|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » काँग्रेस रोडच्या काँक्रिटीकरणासाठी 25 कोटीचा प्रस्ताव

काँग्रेस रोडच्या काँक्रिटीकरणासाठी 25 कोटीचा प्रस्ताव 

प्रतिनिधी /बेळगाव

खानापूर रोडवरील ओव्हरब्रिज उभारणीसाठी वाहतूक बंद करण्यात आल्याने काँग्रेस रोडला महत्त्व प्राप्त झाले आहे. या रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने शंभर कोटी निधीमधून रस्त्याचा विकास करण्याचा प्रस्ताव होता. मात्र स्मार्टसिटी योजनेंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून याकरिता अंदाजे 25 कोटी निधीची तरतूद करण्यात येणार आहे. प्राथमिक चाचण्या घेण्याचे काम स्मार्टसिटी कंपनीकडून सुरू आहे. सदर काम तिसऱया टप्प्यात होण्याची शक्मयता आहे.

काँग्रेस रोडची दुरवस्था झाली असल्याने रस्त्याचा विकास करण्याकरिता सत्ताधारी गटनेते पंढरी परब यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला आहे. यामुळे रस्त्याचा विकास करण्यात येणार असल्याचे दोन वर्षांपासून सांगण्यात येत आहे. मात्र रस्त्याच्या विकासाला मुहूर्त मिळाला नाही. रस्त्याचे डांबरीकरण व इतर विकासकामे  मुख्यमंत्री शहर विकास अनुदानाच्या शंभर कोटी निधीमधून करण्यात येणार होती. याकरिता दीड कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. पण रस्त्याचा समावेश स्मार्टसिटी योजनेच्या एरियाबेस्ड आराखडय़ात करण्यात आला आहे. यामुळे या अंतर्गत रस्त्याचा विकास करण्याचा प्रस्ताव स्मार्टसिटी लिमिटेड कंपनीने तयार केला आहे. याकरिता इस्टिमेट तयार करण्याचे काम सुरू आहे.

शहरातील महत्त्वाचा रस्ता असून अवजड वाहनांसह विविध वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात होत असते. त्याचप्रमाणे औद्योगिक वसाहतीला जोडणारा रस्ता असल्याने रस्त्याचे  काँक्रिटीकरण  करण्याचा प्रस्ताव आहे. गोगटे सर्कल ते तिसरे रेल्वे गेटपर्यंतच्या रस्त्याचे  काँक्रिटीकरण  करून दुतर्फा फुटपाथ करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच जलवाहिन्या, विद्युत वाहिन्या, गॅस वाहिनी, ड्रेनेज वाहिनी अशा नागरी सुविधांचा पुरवठा करण्यासाठी डक्ट ( भुयारी गटारी) निर्माण करण्यात येणार आहेत. याकरिता 25 कोटीचा निधीची आवश्यकता आहे. सदर निधी स्मार्टसिटी योजनेमधून खर्च करण्यात येणार आहे. शहरातील स्मार्ट रस्ता करण्याचा प्रस्ताव असून याकरिता आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच जमिनीचे व माती परीक्षण करण्यात येत आहे.

यापूर्वी शंभर कोटी अनुदानामधून निधी उपलब्ध करण्यात आला होता. यामुळे पावसाळा संपल्यानंतर काम सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्यावतीने सांगण्यात येत होते. मात्र स्मार्टसिटी योजनेमधून रस्त्याचा विकास करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याने रस्त्याचे काम लांबणीवर पडले आहे. स्मार्टसिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात मंडोळी रोड आणि श्रीनगर येथील रस्त्याचा विकास करण्यात येणार आहे. दुसऱया टप्प्यात काँग्रेस रोडचा विकास करण्याचा प्रस्ताव आहे. पण खानापूर रोडवरील रेल्वे ओव्हरब्रिजचे काम सुरू करण्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक काँग्रेस रोडने वळविण्यात आली आहे. ओव्हरब्रिजचे काम पूर्ण होईपर्यंत काँग्रेस रोड बंद ठेवता येणार नाही. यामुळे काँग्रेस रोडचा विकास स्मार्टसिटी योजनेच्या तिसऱया टप्प्यात होण्याची शक्मयता आहे.