|Sunday, January 26, 2020
You are here: Home » क्रिडा » भारत-न्यूझीलंड पहिली वनडे आज

भारत-न्यूझीलंड पहिली वनडे आज 

उभय संघात रंगणार 3 वनडे व 3 टी-20, फिरकीच्या आघाडीवर कुलदीप यादव, चहलवर यजमान संघाची भिस्त

वृत्तसंस्था / मुंबई

मायभूमीतील भरगच्च हंगामात दमदार वर्चस्व गाजवणारा भारतीय संघ आज 3 वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत न्यूझीलंडविरुद्ध तीच यशस्वी मालिका कायम राखण्यासाठी निर्धाराने मैदानात उतरेल. न्यूझीलंड संघाच्या कामगिरीत फारसे सातत्य नसले तरी संघर्षमय खेळ साकारण्याची त्यांची क्षमता पाहता ही मालिका रंजक ठरु शकते. उभय संघातील आजच्या लढतीला दुपारी 1.30 पासून प्रारंभ होईल. वनडे क्रिकेटमध्ये नवे नियम लागू झाल्यानंतर भारतासाठी ही पहिलीच मालिका असणार आहे.

भारताने अलीकडेच ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला असून त्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडला जवळपास प्रत्येक आघाडीवर दक्ष राहावेच लागणार आहे. कर्णधार विराट कोहली फॉर्ममध्ये नसताना व धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन उपलब्ध नसताना देखील भारताने कांगारुंचा 4-1 असा फडशा पाडला होता, ते इथे लक्षवेधी आहे. उपकर्णधार रोहित शर्माने 1 शतक, 2 अर्धशतके व 60 पेक्षा थोडय़ा कमी सरासरीने 296 धावा झोडल्या तर सातत्यपूर्ण कामगिरी साकारणाऱया अजिंक्य रहाणेने 2 अर्धशतकांसह 244 धावांची आतषबाजी केली. अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने 222 धावांसह आपली विस्फोटक क्षमता दाखवून दिली तर बेस्ट फिनिशर महेंद्रसिंग धोनीने बॅटची धार अधोरेखित केली.

चायनामन कुलदीप यादव, लेग्गी यजुवेंद्र चहल व राखीव फळीतील अक्षर पटेल यांच्यामुळे भारतीय फिरकी आघाडी देखील वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठरली आहे. मध्यमगती गोलंदाजीत भुवनेश्वर व जसप्रीत बुमराह किवीज फलंदाजांविरुद्ध भेदक गोलंदाजी करतील, अशी अपेक्षा आहे.

दुसरीकडे, किवीज संघ प्रामुख्याने सर्वात अनुभवी व माजी कर्णधार रॉस टेलरवर अवलंबून असेल. त्याच्यासह सलामीवीर मार्टिन गुप्टील व कर्णधार केन विल्यम्सन यांचा फॉर्म देखील न्यूझीलंडसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. दुसऱया सराव सामन्यात न्यूझीलंडतर्फे रॉस टेलर व टॉम लॅथम यांनी शतके झळकावली होती, हा त्यांच्यासाठी दिलासा ठरला. आता प्रत्यक्ष वनडेत त्यांची कामगिरी कशी होईल, हे पाहावे लागेल. गोलंदाजीच्या आघाडीवर किवीज संघाची भिस्त ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी या मध्यमगती गोलंदाजांसह डावखुरा मिशेल सॅन्टनेर, लेगस्पिनर इश सोधी या फिरकीपटूंवर असेल. 

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर.

 

 

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, कॉलिन डे ग्रँडहोम, मार्टिन गुप्टील, मॅट हेन्री, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, ऍडम मिल्ने, कॉलिन मुन्रो, ग्लेन फिलीप्स, मिशेल सॅन्टनेर, टीम साऊदी, रॉस टेलर, जॉर्ज वर्कर, इश सोधी.

सामन्याची वेळ : दुपारी 1.30 पासून.

कर्णधार विराट म्हणतो, रहाणे तिसरा सलामीवीर

मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणे सध्या उत्तम फॉर्ममध्ये असला तरी आमच्यासाठी तो तिसरा सलामीवीर आहे, असे जाहीर करत कर्णधार विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध सलामीसाठी आपली पहिली पसंती रोहित शर्मा व शिखर धवन यांनाच असेल, असे अप्रत्यक्ष संकेत दिले. धवन व रोहित शर्मा हे सध्याचे नियमित सलामीवीर आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध धवनच्या गैरहजेरीत सलामीला उतरणाऱया रहाणेने 5 सामन्यात 4 अर्धशतके झळकावत आपला फॉर्म दाखवून दिला होता. 2011 मध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पण करणाऱया अजिंक्य रहाणेने 84 वनडे सामन्यात 2822 धावा केल्या असून 111 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

‘रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध संधी मिळताच त्याचा पुरेपूर लाभ घेतला. सलामीसाठी केएल राहुल देखील शर्यतीत असतो. त्यामुळे, सलामीच्या 2 जागांसाठी आपल्याकडे 4 दमदार पर्याय असताना 2 खेळाडूंना बाहेर बसावेच लागेल, हे सुस्पष्ट आहे. रहाणेला मधल्या फळीत खेळवता येईल. पण, असे केल्यास त्याचा अधिक गोंधळ उडेल. आतापर्यंतची वाटचाल पाहता तो आघाडीवर आक्रमक खेळतो. गोलंदाजांवर तुटून पडणे त्याला विशेष भावते आणि ज्यावेळी संघाला गरज असेल, त्यावेळी त्यालाच आमचे प्राधान्य असेल’, असे विराट स्पष्टीकरणार्थ म्हणाला.

‘फिरकी गोलंदाजीच्या आघाडीवर रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांनी मागील 6-7 वर्षात सातत्याने वनडे क्रिकेट खेळत आले असले तरी कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल भेदक मारा करत असल्याने त्यांनाच आम्ही संघात कायम ठेवले आहे. यामुळे, 2019 विश्वचषकापर्यंत आमच्याकडे गोलंदाजीतही भक्कम पर्याय उपलब्ध असणार आहेत’, असे तो शेवटी म्हणाला.

Related posts: