|Sunday, June 16, 2019
You are here: Home » Top News » ‘त्या’ नगरसेवकांसाठी मनसेकडून व्हीप जारी

‘त्या’ नगरसेवकांसाठी मनसेकडून व्हीप जारी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकत शिवसेनेत गेलेल्या मुंबई महापालिकेच्या सहा नगरसेवकांसाठी मनसेकडून व्हीप जारी करण्यात आला आहे. सभागृहात किंवा अन्य बैठकीत कोणत्याही प्रकारचे मतदान करु नये, असा आदेशच यावेळी काढण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेतील मनसेच्या सातपैकी सहा नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर दोन्ही पक्षांकडून कुरघोडीचे राजकारण सुरु असतानाच कायदेशीर खेळी करत मनसेने या सहाही नगरसेवकांसाठी व्हीप जारी केला आहे. बेस्ट आणि अर्थसंकल्प विलीनीकरणावर आज मतदान होणार असून, तत्पूर्वी पक्षाकडून या नगरसेवकांसाठी व्हीप जारी करण्यात आला आहे. पक्षादेशाशिवाय सभागृहात कोणीही मतदान करु नये. तसेच अन्य कोणत्याही बैठकीत मतदान न करण्याचा आदेशही मनसेकडून काढण्यात आला आहे.

दरम्यान, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हे सहाही नगरसेवक आज पहिल्यांदाच सभागृहात येणार असून, ते कोणासोबत आहेत, मनसेचा व्हीप धुडकावून पक्षविरोधी भूमिका घेतात का, या सर्व बाबींचे चित्र मतदानानंतर स्पष्ट होणार आहे.