|Monday, September 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » स्वच्छ इंदोरची सफल गाथा

स्वच्छ इंदोरची सफल गाथा 

राष्ट्रीय स्तरावर महानगरांच्या स्वच्छतेच्या सर्व निकषांवर मध्य प्रदेशची व्यापारी राजधानी व माळव्याची मुंबई असा लौकिक असणाऱया इंदोरने 3 वर्षांच्या सामूहिक व सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे 2017 मधील राष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक स्वच्छ महानगर बनवण्याचा जो गौरव सर्वप्रथम प्राप्त केला आहे. त्याचीच ही यशोगाथा.

या साऱया प्रयत्नांची पार्श्वभूमी म्हणजे सुमारे 3 वर्षांपूर्वी म्हणजेच 2014 मध्ये इंदेर शहर राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेच्या संदर्भात 149 व्या क्रमांकावर होते हे विशेष. या पार्श्वभूमीवर अवघ्या 3 वर्षात इंदोर महानगराने 149 क्रमांकावरून राष्ट्रीय स्तरावर पहिला क्रमांक कसा मिळवला ते मुळातूनच तपासून पाहण्यासारखे आहे.

हे सारे प्रयत्न आणि स्वच्छतेसाठी झपाटल्यागत प्रयत्न करणाऱया जन-साऱयांचे व शहरातील नागरी-सामाजिक संस्था संघटनांनी केलेल्या प्रयत्नांचे त्यातही विशेष उल्लेखनीय प्रयत्न करणारी युवा व्यक्ती म्हणून काम करणाऱया श्रीगोपाल जगताप यांचे. योगायोग म्हणजे 2015 मध्येच समाजकल्याण विषयातील पदव्युत्तर पदवीधर असणाऱया श्रीगोपाल जगतापने बेसीक्स मायक्रोफायनान्स कंपनीचा एक भाग असणाऱया स्वच्छ भारत अभियानाशी स्वत:ला जाणीवपूर्वक जोडून घेतले.

माळव्यातच नोकरी करू इच्छिणाऱया श्रीगोपाल जगतापच्या मते त्यांने भारतीय ग्रामीण सेवा उपक्रमांतर्गत स्वच्छता साधण्यासाठी कचऱयातून करिअर करण्याचे ठरविले व त्याला त्याच्या मनाजोगती नोकरी पण मिळाली. श्रीगोपालच्या संपूर्ण कुटुंबात तो एकटाच नोकरी करतो हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.

श्रीगोपाल जगतापने आपल्या सामुहिक स्वच्छतेची सुरुवात इंदेरच्या एका छोटेखानी कंपनीच्या सहकार्याने केली, त्या कंपनीत उपलब्ध असणाऱया कचरा प्रक्रिया केंद्रामध्ये शहरातील काही भागातून नागरी कचऱयातील प्लास्टिकवर प्रक्रिया करून त्याचा फेरफार करण्यास सुरुवात तर झाली मात्र या प्रयत्नात सातत्य नव्हते. याचे महत्त्वाचे कारण ठराविक वस्त्यांमध्ये फिरून कचऱयातील प्लास्टिकचे तुकडे, भांडे इ. गोळा करणाऱया त्या कचरा वेचणाऱया मंडळींना दिवसाच्या ठराविक कालावधीत प्रक्रिया व फेर वापरासाठी आवश्यक साहित्य मिळेलच याची खात्री नसायची त्यामुळे शहरातील परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करून त्याचा फेरफार करून प्लास्टिक मर्यादित स्वरुपात का होईना पण प्रतिबंध करण्याच्या श्री गोपाल जगताप यांच्या योजनेला व त्यांच्या सहकाऱयांच्या प्रयत्नाना अर्थातच मर्यादा आल्या मात्र श्रीगोपाल व त्याच्या सहकाऱयांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत.

