|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » हिंगणीत दाक्षबागेत औषध फवारणी करताना शेतमजुराचा मृत्यू

हिंगणीत दाक्षबागेत औषध फवारणी करताना शेतमजुराचा मृत्यू 

प्रतिनिधी/ बार्शी

हिंगणी (ता. बार्शी) येथील द्राक्षबागेमध्ये फवारणी करताना झालेल्या विषबाधेतून आनंद माने (22) या तरुण शेतमजूराचा मृत्यू झाला असून तब्बल चौदा दिवस सोलापूर येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. अजून एकाची प्रकृती गंभीर असून देखील शासनाचे प्रशासन मात्र कोणावरही कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे मृताच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप प्रशासनावर केले आहेत.

आनंद माने यांच्यावर दुपारी तीनच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. मोलमजूरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा आनंद याचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थ हळहळ व्यक्त करीत होते. त्यास वडील नसून आई, एक भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. शेतीही नाही.

हिंगणी येथील शेतकरी आनंद काशीद यांची 19 एकर द्राक्षबाग असून गावामध्ये शेतमजूर मिळत नाहीत. म्हणून चिवर्डे येथील शेतमजूर ठेकेदारामार्फत या बागेत ऑक्टोबर छाटणीनंतर द्राक्षांना द्राक्षकडी फुटण्यासाठी ‘हायड्रोजन साईनामाईड’ हे कॅनबेक कंपनीचे औषध फवारणी करण्यात येत होते.

दाक्षबागेत 13 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहाच्या दरम्यान आनंद माने, तानाजी देठे, किरण मसेकर, सागर सूतार, दत्तात्रेय चव्हाण, अक्षय सवणे, बापू ढावारे यांनी हे काम केले होते. पण, रात्री त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने सर्वांना बार्शी येथील जगदाळेमामा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. माने याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यास सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात दाखल केले.

औषधाचे ज्या पटीमध्ये मिश्रण करणे जरुरीचे होते. त्याऐवजी औषधाची जास्त मात्रा वापर केल्यामुळे विषबाधा झाली, असा निष्कर्ष त्यावेळी कृषी अधिकारी व जिल्हा गुणवत्ता नियंत्रक यांनी काढला होता. घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला पण, अद्याप कोणताही जबाबदार धरण्यात आलेले नाही.

या घटनेतील तानाजी देठे या शेतमजूराची प्रकृती अद्यापही चिंताजनक असून त्याच्यावर सोलापूर येथील यशोधारा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शासनाने या घटनेकडे गंभीरपणे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. विषबाधा होण्याच्या आदल्यादिवशी द्राक्षकाडय़ांना औषध फवारणी करुन बाग पूर्ण झाली होती. पण, पाऊस आल्याने औषध धुवून गेले होते. त्यामुळे पुन्हा दुसऱयादिवशी औषध लावण्याचे काम शेतमजूरांनी केले. यावेळी जो शेतमजूर आपली रांग लवकर संपवेल त्यास एक बिस्किट पूडा देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते व बिस्किटपुडेही देण्यात आले होते. स्पर्धेमुळे वेगात काम केले तसेच हातमोजे, मास्क, गॉगल या संरक्षक साधनांचा वापर शेतमजुरांनी केला नाही. याकडेही प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे, असे ग्रामस्थांनी याप्रसंगी सांगितले.

Related posts: