|Thursday, August 22, 2019
You are here: Home » क्रिडा » रॉजर फेडरर उपांत्य फेरीत

रॉजर फेडरर उपांत्य फेरीत 

वृत्तसंस्था/ बेसिल

स्विस खुल्या पुरूषांच्या इनडोअर एटीपी टेनिस स्पर्धेत स्वित्झर्लंडच्या टॉप सीडेड रॉजर फेडररने फ्रान्सच्या मॅनेरिनोचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.

शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात द्वितीय मानांकित फेडररने ऍड्रीयन मॅनेरिनोचा 4-6, 6-1, 6-3 असा पराभव केला. आपल्या देशात होत असलेल्या या स्पर्धेत फेडरर आता आठव्यांदा जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. शुक्रवारच्या सामन्यात मॅनेरिनोने पहिला सेट जिंकल्यानंतर फेडररने पुढील दोन सेटस् जिंकून शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. फेडररची उपांत्य लढत बेल्जियमच्या गोफीनशी होईल. बेल्जियमच्या तृतीय मानांकित गोफीनने अमोरिकेच्या जॅक सॉकवर 7-6 (8-6), 6-3 अशी मात करत उपांत्य फेरी गाठली. क्रोएशियाच्या सिलीकने हंगेरीच्या फ्यूकसोव्हिक्सचा 7-6 (7-3), 5-7, 7-6 (7-4) अशा सेटस्मध्ये तीन तासाच्या लढतीत पराभव करत उपांत्य फेरीत  प्रवेश मिळविला. अर्जेंटिनाच्या डेल पोट्रोने रॉबर्टो बॉटीस्टाचा  6-2, 2-6, 6-4 असा पराभव केला. पोट्रो आणि सिलीक यांच्यात उपांत्य लढत होईल.