त्याच दरम्यान इंदोरच्या नव्याने विकसित होणाऱया महालक्ष्मीनगर या नव्या वसाहतीत श्रीगोपाल जगताप व त्यांच्या सहकार्यासाठी एक नवी संधी चालून आली. या संपूर्ण वासाहतीने श्रीगोपाल यांच्या स्वच्छ भारत अभियानाला वसाहतीतील कचऱयांचे संकलन, नियोजन व प्रक्रिया करण्याचा व्यापक प्रस्ताव दिला व सारे चित्रच पालटले. श्रीगोपाल यांनी अर्थातच या संधीला सकारात्मक प्रतिसाद तर दिलाच शिवाय नागरी वा घरगुती कचऱयावर योग्य प्रक्रिया केल्यास त्याद्वारे फायदेशीर व्यवसाय पण होऊ शकतो याची पण त्यांना जाणीव झाली.

अशाप्रकारे स्वच्छतेसाठी कार्य करण्याच्या दृष्टीने श्रीगोपाल जगताप यांनी आपल्या सहकाऱयांना महालक्ष्मीनगर वसाहतीतील सर्व रहिवाशांच्या घरी जाऊन संस्थेच्या कर्मचाऱयांकरवी दररोज व निर्धारित वेळेत घरगुती कचरा गोळा करण्याची  कल्पना मांडली व त्याची निर्धारित वेळेनुरूप अंमलबजावणी पण केली या नव्या योजनेला रहिवाशांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला.

  प्रयत्नांच्या पहिल्या टप्प्यापासूनच श्रीगोपाल आणि त्यांच्या संस्थेने जनजागृतीवर मोठा भर दिला. घरोघरी जाऊन कचरा गोळा करणारे त्यांचे सहकारी स्थानिक रहिवाशांना स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने प्रत्येक घरातील ओला कचरा व कोरडा कचरा वेगवेगळा करणे असे आवश्यक, फायदेशीर व सहजशक्मय आहे ते समजून सांगू लागले. व त्याचा पण मोठा परिणाम होऊ लागला. त्यामुळे रोज कचरा देणारे व घेणारे या उभयतांची सोय झाली.

2015 मध्ये महानगर इंदोरमध्ये मोठे व महत्त्वपूर्ण बदल घडून आले. मालिनी लक्ष्मणसिंह गौड या इंदोरच्या महापौरपदी निवडून आल्या तर इंदोरचे आयुक्त म्हणून मनिष सिंह यांची नियुक्ती झाली. या उभयतांमध्ये महानगरांची स्वच्छता हे समानसूत्र हेते ही बाब शहरवासियांच्या दृष्टीने फायदेशीर ठरली. योगायोगाने या उभयतांची गाठ इको प्रो एन्वायरन्मेंटल सर्व्हिस या पर्यावरणप्रेमी संस्थेचे संचालक उद्योजक असणाऱया असद वारसी यांच्याशी झाली. कचऱयावर प्रक्रिया या विषयात संशोधनपर पीएचडी करणाऱया असद वारसी यांच्या प्लास्टिक कचऱयाची विल्हेवाट या विषयावर पण विशेष अभ्यास आहे विशेष. या तिघांच्या संयुक्त प्रयत्नांना अल्पावधीतच चांगले स्वरुप मिळू लागले.

पर्यावरण संरक्षण विषयातील तज्ञ म्हणून असद वारसी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण इंदोर शहराचे स्वच्छताविषयक सर्वेक्षण करण्यात आले त्याच्या आधारे महानगरांतील नागरी कचऱयाचे संकलन करण्यासाठी 1380 कचरा संकलन केंदे निर्धारित केली गेली, याचे व्यवस्थित वर्गिकरण-संकलन करण्यासाठी अर्थातच श्रीगोपाल जगताप यांचे प्रयत्न आणि काम महत्त्वाचे ठरले. सर्व संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासनिक अधिकाऱयांसमोर या प्रकल्पाचे सादरीकरण केल्यावर त्याची संपूर्ण शहरभर अंमलबजावणी करण्याची परिपूर्ण तयारी करण्यात आली.

प्रयोगाची सुरुवात प्रायोगिक तत्त्वावर इंदोरच्या दोन वॉर्डांमध्ये करण्यात आली या दोन्ही वॉर्डमध्ये तेथील नगरसेवक रहात असल्याची व त्यांचे संपूर्ण सहकार्य मिळेल याची संपूर्ण खातरजमा करण्यात आली होती हे विशेष. प्रायोगिक टप्प्यापासूनच शहरातील कचरा एकत्रित करून वाहून नेण्यासाठी परंपरागत स्वरुपात वापरल्या जाणाऱया सायकल रिक्षांना फाटा देऊन त्याजागी मोठय़ा वाहनांचा उपयोग केला जाऊ लागला व त्याचा परिणामपण अल्पावधीतच दिसून आला.

प्रायोगिक स्वरुपात दोन वार्डांमध्ये अशा प्रकारे दृष्य स्वरुपात व लक्षणीय प्रमाणात कचऱयाची स्वच्छता साकारल्यावर शहरातील इतर वॉर्डांमध्ये नागरिक, नगरसेवक व सर्वच पक्षीय पुढाऱयांकडून त्यांच्या वार्डात पण कचऱयाची स्वच्छता मोहीम साकारण्याची मागणी होऊ लागली व त्यामुळे प्रशासन व स्वच्छता मोहीम राबविणाऱया सर्वांनाच मोठे पाठबळ लाभले.

अशाप्रकारे शहर स्वच्छता अभियानाची संपूर्ण शहरभर अंमलबजावणी करताना समस्या उद्भवली ती सफाई कर्मचाऱयांची. या कर्मचाऱयांची पठडीतील काम करण्याची पद्धत, शिस्त-कामाच्या वेळा व प्रत्यक्ष कामासाठी त्यांची दररोजची उपस्थिती या साऱयाच बाबी आव्हानस्वरुपात उभ्या ठाकल्या. इंदोरमध्ये संपूर्ण शहरासाठी 5500 सफाई कर्मचाऱयांची प्रशासनातर्फे नियुक्ती करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात दररोज सरासरी 2000 सफाई कर्मचारीच कामावर असत.

या कामी उपलब्ध सफाई कर्मचाऱयाना प्रशिक्षित प्रोत्साहित करण्याचे काम  श्री गोपाल जगताप यांनी मोठय़ा कुलशतेने केले. त्यांनी इंदोर महानगर प्रशासनातील निवडक सफाई कर्मचाऱयांपैकी काही जणांना ‘सफाई मित्र’ नेमून त्यांना विशेष प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणामध्ये 200 सफाई मित्राना विविध वस्त्यांमधील कचरा संकलनाची आखणी नियोजन, कचरा वाहक वाहनांची उपलब्धता व मुख्य म्हणजे आवश्यक कर्मचाऱयांची दैनंदिन संख्या या साऱयांची प्रात्यक्षिक सरावासह माहिती देण्यात आली.

या उपक्रमात नागरी संवादाला मोठय़ा प्रमाणावर व मोठय़ा प्रभावीपणे वापर करण्यात आला. कचरा वाहनांवरील ध्वनिवर्धकांपासून सामाजिक संस्था, पथनाटय़, विविध प्रसिद्ध माध्यमे, धार्मिक संस्था, मेळावे महिला संस्था या संस्थांचा याकामी सहभागी करून घेण्यात आले. एवढेच नव्हे तर उपाहारगृह हॉटेल दुकाने इ. समोर अंमलबजावणी शहरभर स्वेच्छेने केली गेली. व सारे चित्रच बदलत गेले.

यातूनच इंदोरला राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छतेचे पहिले पारितोषिक मिळाले. यासंदर्भात इंदोरच्या महापौर मालिनी गौड यांच्या शब्दातच सांगायचे म्हणजे आज सरसकट सर्वच शहरांमध्ये कचरा हा संपूर्ण विषयच ठेकेदारीसह जोडला जातो व तिथेच गफलत होते. त्यांच्या मते कधी अस्वच्छ समजल्या जाणाऱया इंदोरला स्वच्छ करण्यासाठी आम्ही ठेकेदारीला संपूर्ण फाटा देऊन जनभागीदारीला प्राधान्य तर दिलेच व त्याशिवाय ‘सफाई मित्र’ या श्रीगोपाल यांच्या संकल्पनेतून स्वच्छतेसाठीच प्रयत्नांना प्रति÷ा मिळवून दिली. याचाच परिणाम म्हणजे केवळ तीन वर्षांच्या प्रयत्नात इंदोरने राष्ट्रीय स्वच्छतेच्या संदर्भात 149 व्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर मजल मारली आहे.