|Saturday, October 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » संपूर्ण विमा ग्राम योजना सादर

संपूर्ण विमा ग्राम योजना सादर 

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

लोकांना किफायतशीर जीवन विमा उपलब्ध करविण्यासाठी मोदी सरकारने शनिवारी संपूर्ण विमा ग्राम योजनेचा शुभारंभ केला. ही योजना ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱयांना जीवन विमा उपलब्ध करण्यासाठी आखण्यात आली. दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी या योजनेचे अनावरण केले. आता सरकारी कर्मचाऱयांसह पोस्टल जीवन विमा व्यावसायिकांना देखील सामावून घेईल.देशाच्या ग्रामीण भागात राहणाऱयांना किफायतशील जीवन विमा उपलब्ध करण्यासाठी पोस्टल नेटवर्कचा वापर केला जावा. पोस्टल नेटवर्कद्वारे बँकिंग सेवा उपलब्ध करविल्या जाव्यात अशी योजना पंतप्रधान मोदींची आहे. खासदार आदर्श ग्रामयोजनेंतर्गत येणाऱया सर्व गावांना या योजनेच्या कक्षेत आणले जाईल. संपूर्ण विमा ग्राम योजनेंर्तगत देशाच्या प्रत्येक जिल्हय़ातील कमीतकमी एक गाव निवडून सर्व कुटुंबांना विमासेवेत सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती सिन्हा यांनी दिली.पोस्टल जीवन विमाचा लाभ आता सरकारी आणि निमसरकारी क्षेत्राच्या कर्मचाऱयांपुरता मर्यादित नसेल. आता व्यवसायिक म्हणजेच डॉक्टर्स, अभियंते, व्यवस्थापकीय सल्लागार, सनदी लेखापाल, आर्किटेक्ट, वकील, बँकर्ससह बीएसआय आणि एनएसईमध्ये नोंदणीकृत कंपन्यांचे कर्मचारी देखील योजनेचा लाभ घेऊ शकतील.

देशात अधिकाधिक सामाजिक सुरक्षा उपलब्ध करविणे आणि अधिकाधिक लोकांना पोस्टल जीवन विमांतर्गत सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

कमी हप्ता, अधिक लाभांश

पोस्टल जीवन विमा योजना 1984 रोजी सादर करण्यात आली. सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱयांसाठी सादर करण्यात आलेल्या सर्वात जुन्या जीवन विमा योजनांपैकी ही एक आहे. तर ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना 1995 रोजी सुरू करण्यात आली. ही योजना ग्रामीण भागात राहणाऱयांना विमासुरक्षा उपलब्ध करण्यासाठी सादर करण्यात आली. कमी हप्ता आणि अधिक लाभांश पोस्टल जीवन विमा आणि ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजनेचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे.