी बदलीसाठी संवर्ग चारमधील शिक्षकांना ‘खो’ देण्याचा अधिकार दिला होता. त्यामुळे संवर्ग चारमधील शिक्षक मोठय़ा संख्येने विस्थापित होणार होते.

27 फेब्रुवारीच्या जीआरनंतर शासनाने 12 सप्टेंबरला शुद्धीपत्रक काढून त्यानुसार बदल्या करण्याचे आदेश दिले. परंतु शिक्षक भारती, शिक्षक संघ आणि इतरांनी या शुद्धीपत्रकाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. एकतर “जीआर’ प्रमाणे बदल्या करा किंवा पुढील शैक्षणिक वर्षापर्यंत स्थगिती द्या अशी मागणी केली. याचिका दाखल असताना देखील दुसरीकडे बदल्यांची प्रक्रिया सुरू केली. बदल्यांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता.

दरम्यान, मुंबईतील याचिकेवर 10 आणि 12 ऑक्टोबरला सुनावणी झाली. काल झालेल्या सुनावणीवेळी एकतर पूर्ण जीआरप्रमाणे बदल्या करा. शुद्धीपत्रकाप्रमाणे बदल्या करता येणार नाहीत. अन्यथा जीआर सुद्धा रद्द केला जाईल असे न्यायमूर्तींनी सुनावले. सरकारी वकिलांनी वेळ मागितली. त्यासाठी आजची मुदत दिली. आजच्या सुनावणीवेळी यंदाच्या शैक्षणिक वर्षात शुद्धीपत्रकाप्रमाणे बदल्या करता येणार नाहीत. करायच्या असतील 27 फेब्रुवारीच्या जीआरप्रमाणे मे 2018 मध्ये बदल्या करा, असे न्यायमूर्तींनी ठणकावून सांगितले. तसेच सध्याच्या बदल्यांच्या प्रक्रियेला स्थगिती दिली. शिक्षक भारतीच्यावतीने ऍड. सतीश तळेकर यांनी जोरदार युक्तिवाद करत शिक्षकांना न्याय मिळवून दिला.

शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे, कृष्णा पोळ म्हणाले, शिक्षकांच्या बदली प्रक्रियेतील गोंधळामुळे अनेकांवर अन्याय होणार होता. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार होते. त्यामुळे याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यावर निकाल होऊन पुढील शैक्षणिक वर्षापर्यंत बदल्यांना स्थगिती मिळाली. हा शिक्षकांचा खऱया अर्थाने मोठा विजय आहे. सांगलीच्या याचिकेप्रमाणे औरंगाबाद खंडपीठातही हाच निर्णय झाला. संपूर्ण राज्यासाठी हा निकाल लागू राहणार आहे.

Related posts: