|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दावण्याच्या दणक्याने 100 कोटीचा फटका

दावण्याच्या दणक्याने 100 कोटीचा फटका 

समाधान भोरकडे / सोलापूर

परतीच्या पावसाने जिल्हय़ाला दिलेल्या तडाख्याने खरीप वाहून गेले, रब्बीच्या पेरण्यापण लांबल्या, यातून शेतकरी सावरतोय तोपर्यंत हवामान बदलामुळे द्राक्ष उत्पादनावर दावण्या व करप्या रोगाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढल्याने दाक्ष बागायदरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या रोगाच्या प्रादुर्भावाने जिल्हय़ातील द्राक्षबागायतदारांचे सुमारे 100 कोटी रूपयाहुन अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्ष निर्यात करण्यासाठी द्राक्षाची लवकर छाटणी करतात. यंदा परतीच्या पावसाने खुपच धुमाकूळ घातल्याने बागांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे बांगांच्या मुळय़ा कुजल्या शिवाय वाढ खुंटली आहे. यातच गेल्या आठ दिवसापासून हवामानात बदलामुळे धुक्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे द्राक्षबागायत दारांचा कर्दळकाळ म्हणून ओळखणाऱया दावण्या, करप्या या रोगांचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात झाला.  सदरचा रोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱयांना ऍक्रोबाइट, कॉबरा टॉप, आमीस्टार, करजेट, स्कोर, रिवस यासारख्या महागडय़ा औषधांची फवारणी करवी लागत आहे. एका फवारणीचा खर्च साधारणता 5 ते 6 हजार रूपये इतका आहे. हवामान बदलामुळे सारखी फवारणी करावी लागते. शेतकऱयांनी फवारणी करूनही रोग नियंत्रणात येत नसल्याने अनेकांनी बागा अर्ध्यावच सोडल्या आहेत. तर अनेक बांगामधून मळीगळून गेल्याने केवळ देठेच शिल्लक राहीले आहेत.

शेतकरी या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी वेगवेगळय़ा महागडय़ा औषधांचा वापर करू लागले आहेत. यामुळे एकाच कंपण्याची वेगवेगळी औषधे वापर करीत आहेत. याचा औषध दुकानदारांनी गैरफायदा उठविला असुन औषधांचा तुटवडा असल्याचे कारण पुढे करीत एफआरपीपेक्षा जादा दराने विक्री करून शेतकऱयांच्या खिशाला कात्री लावण्याचा उद्योग चालविला असल्याच्या शेतकऱयांच्या तक्रारी आहेत.

दावण्याच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हैराण झाला आहे. सरासरीपेक्षा दुप्पटीहुन अधिक खर्च वाढल आहे. एवढे करूनही उत्पन्नाची हमी नाही. त्यामुळै द्राक्षबागायतदार अक्षरश: हतबल झाला आहे.

एकूनच परतीच्या पावसाने जिल्हय़ातील शेतकऱयांना मोठय़ा प्रमाणात फटका बसला असून यातून सावरणे शेतकऱयासाठी अवघड झाले आहे. शासनाने नुकसानीचा पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी अशी शेतकऱयांकडून मागणी होत आहे.

  शासनाने मदत जाहीर करावी

 निसर्गाच्या लहरीपणामुळे दावण्या व करप्या रोगामुळे द्राक्ष बागांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. जवळजवळ निम्यापेक्षा जास्त बागा उध्वस्त झाल्या आहेत. शासनाने याचा पंचनामा करून लवकरात लवकर मदत जाहीर करावी.

Related posts: