|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बंधारा फुटून शेतवाडीत शिरले पाणी

बंधारा फुटून शेतवाडीत शिरले पाणी 

अतिवृष्टीचा अग्रनी नदीवरील बंधाऱयाला फटका

वार्ताहर / अथणी

 सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ओढे, नाल्यांसह नदीला मोठय़ा प्रमाणात पाणी आले आहे. शिवनूर (ता. अथणी) येथील अग्रनी नदीपात्र तुडुंब भरून वहात असून पाण्याच्या अधिक प्रवाहाने बंधारा फुटून शेतवाडीत पाणी शिरले. परिणामी पिकांचे मोठे नुकसान होण्याबरोबरच परिसरातील विहिरीतही मोठय़ा प्रमाणात पाण्याबरोबरच गाळ साचल्याने विहिरी बुजल्या आहेत. यामुळे शेतकऱयांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

 गेल्या पंधरा दिवसापासून अथणी परिसरात परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. पावसाचा जोर अधिक असल्याने केवळ तासाभराच्या अवधीतच सर्वत्र पाणीच पाणी होत आहे. मुसळधार पावसामुळे पावसाचे पाणी अनेक घरांमध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शेतीपिकांचेही नुकसान होत आहे. परिणामी शेतकऱयांतून चिंता व्यक्त होत आहे.

येथील अग्रनी नदीला अचानकपणे पाणी वाढल्याने नदीपात्र तुडुंब भरून वाहू लागले. असे असताना बंधाऱयावरील दरवाजे न उघडल्याने बंधारा फुटून पाणी शेतीवाडीत शिरले. तसेच पाण्यातून वाहून आलेल्या मातीमुळे अनेकांच्या विहिरी बुजल्या आहेत. शिवनूर येथील नागाप्पा म्हेत्रे यांच्या शेतवडीतील विहीर पूर्णतः बुजली असून पिकांचेही नुकसान झाले आहे. शिरुर, संबरगी, तावशी, शिवनूर या परिसरात मोठे नुकसान झाले आहे. वेळीच संबंधित अधिकाऱयांनी लक्ष घालून नुकसानीचा सर्व्हे करावा व भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.