|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » गोळी झाडून घेतलेल्या वकिलाचा अखेर मृत्यू

गोळी झाडून घेतलेल्या वकिलाचा अखेर मृत्यू 

प्रतिनिधी/ इस्लामपूर

पिस्तुलाने डोक्यात गोळी घालून घेतलेले वकील संग्राम धोंडीराम पाटील (32, मुळ रा.कापूसखेड) यांचा शनिवारी मध्यरात्री मृत्यू झाला. गेल्या चार दिवसापासून ते कोल्हापूरच्या सिटी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होते.  दरम्यान, ऍड. पाटील हे शेवटपर्यंत शुध्दीवर न आल्याने आत्महत्येचे कारण व देशी बनावटीचे पिस्तुल याचे गुढ कायम राहिले आहे. शनिवारी सकाळी त्यांच्यावर कापूसखेड येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या ‘एक्झिट’मुळे कापूसखेड गावात व मित्रांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

  ऍड. पाटील यांचे येथील नगरपालिके समोरील राजारामबापू शॉपिंग सेंटरमधील पहिल्या मजल्यावर कार्यालय आहे. बुधवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी या कार्यालयातच दरवाजाला आतून कडी लावून पिस्तुलने डोक्यात गोळी घालून घेतली. काही वेळाने त्यांचे सहकारी ऍड. संदीप पाटील हे आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, ऍड. संग्राम पाटील हे रक्ताच्या थारोळय़ात पडलेले दिसून आले. त्यांना उपचारासाठी कोल्हापूरच्या सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान शस्त्रक्रिया ही झाली होती. ऍड. पाटील हे शुध्दीवर आले तर त्यांना वाचवण्यात यश मिळाणार असल्याचा आशावाद डॉक्टरांना होता. पण, ऍड. पाटील हे शेवटपर्यंत बेशुध्दच राहिले. शनिवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. 

ऍड. संग्राम पाटील हे कापूसखेड येथे अन्य मित्रांच्या मदतीने भिशी चालवत होते. त्यांचा स्वभाव हरहुन्नरी व दुसऱयाला मदत करण्याचा होता. याशिवाय त्यांना राजकारणातही रस होता. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ते सक्रिय होते. एक महिना भराच्या धावपळीने निकालानंतर त्यांची प्रकृती किरकोळ बिघडली होती. मात्र उपचार घेऊन ते पुन्हा दैनंदिन कामाला लागले होते. ऍड. पाटील हे नेहमी इस्लामपूरला कार्यालयाकडे सकाळी उशिरा येत. बुधवारी मात्र सकाळी लवकर आटोपून बाहेर पडले. दरम्यान वडिलांनी लवकर जाण्याबाबत विचारणाही केली होती. त्यावेळी त्यांनी कार्यालयात काही पक्षकार येणार असल्याने जात असल्याचे सांगितले. दरम्यान, त्यांनी गाडीचा हप्ता भरण्यासाठी वडिलांकडून 25 हजार रुपयेही आणले होते.

ऍड. पाटील यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या टेबलवरील डायरीत केवळ ‘सॉरी’ लिहिले होते. या डायरीसह पिस्तुल, मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्यांच्या आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप समजत नाही. मोबाईलमधील कॉल डिटेल्स व अन्य बाबीतूनच कारण समजण्याची शक्यता आहे. ऍड. संग्राम पाटील हे मनमिळावू व मितभाषी असल्याने त्यांचा मित्र परिवार मोठा आहे. त्यांना
प्रवासाची आवड होती. अधून-मधून सहकारी वकील मित्र व अन्य मित्रांसमवेत ते सहलीचे आयोजन करीत असत. शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह कापूसखेड गावी आणण्यात आला. त्यावेळी गावांतील बहुतांशी पुरुष व महिला त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. याशिवाय विधी व अन्य क्षेत्रातील मित्र परिवारही हजर होता. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ऍड. पाटील यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, सात वर्षाची मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

Related posts: