|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘तेजस एक्स्प्रेस’च्या 24 प्रवाशांना अन्नातून विषबाधा

‘तेजस एक्स्प्रेस’च्या 24 प्रवाशांना अन्नातून विषबाधा 

कोकण रेल्वे मार्गावरील घटना, रत्नागिरी ते चिपळूण दरम्यान उलटय़ा-जुलाबाचा त्रास

प्रतिनिधी/ चिपळूण

 कोकण रेल्वे मार्गावर करमाळी ते सीएसटी दरम्यान धावणाऱया आणि देशातील वेगवान एक्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱया तेजस एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱया  तब्बल 24 प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाली आहे. रत्नागिरीनंतर प्रवाशांना झालेल्या उलटी-जुलाबाच्या त्रासामुळे चिपळूण स्थानकावर गाडी थांबवून प्रवाशांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर तब्बल दोन तास तेजस एक्स्प्रेस येथील स्थानकात थांबवल्याने या मार्गावरील रेल्वे गाडय़ांचे वेळापत्रक काहीकाळ विस्कळीत झाले.

  येथील लाईफ केअर रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या उलटी-जुलाबाचा त्रास झालेल्या प्रवाशांमध्ये नीलेश मधुकर जाधव (40), आशिका कुमार (12), निहारिका विजय जाधव (36), रोहीत टॅग (33), मोसेस डिसोझा (74), आरती शहा (54), अईन भाटिया (14), प्रणम कुमार (14), दिनेश कुमार (44), आदिती सावर्डेकर (13), साची नायक (16), हरिश तोमर (45), मिनाज मोमीन (30), नोमिता तिर्की (51), संजय पथ्र (44), सौरभ उवाळे (23), राहूल मंडल (29), रणधीर  नागवेकर (42), मार्टीन फर्नांडीस (39), शैतून पत्रो (23), आरव तोमर (6 वर्षे), शोमिता डे, रईस मोमीन, सुशांत नायक यांचा समावेश आहे.

  तेजस एक्स्प्रेस ही केकण रेल्वे मार्गावर दर दोन दिवसांनी धावते. त्याप्रमाणे रविवारी सकाळी नियोजित वेळेप्रमाणे करमळीहून सीएसटीकडे ही गाडी रवाना झाली. यानंतर सकाळी 9.45 वाजता याच गाडीतील पॅट्रीकारमधून नाष्टय़ाला आम्लेट पाव व कटलेट देण्यात आले. याच गाडीतील सी 1 ते 4 या चारही बोगीतील प्रवाशांना हा नाष्टा देण्यात आला. त्यानंतर रत्नागिरीला आलेल्या या गाडीने दुपारी 1 वाजता स्थानक सोडून ती मुंबईकडे रवाना झाली. मात्र रत्नागिरी सोडताना दोन प्रवाशांना उलटी व पोटात मळमळ जाणवू लागली. त्याशिवाय काहीना जुलाबही होऊ लागले.

  धावपळ उडाली…

  प्रारंभी त्रास होणाऱया प्रवाशांची संख्या दोन असतानाच त्यामध्ये आणखी प्रवाशांची भर पडत गेली. त्यानंतर पहिल्या चार बोगीतील अनेकांना हा त्रास जाणवू लागल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे कर्मचाऱयांनी तात्काळ चिपळूण रेल्वे स्थानकाशी संपर्क साधला. त्यानुसार स्थानकप्रमुख किशोर नारकर यांनी तात्काळ कर्मचाऱयांना तसेच पोलीस यंत्रणेकडे संपर्क साधून वैद्यकीय पथक, तसेच रूग्णवाहिकांना पाचारण केले. रेल्वेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिरीष मदार हे रजेवर असल्याने सर्वाना नजीकच्या लाईफ केअर रूग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. तयारी पूर्णपणे केली गेली असतानाच तेजस एक्प्रेस 3 वाजून 15 मिनिटांनी दाखल झाली. गाडी दाखल झाल्याबरोबरच त्रास झालेल्या प्रवाशांना विशेषत: लहान बालकांना रूग्णवाहिकेतून रूग्णालयात हलवण्यात आले.

   रूग्णवाहिकांच्या फेऱया अन् सायरनचा आवाज…

  या घटनेनंतर 108चे चालक सतीश शिर्के, समीर खळे, योगेश कोलगे, संजय जांभळे या रूग्णवाहिका चालकांनी तात्काळ रेल्वे स्थानकात जाऊन या सर्व रूग्णांना लाईफ केअर रूग्णालयात आणले. त्यांच्या तत्परतेमुळे या रूग्णांवर तात्काळ उपचार करणे सोयीचे झाले. लागोपाठ रेल्वेस्थानक ते लाईफ केअर रूग्णालयात जाणाऱया रूग्णवाहिका आणि त्यांचे वाजणारे सायरन यामुळे काहीतरी गंभीर प्रकार घडल्याचे लक्षात येऊन अनेकांनी रेल्वे स्थानक व रूग्णालयाकडे धाव घेतली.

  रेल्वेस्थानकात उसळली गर्दी

  दरम्यान, या घटनेनंतर दोन तास तेजस एक्प्रेस येथील रेल्वे स्थानकात थांबवून ठेवण्यात आली. यावेळी रेल्वेचे पोर्लींस निरीक्षक अवनिशकुमार, येथील पोलीस निरीक्षक निशा जाधव व त्यांच्या सहकाऱयांनी रेल्वेत फिरून त्रास होणाऱया प्रवाशांचा शोध घेत त्यांना तातडीने उपचारासाठी बाहेर काढले. पोफळी, शिरगांव दौऱयावर असलेल्या खासदार विनायक राऊत यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने रेल्वे स्थानक गाठले. आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, शहरप्रमुख राजू देवळेकर तसेच कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम हेही स्थानकात पोहचले. त्याचबरोबर शहर परिसरातील राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांनी धाव घेतल्याने मोठी गर्दी उसळली.

पोलिसांची धाव

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवडे, उपनिरीक्षक पी. एल. चव्हाण, अशोक दाभोळकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर नाटेकर, जी. व्ही. घाणेकर, मनीष काबळे, गगणेश पटेकर, विशाल वांयगणकर, पंकज पडेलकर, वैभव जाधव, योगेश नार्वेकर आदीनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. तसेच सर्वांचे जबाब घेतले.

मजेचा रेल्वेप्रवास ठरला धोक्याचा

या घटनेतील आरव तोमर या 6 वर्षांच्या बालकाची प्रकृती थोडी गंभीर आहे. हे  कुटुंब छत्तीसगडमधून विमानाने गोव्यापर्यंत आले. तेथून ते विमानानेच मुंबईत जाणार होते. मात्र मजा म्हणून या नव्याने सुरू झालेल्या तेजस एक्स्प्रेसने प्रवास करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांच्यावर हा प्रसंग गुदरला.

रेल्वे अधिकाऱयांची रूग्णालयाकडे पाठ

या घटनेत विषबाधा झालेल्या सर्व रूग्णांना लाईफ केअर रूग्णालयात आणण्यात आले होते. असे असतानाही रात्री उशिरापर्यंत रेल्वेचा एकही अधिकारी या रूग्णालयाकडे फिरकला नाही. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली.

 दिवा पॅसेंजर, मांडवी तीन तास उशिरा

  येथे 3 वाजून 15 मिनिटांनी दाखल झालेली तेजस एक्प्रेस तब्बल दोन तासांनी म्हणजेच सायंकाळी 4.50 वाजता मुंबईकडे रवाना झाली. त्यामुळे या मार्गावरील दिवा पॅसेंजर कामथे स्थानकात, तर मांडवी एक्प्रेस आरवली स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. या दोन्ही गाडय़ा या सर्व प्रकारामुळे तीन तास उशिराने धावत होत्या.

 रूग्णांसह नातेवाईकांची रेल्वेकडून व्यवस्था

  दरम्यान, रूग्णालयात प्रवासी उपचार घेत असतानाच तेजस एक्प्रेस मुंबईकडे सोडण्यात आली. मात्र त्याचवेळी संबंधित रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची शहरातील हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. त्याचबरोबर उपचारानंतर सदर रूग्णांना अन्य रेल्वे गाडय़ांमधून सोडण्याची व्यवस्था करण्यात आली.

नाष्टा खाल्ला अन्…

  या तेजस एक्प्रेसमधून प्रवास करणाऱया मुंबई-गोरेगांव येथील सुमन जाधव या आपले पती, मुलगा, सून व नातू यांच्यासह प्रवास करत होत्या. या प्रकाराची माहिती देताना त्यांनी सांगितले की, करमाळी येथून नऊ वाजता गाडी सुटल्यानंतर सकाळी 9.45 वाजता गाडीत आम्लेट व कटलेट हा नाष्टा आम्हाला देण्यात आला. हा नाष्टा आपला मुलगा नीलेश व सून निहारिका यांनी खाल्ला. मात्र रत्नागिरीनंतर त्यांना उलटय़ा व जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर काहीवेळात अन्य प्रवाशांनाही हा त्रास जाणवू लागला.

रेल्वेत आहारतज्ञांची आवश्यकता- राऊत

तेजस एक्प्रेससारख्या गाडीत अन्नातून झालेला विषबाधेचा हा प्रकार गंभीर आहे. नाष्टय़ात देण्यात आलेल्या आम्लेट पाव व कटलेट या दोन पदार्थामधून ही विषबाधा झाल्याचे प्रवासी सांगत आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर फौजदारी होईलच. मात्र रेल्वेत देण्यात येणाऱया अन्नाची तपासणी होणे गरजेचे असून त्यासाठी आहार तज्ञाची आवश्यकता आहे. मुळात हे अन्न रत्नागिरी येथेच जप्त करणे आवश्यक होते. मात्र त्यानंतर ते कुठे गेले याचा शोध घेणेही आवश्यक असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

Related posts: